Home Breaking News ने. हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

ने. हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

120

▪️नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांची विद्यालयाला सदिच्छा भेट

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23जानेवारी):- नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे विद्यार्थ्यांच्या करीअरच्या दृष्टिकोनातून ‘व्यवसाय मार्गदर्शन’ कार्यक्रम प्राचार्य के. एम. नाईक यांचे अध्यक्षतेखाली तथा उपप्रचार्य ए. डब्ल्यू. नाकाडे, पर्यवेक्षक प्रा. पी. आर. जीभकाटे, कु. एस. यू.मराठे, व्ही. एन. वदनलवार, जे. पी. पराते यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे पत्रानुसार, कॉपीमुक्त अभियानांतर्गत इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यानंतर थोड्याच क्षणात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांचे अचानक आगमन झाले. विद्यालयातर्फे प्राचार्य के. एम. नाईक यांनी पुषगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.शिवलिंग पटवे यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधतांना, विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाचे महत्व व त्यासंदर्भात सर्व माहिती समजावून सांगितली. विद्यालयाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करतांना विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यासाने परीक्षेत यश प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना व विद्यालयाला यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

यानंतर नियोजित ‘व्यवसाय मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा.केशव घरत यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना, 10 वी नंतर आय. टी. आय., पोलिटेक्निक येथील विविध अभ्यासक्रम, 12 वी नंतर कला शाखेतून चित्रकला, व्यवस्थापन, कायदा, पत्रकारिता, आधुनिक शेती इ.क्षेत्रातील विविध संधी , 12 वी नंतर विज्ञान शाखेसाठी असणाऱ्या नीट (NEET), जेईई (JEE)परीक्षा आणि भारतातील सर्वोत्तम वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वाणिज्य शाखेतील सनदी लेखापाल व बँकिंग क्षेत्रातील संधी, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत होणाऱ्या विविध परीक्षा इ.अनेकविध परीक्षा व संधीबाबत मार्गदर्शन केले.

प्राचार्य के. एम. नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे आणि योग्य दिशेने अभ्यास करून परीक्षेत सर्वोच्च यश प्राप्त करावे असे प्रतिपादन केले.

सदर ‘व्यवसाय मार्गदर्शन ‘कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अतिथींचे आभार निलेश दोनाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here