Home नागपूर शासनकर्ती जमात : स्वाभिमानाचा प्रवास आणि संघर्षाचा संकल्प

शासनकर्ती जमात : स्वाभिमानाचा प्रवास आणि संघर्षाचा संकल्प

141

भारतात आज प्रत्येक घटक सत्तेच्या केंद्रात पोहोचण्याची आकांक्षा बाळगतो. पण शासनकर्ती जमात बनणे म्हणजे केवळ निवडणुकीत जिंकणे नाही, तर विचाराने, संघटनाने आणि आत्मभानाने समाजाला दिशा देणे होय. केवळ संख्या नाही, तर सामर्थ्य, एकजूट आणि जागृती हाच खरा सत्तेचा पाया आहे. कारण संख्येने मोठे असणे पुरेसे नाही, विचाराने, संघटनेने आणि कृतीने सक्षम बनल्याशिवाय सत्ता हातात येत नाही. अंतर्गत मतभेद आणि उपगटवाद जे थांबवतात प्रवास. आपला समाज उपजतच विभागला गेला आहे. जात, पंथ, संस्था आणि अहंकार यांच्या भिंतींनी. “आपण सारे एक” ही भावना अजूनही कृतीत उतरलेली नाही. नेतृत्वाचा अभाव आणि सत्तालालसा मुळे खरे लोकनेते मागे पडतात, संधीसाधू पुढे येतात. नेतृत्व ही जबाबदारी नव्हे तर प्रतिष्ठेची जागा बनली आहे. जनतेचा विश्वास या स्वार्थी खेळांमुळे हरवत चालला आहे. शिक्षण आणि अर्थव्यवस्थेतील कमजोरीमुळे शासन हे ज्ञानावर आणि संपन्नतेवर उभे असते. शिक्षणाचा प्रकाश आणि आर्थिक स्वावलंबन हेच सत्तेचे खरे शस्त्र आहेत. जे आजही अनेकांना न मिळाल्याने समाज निर्णयक्षम होत नाही. धर्म, भाषा, प्रांत आणि जातीच्या नावाखाली समाजात फूट पाडली जाते. एकजूट मोडली की सत्ता हातातून निसटते. “आपण सत्तेसाठी जन्मलो नाही” ही मानसिक गुलामी अजूनही टिकून आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही तर इतर आपल्या भविष्यावर नियंत्रण ठेवतील.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्रिसूत्रीची आज सर्वाधिक गरज आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. विचारशक्ती आणि विवेक विकसित केला तर कोणताही समाज झुकत नाही. सत्ता टिकवायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य अनिवार्य आहे. उद्यमशीलता, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यात सहभाग वाढवावे लागेल. वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवा. सामूहिक विचार, सामूहिक निर्णय आणि सामूहिक नेतृत्व यांवर भर द्यावे लागेल. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात संघटनाचे बी पेरा. वाचनसंस्कृती, संवाद आणि बौद्धिक प्रबोधन वाढवावे लागेल. आपल्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे. आत्मसन्मानाचा जाज्वल्य भाव निर्माण झाला की सत्ता आपोआप आकर्षित होते.

          शासनकर्ती जमात होणे हा प्रवास एका पिढीचा नाही, तर शतकांचा संघर्ष आहे. पण या संघर्षात जर आपण विचार, संघटन आणि आर्थिक बळ या त्रिसूत्रीला स्वीकारले, तर तो दिवस दूर नाही, जेव्हा आपण केवळ मतदार नव्हे, तर सत्ताधारी आणि निर्णयकर्ते म्हणून इतिहास लिहू.

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here