Home अमरावती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व राष्ट्रीय एकता दिवस

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व राष्ट्रीय एकता दिवस

257

    भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे १८७५ सालातील ऑक्टोबर महिन्याच्या एकतीस तारखेला झाला.ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री होते.त्यांना ‘भारताचे लोहपुरुष’ (Iron Man of India) म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील झवेरभाई पटेल हे झाशीच्या राणीच्या सैन्यात होते, तर आई लाडबा गृहिणी होत्या. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परतल्यावर त्यांनी अहमदाबाद येथे वकिली सुरू केली व त्यात ते यशस्वी झाले ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला होता.

                   सन : १९१८ मध्ये त्यांनी खेडा सत्याग्रहाचे यशस्वी नेतृत्व केले होते. सन : १९२८ मध्ये त्यांनी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते.बारडोली सत्याग्रहाच्या यशामुळे त्यांना तेथील महिलांनी ‘सरदार’ ही पदवी दिली. ते गांधीजींचे एक निष्ठावान अनुयायी आणि विश्वासू सहकारी होते. सन : १९३१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.त्यांनी असहकार आंदोलन,दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता.स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान बनले.

         सरदार वल्लभभाई पटेल यांची सर्वात मोठी आणि महत्त्वाची कामगिरी म्हणजे ५६२ हून अधिक लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करणे.त्यांनी कोणत्याही रक्तपाताशिवाय, आपल्या मुत्सद्देगिरीने आणि दृढनिश्चयाने हे प्रचंड कार्य पूर्ण केले.जुनागढ,हैदराबाद आणि काश्मीरच्या प्रश्नांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन करण्यासाठी त्यांनी ‘ऑपरेशन पोलो’ ही पोलीस कारवाई केली. एकसंघ आणि मजबूत भारत निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यांसारख्या अखिल भारतीय सेवांची स्थापना केली. याच कारणामुळे त्यांना ‘भारताच्या प्रशासकीय सेवांचे जनक’ असेही म्हटले जाते . त्यांचे विचार अत्यंत स्पष्ट आणि परखड होते.त्यांच्या दृढ निश्चयी स्वभावामुळे त्यांना ‘लोहपुरुष’ हे नाव मिळाले.दि.१५ डिसेंबर १९५० रोजी त्यांचे मुंबईत त्यांचे निधन झाले.त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना १९९१ मध्ये भारतरत्न (मरणोत्तर) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ 

(National Unity Day) म्हणून साजरी केली जाते. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठी त्यांचे भव्य ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारले आहे. हे जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे आणि ते भारताच्या एकात्मतेचे प्रतीक आहे.सरदार पटेल हे राष्ट्र निर्माते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जातात.

           हा राष्ट्रीय एकता दिवस देशाची एकता,अखंडता आणि सुरक्षितता मजबूत करण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतात पाळला जातो.राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी काही उपक्रम महत्त्वाचे आहेत. या दिवशी ‘रन फॉर युनिटी’ (Run For Unity) चे आयोजन करण्यात येते. मोठ्या प्रमाणावर एकता दौड आयोजित केली जाते. यामध्ये विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक उत्साहाने सहभागी होतात.या एकता दौडीचा मुख्य उद्देश एकतेचा संदेश सर्वदूर पोहोचविणे हा आहे. या दिवशी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली जाते.शाळा,महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि इतर संस्थांमध्ये राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकतेची प्रतिज्ञा (शपथ) घेतली जाते.या शपथेमध्ये देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता राखण्याची तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन देशाच्या आंतरिक सुरक्षेसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येते.त्यांच्या योगदानावर आधारित भाषणे, परिसंवाद (seminars) आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात,ज्यामुळे ‘विविधतेत एकता’ (Unity in Diversity) हा संदेश अधिक वृद्धिंगत होतो.

             प्रत्येक राज्याच्या राजधानीत ‘एकता मॉल’ उभारण्यास प्रोत्साहन देणे,जिथे विविध राज्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.

राष्ट्रीय एकता दिवस साजरा करणे हे केवळ एक औपचारिकता नसून सरदार पटेलांनी देशासाठी पाहिलेल्या अखंड आणि सशक्त भारताच्या स्वप्नाची आठवण ठेवण्याची आणि त्या दिशेने कार्य करण्याची एक बांधिलकी आहे.

          राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देशातील लोकांमध्ये ऐक्य आणि बंधुत्वाची भावना निर्माण करते. जी त्यांना धर्म,जात,भाषा किंवा प्रादेशिक भेद विसरून एकत्र आणते.राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी युवक विविध उपक्रम करू शकतात.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित निबंध लेखन,भाषणे किंवा चित्रकला स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यावा. एकतेचे महत्त्व सांगणारी पथनाट्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करावी.’रन फॉर युनिटी’ (Run for Unity) मध्ये सक्रीयपणे सहभागी व्हावे. विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रे किंवा परिसंवादांचे आयोजन करावे.या उपक्रमांनी युवकाना एकतेचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल.राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥ भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

लोहपुरुषांना । करितो नमन ।

करांनी वंदन । कोटी कोटी ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here