


✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
नागपूर(दि.2डिसेंबर):-हिंगोली येथूनच जवळ असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव या गावातील प्रगतशील शेतकरी शुभम सोळंके यांच्या शेतामध्ये हरभरा पिकावर बायोफॅक्टर कंपनी मार्फत प्रात्यक्षिक पीक पाहणी व मार्गदर्शनपर कार्यक्रम करण्यात आला होता. संबंधित हरभरा पिकाच्या पेरणी वेळी बायोफॅक्टर कंपनीचे जैविक खताचा वापर गोपाल उगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता त्यानंतर काही दिवसातच जैविक खताचा वापर केल्याने हरभरा पिकामध्ये उत्तम असा फरक दिसून आला. त्यामुळे थेट शेतावरच मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यावेळी मार्गदर्शक (बायोफॅक्टर इनपुट प्रायव्हेट लिमिटेड) गोपाल उगले पाटील हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गौरकर व गावातील प्रगतशील शेतकरी शुभम सोळुंके, माऊली सोळुंके यांनी केले होते.
सदर कार्यक्रम हा दि. २ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी पार पडला. त्यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी बहुउपयोगी जिवाणू खते (बायो फर्टीलायझर) , जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके याची ओळख आणि आपल्या शेतीत वापर कसा करावा? केव्हा करावा? याचे फायदे कशाप्रकारे होतात? शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ कशी करावी?
त्याचबरोबर रायझोबियम, अझोटोबॅक्टर, हुमिक एसिड, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया, मेटारायझियम, नत्र, स्फुरद व पालाश विघटन करणारे जिवाणू यांचा शेतीसाठी होणारा फायदा. यावर सखोल व मोलाचे मार्गदर्शन गोपाल उगले पाटील यांनी केले.
ते बोलताना समोर असे म्हणाले की जिवाणू हा शेतीचा आत्मा आहे, आपल्या मातीमध्ये जिवाणूंना मोठे महत्त्व द्यावे लागेल, त्यावेळी आपल्याला समाधानकारक उत्पन्न मिळून शेतीचा खर्च कमी झालेला दिसेल. आपल्या शेतीचे उत्पन्न हे शेतीतील मातीमध्ये जिवाणूंची संख्या किती आहे यावर अवलंबून आहे. ज्यावेळी आपण आपली माती जिवाणूंनी श्रीमंत करू त्याच वेळी आपले उत्पन्नही त्याच पद्धतीने वाढेल आणि रासायनिक खतांचा खर्च कमी होईल. जिवाणूंची शेती ही फायदेशीर शेती आहे अनेक वर्षांपासून आपण रासायनिक खते जमिनीमध्ये टाकून आपली जमीन न- परवडणारी आणि निर्जीव करून ठेवली आहे त्यामुळे आता आपल्याला जिवाणूंचा वापर करून शेती जिवाणूंनी श्रीमंत करावी लागणार आहे. हल्ली आपल्या शेतजमिनीची परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे त्यामुळे आता आपल्या शेतीमध्ये जिवाणूंचा वापर करावा लागणार आहे. शेतजमिनीची परिस्थिती पंजाब आणि हरियाणा राज्यासारखी होऊ नये यासाठी अभ्यास करून जिवाणूंचा वापर आपल्या शेतीत करावा लागेल.
कार्यक्रमाच्या शेवटी चर्चासत्र पार पडले त्यामध्ये
सेंद्रीय शेती का करावी? जैविक खतांचा वापर कसा व कधी करावा? सेंद्रिय शेतीचे फायदे याबाबत चर्चा झाली त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रीय शेती करण्याचा निश्चय त्यावेळी घेतला.
त्यानंतर कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी अल्पोहार केला.














