


✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कराड(दि.4फेब्रुवारी):- भारताच्या सुसंस्कृत पणाचा आदर्श म्हणजे सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण होय. यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांच्यातील परस्पर प्रेमभावना व विश्वास हा त्यांच्या सहजीवनाचा मजबूत पाया होता. वेणूताईंच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, सात्विकता आणि संयम होता. राजकीय तसेच कौटुंबिक जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मनोभावे साथ दिली. सत्तेचा बडेजाव न करता त्या सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत. त्या यशवंतराव चव्हाण यांच्या सखी आणि सल्लागार होत्या, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड अंतर्गत वेणूताई चव्हाण महाविद्यालय, कराड आणि सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मा. श्री. बाळासाहेब पांडुरंग पाटील (साहेब) माजी सहकार व पणनमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सातारा जिल्हा, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्वर्गीय सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जयंती व जन्मशताब्दी सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना लिहिलेल्या पत्रांमधून उभयतांमधील उत्कट प्रेमाचे दर्शन घडते. वेणूताई चव्हाण स्मारक हे पती-पत्नीच्या अतूट नात्याचे प्रतीक असून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या कौटुंबिक जीवनातून आदर्श घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि सौ. वेणूताई चव्हाण यांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी पुढे चालवला. या विचारांची आणि कार्याची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका), विश्वस्त व सदस्य;श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड, मा. श्री. संजय बदियानी खजिनदार, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड, मा. श्री. प्रकाश पांडुरंग पाटील बापू मा. श्री दिलीपभाऊ चव्हाण, प्राचार्य डॉ. एस बी केंगार,मा. श्री हिंगमिरे साहेब, माझी प्राचार्य जी व्ही कुलकर्णी, डॉ. बी एन कालेकर, सुप्रसिद्ध चित्रकार मा. दादासाहेब सुतार, मा. बाला पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर आर्या पवार आणि स्वरदा किर्लोस्कर यांनी सादर केलेल्या ईश्वरस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमात मंगलमय वातावरण निर्माण झाले. प्राचार्य प्रा. डॉ. रमेश रंगराव जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष यांचा परिचय प्रा. डॉ. मृणालिनी आबासाहेब शिंदे यांनी करून दिला.
यानंतर चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे आणि रोख रक्कम स्वरूपात पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. स्वाती रामराव सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती प्रशांत पाटील आणि प्रा. प्रतिमा सुरेश सादिगले यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














