


▪️शब्दगंधची संमेलन विषयक बैठक संपन्न
✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.3फेब्रुवारी):-शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नवोदित लेखक, कवींसाठी कथा व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये नवोदितांनी सहभागी व्हावे* असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य कार्यकारी मंडळाची बैठक राज्य कार्यकारिणी सदस्य तथा नवजीवन प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली जाधव लॉन्स अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली. त्यावेळी संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रशांत सूर्यवंशी, बबनराव गिरी, बाळासाहेब शेंदूरकर, प्रा.डॉ.अशोक कानडे, शर्मिला गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत कथा लेखन स्पर्धेसाठी एकल महिलांचे प्रश्न, विधवा प्रथा निर्मूलन अथवा विधवा प्रथा विरोधात प्रकाश टाकणाऱ्या कथा असा विषय कथा लेखन स्पर्धेसाठी ठेवण्यात आला असून या स्पर्धेचे प्रमुख म्हणून प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांची तर खुल्या कविता लेखन स्पर्धा प्रमुख म्हणून स्वाती ठुबे यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धकांनी आपल्या कथा, कविता कागदाच्या एका बाजूस लिहून अथवा टाईप करून शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी, भिस्तबाग महालाजवळ, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर ४१४००३ येथे पाठवाव्यात. सोबत कथा, कविता स्वतःच्या असल्याचे प्रतिज्ञापत्र, परिचय,पासपोर्ट फोटो असावा.
यावेळी संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष,निधी संकलन, विविध स्पर्धा, शाखांचे उपक्रम या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, १७ वे संमेलन अधिक दिमाखदार होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व नवोदित लेखकांसह मान्यवरांनाही या संमेलनामध्ये सहभागी करून घेण्यात यावे. तर राजेंद्र उदागे यांनी संमेलनात तीन विचारपीठ उपलब्ध करून देण्यात येऊन त्याद्वारे सर्वांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्राथमिक शिक्षक पतसंस्था, कडा,आष्टी चे संचालक संजय काळे, मकरंद घोडके, सुदीप पडवळ, ऋषिकेश राऊत, दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी बबनराव गिरी यांनी आभार मानले.














