


✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.2नोव्हेंबर)– चंद्रपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे गंभीर स्वरूप निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन आणि धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हाता – तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरपंच संघटना, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट व भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
नंदकिशोर वाढई यांनी सांगितले आहे की, या वर्षीच्या सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि धान या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले सोयाबीन, कापसासारख्या नगदी पिकावर प्रचंड खर्च झाला; परंतु उत्पादन अर्ध्यावर आले आहे. धानाच्या पिकाला अंकुर फुटल्यामुळेही मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याला शेती चालवणेच नव्हे, तर जगणे कठीण झाले आहे.
पुढे ते म्हणाले की , शासनाने निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्यावी. तसेच हमीभावासोबत २० टक्के नफा जोडून शेतीमालाची खरेदी करावी. नाहीतर शेतकऱ्यांची पुढील पिढी शेतीकडे पाठ फिरवेल आणि देश अन्नधान्याच्या संकटात सापडेल. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आणि देशाचा पोशिंदा उद्ध्वस्त होत असेल, तर मायबाप सरकारने निकषांच्या पलीकडे जाऊन त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं. ही वेळ निकषांची नाही, तर संवेदनशीलतेची आहे.
शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत, कर्जमाफी आणि हमीभावासह भरपाई योजना जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरपंच संघटना, चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे.














