


दि.८ मार्च जागतिक महिला दिन ..या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या प्रगतीचा आढावा घेणे प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते,म्हणून हा लेख प्रपंच.
“स्त्री शक्ती” आता केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही,तर ती विविध क्षेत्रात उंच भरारी घेणारी एक शक्ती आणि एक प्रेरणा बनलेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात ती फक्त वापरकर्ती नसून निर्माती सुद्धा झालेली आहे. इस्रो (ISRO) च्या चंद्रयान आणि मंगलयान मोहिमेत महिला शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे राहिले आहे. मिसाईल वूमन टेसी थॉमस, अंतराळवीर कल्पना चावला, सुनिता विल्यम्स अशा अनेक महिलांनी विज्ञानाच्या जगात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात पूर्वी केवळ पुरुषांची मक्तेदारी समजल्या जात होती. सैन्य दलात आज महिला अधिकारी लढाऊ विमाने चालवत आहेत.सीमा सुरक्षा बल,पोलीस दल आणि नौदलात महिला अत्यंत धाडसाने देशसेवा करीत आहेत. राजकारण आणि प्रशासन क्षेत्रात देशाच्या राष्ट्रपती पदापासून ते गावच्या सरपंचापर्यंत महिला आपली जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत.आय.ए.एस. आणि आय.पी.एस परीक्षांमध्ये दरवर्षी मुली अव्वल स्थानी येत आहेत, ज्यामुळे प्रशासकीय कार्यात एक नवी दृष्टी मिळत आहे.
उद्योग आणि व्यापार क्षेत्रात
’स्टार्ट-अप’ च्या युगात महिला उद्योजिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फाल्गुनी नायर या प्रसिद्ध भारतीय उद्योजिका आणि ‘नायका’ (Nykaa) या सौंदर्य प्रसाधने व फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या संस्थापक आणि सीईओ आहेत.
किरण मजुमदार-शॉ या भारतीय उद्योजिका आणि ‘बायोकॉन लिमिटेड’ (Biocon Limited) या प्रसिद्ध जैवतंत्रज्ञान (Biotechnology) कंपनीच्या संस्थापक व कार्यकारी अध्यक्षा आहेत. त्यांना भारताच्या ‘बायोटेक क्रांतीच्या शिल्पकार’ मानले जाते. या महिलांनी शून्यातून विश्व निर्माण करून जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. क्रीडा क्षेत्रात
मैदानावरही महिलांची बॅट आणि जिद्द जोरात बोलत आहे. पी.व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे की खेळात केवळ पुरुषच नाही तर शारीरिक ताकद आणि मानसिक बळावर स्त्रिया सुद्धा क्रीडा क्षेत्रात महत्वपूर्ण उड्डाण घेऊ शकतात.
लिंगभेद मिटवून स्त्री-पुरुषांना समान संधी मिळवून देणे आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करणे.आजची स्त्री ही ‘अबला’ नसून ‘सबला’ आहे. तिच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता,सोशिकता आणि कोणत्याही संकटावर मात करण्याची जिद्द आहे.
भारताचा इतिहास पाहिला तर शिक्षणाची दरवाजे उघडण्यापासून ते आधुनिक काळातील अंतराळ संशोधनापर्यंत महिलांनी शिक्षणाच्या जोरावर क्रांती घडवून आणली आहे.शिक्षण क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची चर्चा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
दि .१ जानेवारी १८४८ मध्ये पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला शेण-दगड अंगावर सोसूनही त्यांनी शिकवण्याचे कार्य सोडले नाही. त्यांच्यामुळेच आज भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचलेल्या आहेत.शिक्षणाने केवळ साक्षरता दिली नाही, तर महिलांना विविध विषयात तज्ज्ञ बनवले.आनंदीबाई जोशी यांनी सन -१८८६ मध्ये डॉक्टर होऊन भारतीय महिलांसाठी वैद्यकीय शिक्षणाची दारे उघडली.पंडिता रमाबाई यांनी ‘शारदा सदन’च्या माध्यमातून निराश्रित स्त्रियांना स्वावलंबी आणि सुशिक्षित करण्याचे कार्य केले.आजच्या काळात महिला केवळ शिक्षिका म्हणून नव्हे, तर शैक्षणिक धोरणकर्त्या म्हणूनही काम करत आहेत. विद्यापीठांमध्ये संशोधनापासून कुलगुरू पदापर्यंत महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.महिलांच्या शिक्षण क्षेत्रातील सहभागामुळे समाजात सकारात्मक बदल झाले आहेत . “एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते” ही म्हण महिलांनी खरी करून दाखविली आहे. शिक्षणामुळे महिलांना नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळाल्या, ज्यामुळे देशाच्या GDP मध्ये भर पडत आहे.आरोग्य, स्वच्छता आणि हक्कांप्रती समाजात मोठी जागृती झाली आहे.”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महिलांनी प्रत्यक्ष कृतीत आणले आहेत.
भारताच्या सामाजिक जडणघडणीत महिलांनी केवळ सहभागच नोंदवला नाही, तर अनेक क्रांतिकारी बदलांचे नेतृत्वही केले आहे.स्त्री ही समाजाचा कणा आहे आणि जेव्हा ती सामाजिक क्षेत्रात उतरते,तेव्हा संपूर्ण पिढीचा उद्धार होतो.भारतात स्त्री शिक्षणाची आणि समाजसुधारणेची मुहूर्तमेढ महिलांनीच रोवली.आज ग्रामीण भारताचा चेहरा बदलण्यात महिला बचत गटांचा मोठा वाटा आहे.आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनाद्वारे त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती दिली आहे.छोट्या उद्योगांतून हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.घराच्या उंबरठ्याबाहेर पडून महिला आता गावच्या ग्रामसभेत आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेत आहेत.निसर्ग आणि स्त्री यांचे नाते अतूट आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी महिलांनी दिलेले लढे जागतिक स्तरावर गाजले आहेत.गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी झाडांना विळखा घालून वृक्षतोड थांबवली.ज्याला चिपको आंदोलन म्हणून ओळखले जाते.’नर्मदा बचाव आंदोलना’द्वारे मेधा पाटकर यांनी विस्थापितांचे प्रश्न आणि पर्यावरणाचा ऱ्हास याकडे जगाचे लक्ष वेधले.आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महिलांनी कुपोषण,माता मृत्यू दर आणि बालविवाह यांसारख्या गंभीर प्रश्नांवर काम केले आहे.सिंधुताई सपकाळ या हजारो अनाथांच्या ‘माई’ होऊन निराधार मुलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले.डॉ.राणी बंग यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर केलेले कार्य ‘सर्च’ (SEARCH) संस्थेच्या माध्यमातून आजही मार्गदर्शक ठरत आहे.शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक महिला आजही कायदेशीर आणि सामाजिक लढा देत आहेत.अशा कर्तव्यदक्ष आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना आज जागतिक महिला दिनी सन्मानित करून त्यांचा गौरव केला जातो.
ज्यांचे संपूर्ण जीवन कर्तव्याला समर्पित आहे अशा कर्तव्यशालिनी,संकटांशी धैर्याने लढणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रणरागिणी,आपल्या कार्याने समाजाला नवी दिशा देऊन प्रकाशमान करणाऱ्या तेजस्विनी, स्वतःसोबतच समाजाची प्रगती घडवून आणणाऱ्या प्रगतीच्या शिल्पकार,सेवा आणि ममत्वासाठी कार्य करणाऱ्या सेवामूर्ती,समाजसेवेचा वसा घेतलेल्या आणि निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या समाजसेविका,गरिबांबद्दल आणि वंचितांबद्दल मनात अपार दया असणाऱ्या करुणासिंधू,
सर्वांना मायेचा आधार देणाऱ्या वात्सल्यमूर्ती,अंधाऱ्या झोपडीत विद्यारूपी ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या ज्ञानज्योती,कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाविष्कारी,
महिलांच्या शिक्षणासाठी किंवा हक्कासाठी लढणारी आधुनिक सावित्री अशा सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त माझा मानाचा मुजरा.
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९














