Home महाराष्ट्र गंगाखेडमध्ये “शास्त्रीय संगीत महोत्सव” उत्साहात संपन्न; संगीतप्रेमी रसिक मंत्रमुग्ध

गंगाखेडमध्ये “शास्त्रीय संगीत महोत्सव” उत्साहात संपन्न; संगीतप्रेमी रसिक मंत्रमुग्ध

325

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.26मार्च):-शहरातील संगीत रसिकांसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरलेला “चैत्र पालवी” निमित्त आयोजित भव्य “शास्त्रीय संगीत महोत्सव” दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत मोरया फंक्शन हॉल, डॉक्टर लेन, गंगाखेड येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या संगीतमय सोहळ्याने गंगाखेडच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवा अध्याय जोडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रेखाताई गुट्टे व उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सूर्यभान महाराज आवलगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत कोल्हे पाटील, नगरसेवक संदीप सानप, क्षितिज चौधरी, डॉ. शरद देशमुख (मुंबई), प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र गहाळ, सुभेदार मुंजाजी कदम, योगगुरु प्रकाश डिकळे, समाजसेविका मंजुषाताई दर्डा, सरपंच राजेभाऊ सावंत (उखळी बु.), ज्येष्ठ साहित्यिक दीनानाथ फुलवाडकर, बाळासाहेब राखे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या,

या महोत्सवात नादब्रह्म संगीत महाविद्यालय, गंगाखेडचे संचालक प्रा. डॉ. सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृंदांनी विविध रागांतील बंदिशी, नाट्यगीते, गवळणी, ठुमरी, दादरा, अभंग, भक्तिगीते तसेच रागाधारित भावगीते सादर केली. प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत सभागृह दणाणून सोडले. सामूहिक तबलावादन, बासरी वादन, तबला सोलो आणि ढोलकी वादनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच खुलली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. अनेक रसिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, “अशा प्रकारचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम गंगाखेडसह इतर शहरांमध्येही वारंवार आयोजित व्हावेत,” अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः प्रा. डॉ. सचिन पवार यांच्याकडे अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची विनंती केली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री केदारेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उखळी बु. (ता. सोनपेठ) संचलित नादब्रह्म संगीत महाविद्यालय, गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सचिन पवार व त्यांच्या शिष्यपरिवाराने अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे विनीत प्रा. डॉ. सचिन पवार यांनी मान्यवरांचे आभार मानले, तर मुख्यकार्यवाह म्हणून भागवत जलाले (संपादक – जनाई नगरी) यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या समन्वयामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत पार पडला.

या संगीतमय महोत्सवाला गंगाखेड शहरासह परिसरातील मोठ्या संख्येने संगीत प्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. या यशस्वी आयोजनामुळे गंगाखेड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here