Home अमरावती जागतिक कलाकार दिनाचे महत्त्व

जागतिक कलाकार दिनाचे महत्त्व

146

 कलाकार दिनी ।

        करू या सलाम ॥

        करांनी प्रणाम ।

        कलाकारा ॥

       जागतिक कलाकार दिन दि.२५ ऑक्टोबरला संपूर्ण जगात साजरा होत असतो.

कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणे व कलेचा उत्सव साजरा करणे हा उद्देश या दिवसाचा आहे.या दिवसाची सुरुवात कॅनेडियन कलाकार क्रिस मॅकक्लर यांनी दि.२५ ऑक्टोबर २००४ मध्ये केली. जगप्रसिद्ध महान चित्रकार यांच्या दि.२५ ऑक्टोबर १८८१ ला पाब्लो पिकासो यांच्या जयंती दिनी जागतिक कलाकार दिन साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.पाब्लो पिकासो हे २० व्या शतकातील सर्वात प्रभावी आणि क्रांतिकारी कलाकारांपैकी एक मानले जातात.कलाकार आपल्या सर्जनशीलतेने आणि प्रतिभेने समाजाला एक नवी दिशा देत असतात. चित्रकार, शिल्पकार,संगीतकार, नर्तक, लेखक,छायाचित्रकार आणि इतर सर्व कलाकारांचा यात समावेश होतो.चित्रकार आपल्या चित्रातून शिल्पकार आपल्या शिल्पकलेतून,संगीतकार आपल्या संगीतातून, नर्तक आपल्या नृत्यातून, लेखक आपल्या लेखातून ,कादंबरीतून कथेतून, कवितेतून,अभंगातून, नाटकातून ,छायाचित्रकार आपल्या चित्रकारितेतून आणि विविध कलाकार आपल्या कलाकृतीतून समाजाला विविध प्रकारचे संदेश देत असतात.हे सर्व कलाकार आपल्या कला कृतीतून समाजप्रबोधनच करीत असतात.

        प्रबोधन कार्य ।

       कलाकृतीतून ॥

       करू या सन्मान ।

       कलाकार ॥

      कला ही केवळ मनोरंजन नाही, तर ती मानवी भावनांची आणि विचारांची अभिव्यक्ती आहे.कलाकारांच्या कार्यामुळे सभोवतालचे जग अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनते.

कलाकार हे आपल्या कलाकृतीतून इतिहास,संस्कृती आणि परंपरा जतन करीत असतात.कला ही भूतकाळाला वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. कलाकारांचे कार्य समाजात आशा, प्रेरणा आणि सकारात्मकता निर्माण करीत असते.ते आपल्या कार्यातून सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतात आणि परिवर्तनाला प्रोत्साहन देतात.उदा : झाडाला दोन्ही हाताने कवटाळून ठेवणारा एक बालक हे चित्र समाजाला संदेश देत असते की, झाडाला मारू नका, कापू नका तर वृक्षारोपण करा, वृक्षसंवर्धन करा अशी वृक्षारोपणाची प्रेरणा कलाकाराने काढलेल्या अशा छायाचित्रातून समाजाला मिळत असते.एका कलाकाराला आपली कला जगासमोर आणण्यासाठी अनेकदा मोठा संघर्ष सुद्धा करावा लागतो.

        जागतिक कलाकार दिवस हा कलाकारांचे परिश्रम आणि समर्पण ओळखण्यासाठी एक विचारमंच उपलब्ध करून 

देणारा आहे.जागतिक कलाकार दिनानिमित्त विविध ठिकाणी कला प्रदर्शने, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यामुळे सामान्य लोकांना कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते.कला शिक्षण आणि कलेच्या महत्त्वाविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.कला विविध संस्कृती आणि भाषांमधील लोकांना एकत्र आणते ज्यामुळे जागतिक एकोपा वाढतो.अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना या दिवसाला पाठिंबा देतात आणि तो साजरा करतात.

कलाकारांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना सन्मानित करणे आवश्यक आहे.

कलेमुळे माणसाची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होते. हा दिवस आपल्याला आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रेरित करीत असतो.

        कलाकृतीतून ।

        मिळे मनःशांती ॥

        जोडू सर्व नाती ।

        कलेशीच ॥

        कला मानसिक शांती आणि भावनिक आधार प्रदान करीत असते.कलेचे प्रकार खूप आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे सौंदर्य आहे.जे सर्वसामान्य माणसाला आकर्षित करीत असते.या दिवशी आवडत्या कलाकारांना पाठिंबा देऊन त्यांच्या कलाकृतींचा आदर केला पाहिजे.जागतिक कलाकार दिनी स्थानिक कलाकारांना भेट देणे, त्यांची कला खरेदी करणे किंवा कला दालनांना भेट देणे आवश्यक आहे .यामुळे कलाकारांचा उत्साह द्विगुणित होतो.त्यांना नवनवीन कला निर्माण करण्याची प्रेरणा मिळते.

        कला दालनांना ।

        सर्व देऊ भेटी ॥

        कलाकारांसाठी ।

         प्रेरकच ॥

जागतिक कलाकार दिन हा कलेच्या अविश्वसनीय सामर्थ्याचे आणि तिच्या योगदानाचे स्मरण करून देणारा दिवस आहे. कलेशिवाय मनुष्याचे जीवन रंगहीन आणि नीरस होईल.

       जागतिक कलाकार दिनी सर्व कलाकारांच्या योगदानाला सलाम आणि सर्व कलाकारांना या जागतिक कलाकार दिनी हार्दिक शुभेच्छा ॥ आणि दि.25 ऑक्टोबर 2025 रोजी असलेल्या महान चित्रकार पाब्लो पिकासो यांना त्यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

      कलाकार दिनी ।

      हार्दिक शुभेच्छा ॥

      मनस्वी सदिच्छा ।

      सर्वांनाच ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here