Home महाराष्ट्र ओबीसी समाजातील तरुण महिला डॉ. संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा-ज्येष्ठ पत्रकार अविनाश...

ओबीसी समाजातील तरुण महिला डॉ. संपदा मुंढे प्रकरणातून घ्यायचा धडा-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

303

✒️जगदीश का.काशिकर(मो:-९७६८४२५७५७)

दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजातील तरुण महिला डॉक्टर संपदा मुंढे हिच्या आत्महत्येमुळे उभा महाराष्ट्र सध्या हादरलेला आहे. आत्महत्या करताना संपदाने आपल्या तळहातावर जी सुईसाईड नोट लिहिल्याचे आढळून आले आहे, ते बघता एकूणच पोलीस, प्रशासन आणि राजकीय नेत्यांसंबंधी एक प्रश्नचिन्हच निर्माण झालेले आहे. अशावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी तर व्हायलाच हवी, आणि भविष्यात असे प्रकार घडायला नकोत यासाठीही पावले उचलली जायला हवीत, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होते आहे. 

संपदा ही बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगी, लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे ती संघर्ष करूनच एम बी बी एस परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर काही काळ महाबळेश्वरला नोकरी केल्यानंतर तिची नियुक्ती सातारा जिल्ह्यातील फलटणच्या ग्रामीण रुग्णालयात झाली होती. तिथे तिला जे काही अनुभव आले त्याचेच पर्यावसान तिच्या आत्महत्येत झाले असे बोलले जात आहे.

संपदा ने आपल्या हातावर लिहून ठेवलेल्या मध्ये तिथल्याच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि स्थानिक नागरिक राकेश बनकर यांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. पैकी गोपाळ बदनेने तिच्यावर चारदा बलात्कार केला आणि राकेश बनकर हा सुमारे चार महिने तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता असे तिने म्हटले आहे. याशिवाय संपदाची नातेवाईक आणि इतरांनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत त्यानुसार पोलिसांनी एखाद्या आरोपीला अटक केल्यावर त्याच्या फिटनेससाठी रुग्णालयात नेले जाते, तेव्हा फिट नसतानाही फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी तिच्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता असे सांगितले आहे. तिथल्या खासदाराच्या स्वीय सहाय्यकाने एका पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी देखील तिच्यावर दबाव आणल्याची तक्रार केली जात आहे. संपदा पोलिसांना सहकार्य करत नाही अशा आरोपावरून तिच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील सुरू झाली होती. या चौकशीत उत्तर देताना तिने जे काही लिहिले आहे ते पत्र देखील इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसारित केले आहे. त्यात झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून होणारा शारीरिक आणि मानसिक अत्याचार तसेच राजकीय नेत्यांकडून येणारा दबाव विभागीय चौकशी आणि इतर ताणतणाव यामुळे त्रस्त होऊन आपण एखादे दिवशी आत्महत्या करू असेही संपदा बोलत होती असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. या प्रकारात आपले काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी शासन त्याला जबाबदार असेल असेही तिने विभागीय चौकशी च्या आरोपांना उत्तर देणाऱ्या पत्रात नमूद केले आहे. हे बघता आपले प्रशासन किती घसरले आहे हे लक्षात येते. 

मला आठवते कॉलेजमध्ये शिकत असताना नागपूर जिल्ह्यातील एका खेड्यात एका समाजसेवा शिबिरासाठी आम्ही जवळजवळ ५० विद्यार्थी एकत्र गेलो होतो. तिथे आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही ऐनवेळी सुचलेले एक नाट्य करण्याचे ठरवले. त्यात एका खेडेगावात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात एक महिला डॉक्टर कामावर रुजू होण्यासाठी येते, आणि तिथे येताच एक तरुणी इथे डॉक्टर म्हणून आली आहे हे बघून गावातले राजकारणी, गावगुंड, अधिकारी तिच्याकडे कशा बुभुक्षित नजरांनी बघतात आणि तिला कसे छळतात हे त्या नाट्यात आम्ही सादर केले होते. अर्थात तो सर्व प्रकार काल्पनिक होता. मात्र आज संपदा मुंडे प्रकरणात जे काही वास्तव कानावर येते आहे, ते बघता ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला डॉक्टरांवर असे प्रसंग वारंवार ओढवत असणार ही स्पष्ट दिसते आहे. 

पोलीस हे समाजाचे संरक्षण करण्यासाठी असतात. अशा अबला महिलांना संरक्षण देणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते. पण जर कुंपणच शेत खाणार असेल तर आता विश्वास कोणावर ठेवायचा हा देखील मुद्दा उपस्थित होतो. आपल्याकडे कितीही नाही म्हटले तरी सामान्य माणसाला पोलिसांचा चांगलाच धाक असतो. पोलिसाला म्हणजेच एखाद्या कॉन्स्टेबलला कनिष्ठ दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असे म्हटले जाते. जाणकारांच्या मतानुसार एखाद्या कॉन्स्टेबलने जर एखाद्या निरपराध माणसाला एखाद्या गुन्ह्यात अडकवायचे ठरवले तर तो सहज अडकवू शकतो, आणि त्याला काही काळ तुरुंगात डांबू शकतो, आणि नंतर वर्षानुवर्षे कोर्टाच्या चक्रा मारायला लावू शकतो. अखेर पर्यंत त्या निरपराध माणसाच्या डोक्यावर टांगती तलवार तो कॉन्स्टेबल ठेवू शकतो. शेवटी भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती होऊन जाते आणि तो सामान्य माणूस त्या पोलिसाला तो मागेल ते द्यायला तयार होतो.प्रशासनात खालच्या व्यक्तींना मनाप्रमाणे कागद तयार करून वरच्यांना सादर करायला लावण्यासाठी हवा तसा दबाव आणता येतो असे प्रशासनातलेच जाणकार म्हणतात. अशावेळी मनाप्रमाणे फिटनेस सर्टिफिकेट द्यायला पोलिसांनी दबाव आणला असू शकतो. त्यामुळे हा आरोपही नाकारता येत नाही. तसेच राजकीय व्यक्ती बरेचदा सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या मनाप्रमाणे काम करायला बाध्य करू शकतात. त्यासाठीही दबाव आणला जाऊ शकतो. अन्यथा अशा न ऐकणाऱ्या अधिकाऱ्याची कुठेतरी दूर बदली केली जाते आणि त्याला त्रास दिला जातो. साताऱ्यात सध्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत. मात्र त्या परिसरात जी चर्चा आहे त्यानुसार संपदावर दबाव माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर पाटील यांच्या स्वीय सहायकाने आणला असल्याचे बोलले जात आहे. आता खरे खोटे काय ते चौकशीत समोर येईलच. मात्र तोवर तरी अशा कंड्या पिकवल्या जाणार हे नक्की. त्याचवेळी संपदाच्या चारित्र्याविषयी देखील खऱ्या खोट्या अफवा देखील पसरवल्या जातील आणि तिला मृत्यूनंतरही बदनाम केले जाईल ही शक्यता देखील नाकारता येत नाही.

इथे काही प्रश्नही निर्माण होत आहेत. संपदा ही ग्रामीण भागात एका कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. मात्र तिचा मृतदेह फलटण मधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. तिथेच तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. संपदाने या हॉटेलमध्ये येऊनच आत्महत्या का करावी असा प्रश्न निर्माण होतो. त्या हॉटेलमध्ये आधी तिच्यावर कोणी अत्याचार तर केला नसेल ना हा मुद्दाही विचारात घ्यायला हवा. कदाचित अजूनही काही वेगळा प्रकार तर नव्हता ना याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. 

इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर संपदाविरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीत तिने जे आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले होते ते प्रसारित झाले आहे. त्यात तिने अनेक मुद्दे उपस्थित केल्याचे म्हटले आहे. त्या मुद्द्यांवर प्रशासनाने वेळीच का चौकशी केली नाही हा देखील प्रश्न निर्माण होतो. जर एक तरुण महिला डॉक्टर घरदार सोडून इतक्या दूर येऊन रुग्णसेवा देते तर तिला येणाऱ्या समस्यांबाबत सखोल चौकशी करून त्यावर तत्काळ उपाययोजना व्हायला हव्या होत्या आणि तिला दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे का झाले नाही हे वास्तव देखील समोर यायला हवे. 

आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संपदाने पोलीस मध्ये देखील तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता असे काही माध्यमांनी म्हटले आहे. हे जर खरे असेल तर पोलिसांनीही चौकशी का केली नाही हा देखील प्रश्न निर्माण होतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सातारचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलिसांचीच बाजू सावरून घेताना दिसले. मात्र त्यावेळी एका निष्पाप निरपराध तरुणीचा जीव गेला आहे याचा त्यांनी विचार का केला नाही हा प्रश्नही निर्माण होतो.

हा सर्वच प्रकार बघता आज प्रशासन किती सडलेले आहे आणि आपली राजकीय व्यवस्था देखील किती भ्रष्ट झालेली आहे याचा अंदाज येऊ शकतो. संपदाच्या मृत्यूची बातमी येताच त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चक्क गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने या प्रकारात लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ताबडतोब गोपाल बदनेला निलंबित करावे असे आदेश दिले असून त्याचे पालनही झाले आहे. प्रस्तुत लेख लिहीत असताना राकेश बनकर ला अटक झाली होती. मात्र गोपाल बदने फरार असल्याचे सांगितले गेले आहे. तोही लवकरात लवकर सापडावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच जनसामान्यांची अपेक्षा आहे. 

त्याचबरोबर असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार आणि समाज म्हणूनही आपण काय करणार यावरही विचार व्हायला हवा. आज समाजात स्त्री आणि पुरुष यांना समान दर्जा दिलेला आहे. महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या देखील पुरुषांप्रमाणेच उच्च शिक्षण घेऊन समाजात वावरत आहेत. मात्र तरीही अशा उच्च शिक्षित स्त्रियांकडे देखील समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन एक भोगदासी असाच असतो. आज या महिलांना अशा ग्रामीण भागात नोकरीसाठी किंवा प्रसंगी शिक्षणासाठी सुद्धा जावे लागते. मात्र तिथे त्यांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसते. त्याचवेळी समाजातील काही सज्जनशक्ती सोडली तर उर्वरित सर्वच बुभुक्षित लांडगे तिचे लचके तोडायला तयार असतात आणि बाकी जनसामान्य तिलाच दोषी ठरवून तिच्यावर टीका करायला आणि तिलाच वाईट चालीची ठरवायला आपली जीभ असेल सोडत असतात. मात्र खरे वास्तव कुणीच जाणून घेत नाही. 

अशावेळी अशा महिला कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांचे प्रसंगी लैंगिक शोषण करणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारे आणि त्यांच्यावर दबाव आणत त्यांच्या स्त्री सुलभ दोर्बल्याचा फायदा घेऊन आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणारे अधिकारी, राजकीय नेते आणि गावगुंड यांच्यावर वचक बसेल अशी कठोर व्यवस्था उभी व्हायला हवी. या प्रकरणातही जे दोषी असतील त्या प्रत्येकाला कठोर शासन व्हायलाच हवे. तसे झाले तरच मृतक डॉक्टर संपदा मुंडे च्या आत्म्याला खरीखुरी शांती मिळेल. 

तसे झाले नाही तर कदाचित उद्या भविष्यात कोणीही आईबाप आपल्या तरुण मुलींना उच्च शिक्षण द्यायलाही घाबरतील आणि जरी त्या उच्चशिक्षित झाल्या तरी त्यांना अशा परगावी नोकरीसाठी पाठवायलाही घाबरतील. तसे झाले तर स्त्रियांच्या प्रगतीला ते अडथळा आणणारे ठरेल, हे देखील विचारात घ्यायला हवे. त्यामुळेच समाजाने आणि प्रशासनाने या संदर्भात वेळीच कडक निर्णय घेऊन पावले आजच उचलायला हवीत. उद्या कदाचित उशीर झालेला असेल.

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येपासून हाच धडा आपण सर्वांनी घ्यायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here