Home अमरावती जगतिक विज्ञान दिनानिमित्त लेख

जगतिक विज्ञान दिनानिमित्त लेख

133

*जगतिक विज्ञान दिनाचे महत्त्व* 

         जागतिक विज्ञान दिन हा १० नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. १९९९ मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या विज्ञान विषयावरील जागतिक परिषदेत या दिवसाची संकल्पना मांडली गेली.२००१ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) या दिनाची औपचारिक घोषणा केली आणि २००२ मध्ये तो प्रथमच साजरा करण्यात आला. हा विज्ञान दिवस समाजाच्या प्रगतीसाठी आणि शाश्वत विकासासाठी विज्ञानाचे असलेले अतुलनीय महत्त्व अधोरेखित करणारा आहे.जागतिक विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश शांततापूर्ण आणि शाश्वत समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा आहे.विज्ञानाला समाजाभिमुख करणे,सामान्य माणसाला वैज्ञानिक शोधांविषयी माहिती देणे आणि त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन करणे, हे विज्ञान दिनाचे महत्त्वाचे कार्य आहे.हा दिवस नागरिकांना विज्ञानातील घडामोडींची माहिती पुरवतो आणि विज्ञानाचा सामाजिक हितासाठी वापर करण्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकी अधिक दृढ करतो.विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे, तसेच वैज्ञानिक सहकार्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारपीठांची निर्मिती करणे, हा देखील या दिनाचा महत्त्वाचा उद्देश आहे.हा दिवस जागतिक आव्हानांवर, जसे की हवामान बदल आणि आरोग्य समस्यांवर, वैज्ञानिक उपायांच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करतो.या दिवशी जगभरात विविध .चर्चासत्रे,परिषदा,प्रदर्शने आणि जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.हे कार्यक्रम विज्ञानातील प्रगती,तांत्रिक नवकल्पना आणि त्यांचा मानवी जीवनावरील सकारात्मक परिणाम दर्शवितात. कोविड-१९ महामारीसारख्या संकटांनी आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व किती आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. हा दिवस विज्ञानाच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि समृद्धी साधण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो.जागतिक विज्ञान दिन आपल्याला विज्ञानाचा उपयोग केवळ प्रगतीसाठीच नव्हे, तर शांततापूर्ण आणि समान जग निर्माण करण्यासाठी करण्याची प्रेरणा देतो.

        दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व खूप महत्व आहे.विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नकळतपणे विज्ञानाच्या अनेक देणग्यांचा आणि तत्त्वांचा उपयोग करतो.विज्ञानाने औषधे, लसी आणि निदान तंत्रांचा (उदा. एक्स-रे, एमआरआय इत्यादी अनेक उपकरणांचा शोध लावला आहे, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. तापमापक, रक्तदाब मापक ही साधने आणि विविध वैद्यकीय उपकरणे विज्ञानाच्या तत्त्वांवरच आधारित आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य तपासणे सोपे झाले आहे.निरोगी आरोग्याचा लाभ आपल्याला होत आहे.

       स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटर (अन्न ताजे ठेवण्यासाठी), मिक्सर, मायक्रोवेव्ह ओव्हन – ही सर्व उपकरणे वैज्ञानिक नियमांवर चालतात.वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, इस्त्री यांमुळे दैनंदिन कामे अधिक सोपी आणि जलद झाली आहेत.वीज,गॅस आणि आता सौरऊर्जा यांसारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर विज्ञानाच्या प्रगतीमुळेच शक्य झाला आहे .मोबाईल फोन, इंटरनेट, संगणक (Computer) आणि लॅपटॉप यांसारख्या साधनांमुळे आपण जगाशी सहज जोडले गेलो आहोत. हे सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विज्ञानाची देणगी आहे.सायकल,कार,रेल्वे, विमाने ही सर्व वाहने भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या सिद्धांतांवर आधारित आहेत, ज्यामुळे प्रवास जलद आणि आरामदायक झाला आहे .कृषी तंत्रज्ञानातही फार मोठी प्रगती झाली आहे.विज्ञानाने सुधारित बियाणे,खते आणि कीटकनाशके दिली आहेत, ज्यामुळे शेतीत उत्पादन वाढले आहे आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली आहे.अन्नपदार्थ जास्त काळ टिकवून ठेवणे (उदा. कॅनिंग, शीतकरण) हे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातील विज्ञानाच्या ज्ञानामुळे शक्य झाले आहे.विज्ञानाने आपले जीवन अधिक सोयीस्कर,सुरक्षित आणि दीर्घायुषी बनवले आहे.आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञानाचे महत्त्व दिसून येते. याशिवाय विज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती झालेली आहे. आज दि . १० नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या जागतिक विज्ञान दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ॥

✒️समता गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक(प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here