Home अमरावती २९ ऑक्टोबर जागतिक इंटरनेट दिन

२९ ऑक्टोबर जागतिक इंटरनेट दिन

153

जागतिक इंटरनेट दिन (International Internet Day) २९ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.हा दिवस इंटरनेटच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जात असतो. दि .२९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटचा पूर्वज असलेल्या अर्पानेट (ARPANET) द्वारे पहिला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवण्यात आला होता. ‘अर्पानेट’ (Advanced Research Projects Agency Network) हे अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या संशोधन प्रकल्पाचा भाग होते.या प्रकल्पाचा उद्देश दूरवरच्या संगणकांना जोडून संदेशवहनाची गुप्त व्यवस्था निर्माण करणे हा होता. कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) आणि स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (SRI) यामधील संगणक सुरुवातीला जोडले गेले.चार्ली क्लिहने (Charley Kline) या संगणकप्रणाली निर्मात्याने UCLA मधून SRI येथील संगणकावर संदेश पाठवला. संदेश पोहोचला,ही घटना दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठी क्रांती ठरली.याच घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘ जागतिक इंटरनेट दिन ‘ साजरा केला जातो.पहिला आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस दि.२९ ऑक्टोबर २००५ रोजी साजरा करण्यात आला होता.

              इंटरनेटमुळे जगाच्या माहिती आणि संवादामध्ये मोठे बदल घडले आहेत.या तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आणले आहे. आज इंटरनेट मानवी जीवनातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे.शिक्षण,व्यवसाय,आरोग्य, मनोरंजन अशा बहुतेक सर्वच क्षेत्रांमध्ये इंटरनेटचा वापर अनिवार्य झालेला आहे.इंटरनेट म्हणजे जगभरातील लाखो संगणकांचे एक मोठे जाळेच आहे.जे एकमेकांमध्ये माहितीची देवाणघेवाण करते.मजकूर,चित्रे, व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात माहिती आणि डेटाचे हस्तांतरण करण्यास अनुमती देणारी एक जागतिक पायाभूत सुविधा म्हणजे इंटरनेट होय.

                इंटरनेटमुळे ज्ञानाची मक्तेदारी संपून माहितीचा मोठा स्रोत सर्वांसाठी खुला झालेला आहे.यामुळे या प्रणालीला खरीखुरी लोकशाही प्रणाली देखील म्हटले जाते.भारतात १९९५ च्या सुमारास इंटरनेट सेवा उपलब्ध झाली.सध्या ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (IoT) आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार इंटरनेटच आहे.

            जगातील बहुतांश लोकसंख्या आज इंटरनेटचा वापर करीत आहे. इंटरनेट दिन हा इंटरनेटचे महत्त्व सर्वदूर पोहोचविण्यासाठी सजरा केला जातो,याशिवाय इंटरनेटच्या इतिहासाची माहिती देणे आणि त्याबद्दलची जागृती वृद्धिंगत करणे.या दिवशी अनेक ठिकाणी इंटरनेटचे महत्त्व,फायदे आणि आव्हाने यावर चर्चासत्र आयोजित केली जातात.या चर्चासत्रामध्ये सायबर सुरक्षा (Cyber Security) आणि जबाबदार इंटरनेट वापराविषयी माहिती दिली जाते.इंटरनेटमुळे माहिती तंत्रज्ञान (IT) आणि डिजिटल अर्थव्यवस्था (Digital Economy) या क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे.इंटरनेटने वेळेची आणि अंतराची बंधने पूर्णपणे तोडून जगाचे एका वैश्विक गावामध्ये रूपांतर 

केलेले आहे. इंटरनेटने मानवाला नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. २९ ऑक्टोबर हा दिवस इंटरनेटने मानवाला ज्या ज्या महान संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत या इंटरनेटच्या महान देणगीचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे.

        इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, पण त्या बऱ्याचदा एकमेकांच्या पूरक म्हणून काम करतात.

इंटरनेट हे माहितीचे जाळे (A Network of Information) आहे असून जगभरातील संगणक,सर्व्हर आणि उपकरणांना जोडणारे ते एक विशाल नेटवर्क आहे. इंटरनेटचा उपयोग माहिती साठवणे, प्रसारित करणे आणि ॲक्सेस करण्यासाठी होतो तसेच लोकांना संवाद साधण्यासाठी आणि संसाधने (Resources) शेअर करण्यासाठी माध्यम (Medium) पुरवते.उदा .: वेबपेजेस पाहणे,ईमेल पाठवणे, ऑनलाइन शॉपिंग करणे,सोशल मीडियावर बोलणे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence – AI)AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता.

 AI हा तंत्रज्ञानाचा एक भाग (A Branch of Technology) आहे, ज्यामध्ये संगणक प्रणाली मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करतात. AI प्रणाली शिकू शकतात, समस्या सोडवू शकतात,निर्णय घेऊ शकतात, भाषा समजू शकतात आणि डेटाचे विश्लेषण करू शकतात.

 उदाहरण: व्हर्च्युअल असिस्टंट्स (उदा. सिरी, अलेक्सा), शिफारस प्रणाली (Netflix, Amazon), चेहऱ्याची ओळख (Facial Recognition), Chat GPT सारखे भाषिक मॉडेल.AI ला चालवण्यासाठी आणि डेटा मिळवण्यासाठी इंटरनेट हे प्लॅटफॉर्म पुरवते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करून AI अनेक सेवा सुधारते आणि स्वयंचलित करते. इंटरनेट हे माहितीचा रस्ता आहे, तर AI हा त्या रस्त्यावर चालणारा बुद्धिमान चालक आहे. AI हे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करून जास्त उपयुक्त आणि प्रभावी बनते.

              कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर हा घातक ठरतोच.इंटरनेटच्या बाबतीत सुद्धा आज तेच घडत आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानवाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे.ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे तरुण पिढी अभ्यासापासून दूर जात आहे.इंटरनेटमुळे लोकांमध्ये प्रत्यक्ष संवाद कमी होऊन एकटेपणा वाढत आहे.इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अयोग्य माहितीमुळे समाजात गैरसमज आणि द्वेष पसरतो.ऑनलाइन फसवणूकीसारख्या घटनांमुळे लोकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.सोशल मीडियामुळे अनेक लोक खोट्या दिखाव्यात आणि अनावश्यक स्पर्धेत अडकले जात आहेत.इंटरनेटच्या अतिवापराने एकाग्रता कमी होऊन स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होत आहे.खाजगी माहिती आणि डेटा चोरीला जाण्याची भीती नेहमीच असते,ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.इंटरनेटमुळे अनेक लोक कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबासोबत असतानाही मोबाइलमध्ये व्यस्त राहतात, ज्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.इंटरनेटमुळे तंत्रज्ञानावर जास्त अवलंबित्व वाढले आहे, ज्यामुळे माणसाची स्वतःची विचार करण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची सवय कमी होत आहे.

                इंटरनेट माहितीचा अमूल्य स्रोत आहे,ज्यामुळे ज्ञान मिळविणे खूप सोपे झाले आहे.

 इंटरनेट जगाला जोडणारे महत्त्वपूर्ण साधन झाले आहे, ज्यामुळे दळणवळण (Communication) जलद आणि खूप सोपे झाले आहे.

 इंटरनेटमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे.Online Education मुळे घरापासून दूर न जाता शिक्षण घेणे शक्य झाले आहे. इंटरनेटमुळे घरबसल्या खरेदी करणे (Online Shopping) आणि बँकांची कामे करणे शक्य झाले आहे.

 इंटरनेट मनोरंजन आणि माहितीचा खजिना आहे (उदा. चित्रपट,गाणी,बातम्या व इतर).

व्यवसायासाठी (Business) इंटरनेट नवीन संधी आणि ग्राहक मिळवून देणारे ठरले आहे. इंटरनेटच्या मदतीने जगात कोठेही असलेल्या लोकांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते.

सरकारी योजना आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे लोकांना सुविधा मिळाली आहे. आरोग्यविषयक माहिती आणि डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला सुद्धा घेता येतो.संकटाच्या वेळी लोकांना एकत्र आणण्यास आणि मदतीचे जाळे विणण्यास इंटरनेट फार मोठी मदत करीत आहे.अशा प्रकारचा इंटरनेटचा सदुपयोग करून इंटरनेट दिन साजरा करू या.

     इंटरनेट दिनाच्या सर्व 

      इंटरनेट युजर्सना 

      हार्दिक शुभेच्छा ॥

   महानुभाव ग्रंथोत्तेजक साहित्य  

             अलंकार पुरस्कार प्राप्त

               साहित्यिक

  ✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here