Home चंद्रपूर सास्ती कॉलरी पतसंस्थेत आर्थिक घोटाळा उघड

सास्ती कॉलरी पतसंस्थेत आर्थिक घोटाळा उघड

41

▪️अध्यक्षांसह सात पदाधिकारी, संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल

▪️बत्तीस लाखांचा अपहार झाल्याचा ठपका

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२६एप्रिल):-राजुरा तालुक्यातील सास्ती कॉलरी कोळसा खदान कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., सास्ती (र.नं. ९०२) येथे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, तब्बल ३२ लाख ९ हजार ५१४ रुपयांच्या अपहारप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व व्यवस्थापक अशा सात जणांविरुद्ध राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशिगंधा छगन सेलोटे (लेखापरीक्षक, श्रेणी-१) यांनी केलेल्या लेखापरीक्षणात सन २०२२ ते २०२४ या कालावधीत संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता आढळून आल्या. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३४, ४०६, ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविला.

लेखापरीक्षणात संचालक मंडळाने नियमांना जाणीवपूर्वक बगल देत बिगर सभासदांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्ती संस्थेचे सदस्य नसतानाही त्यांना प्रत्येकी १० लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. यामध्ये कर्ज प्रस्ताव, मंजुरी प्रक्रिया, आवश्यक स्वाक्षऱ्या व कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय, कर्जाची रक्कम धनादेशाऐवजी रोखीने दिल्याचे दाखविणे, तसेच कर्जाची परतफेड झाल्याचे दाखवण्यासाठी बनावट जमा नोंदी तयार करणे असे प्रकारही समोर आले. विशेषतः २८ जून २०२३ रोजी मोठ्या रकमा संस्थेत जमा झाल्याचे दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात त्या रकमा जमा झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

या गैरव्यवहारावर पडदा टाकण्यासाठी संचालक मंडळाने पुढे नियमित सभासदांच्या नावावर खोटे कर्ज दाखवून दुसरा घोटाळा केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. काही सभासदांनी लेखी निवेदन देत आम्ही कर्ज घेतलेले नाही असे स्पष्ट केल्याने हा प्रकार अधिकच गंभीर बनला आहे. लेखापरीक्षण अहवालानुसार, संबंधित संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी संगनमताने बनावट कर्जप्रकरणे तयार करून संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकारामुळे संस्थेचे तसेच सर्वसामान्य सभासद व ठेवीदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात अध्यक्ष शेख सलीम रसुल, उपाध्यक्ष भुपेली नरसिंग पोचम, सचिव संगला संजीवकुमार, खजिनदार कुणाल निलकंठ कुडे, संचालक सय्यद शहजाद, प्रशांत खनके आणि व्यवस्थापक मिथिलेश ठाकुर यांचा समावेश असून, सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार करीत असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे सहकारी संस्थांच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here