


▪️’देऊ जगण्याचे बळ’ हा सामाजिक उपक्रम :
▪️भाऊबीजनिमित्त पूरग्रस्त महिलांना साडी-चोळी
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.23ऑक्टोबर):-झपाट्याने बदलणाऱ्या या युगात, विज्ञान-तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीसोबतच माणुसकीचे नाते अधिक घट्ट विणणे गरजेचे बनले आहे. समाजात विविध स्तर, मतभेद, स्पर्धा आणि स्वार्थ यांचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. पण, याच परिस्थितीत एकमेकांच्या दु:खात सहभागी होणे, मदतीचा हात पुढे करणे आणि सहजीवनाची भावना वाढवणे हेच खरे सामाजिक भान आहे. सामाजिक बांधिलकी म्हणजे केवळ दानधर्म नव्हे, तर समाजाच्या सर्व घटकांना समान संधी, आदर आणि सन्मान देण्याची वृत्ती जोपासणे होय. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
शहरातील धैर्य मंगल कार्यालय येथे आयोजित ‘देऊ जगण्याचे बळ’ या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पूरग्रस्त भागातील १०० महिला भगिनींना साडी चोळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. दीपावली भाऊबीज व डॉ.सूर्यकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन व परभणी आय.सी.यु यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीशी नाते सांगून गेल्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याबद्दल आ.डॉ.गुट्टे यांनी आयोजकांचे कौतुक केले.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण किंवा आपत्तीग्रस्तांना मदत ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे
प्रत्येक क्षेत्रात सामूहिक जबाबदारीची भावना जागृत झाली, तर समाज अधिक सक्षम, संवेदनशील आणि समृद्ध होईल. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाने आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प घेतला, तर सामाजिक बांधिलकी ही केवळ शब्दरचना न राहता, आपल्या संस्कृतीचा जिवंत श्वास ठरेल. आपल्या समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचे बळ देण्यासाठी संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन अतिशय कौतुकास्पद काम करत आहे, याचा अभिमान वाटतो.
समाजातील प्रत्येक घटकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून एकमेकांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण देणे हीच खरी दीपावली आहे. ज्यावेळी समाजातील एका वर्गाला मदतीची गरज असते, तेव्हा प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्था जर पुढे येतात, तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडते. ‘देऊ जगण्याचे बळ’ हा उपक्रम त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. अशा उपक्रमांतून सामाजिक एकोपा, मानवता आणि परस्परांना सहकार्य भावनेचा दीप खऱ्या अर्थाने उजळतो. त्यामुळे या कार्यक्रमाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, यंदाच्या दीपावलीला ‘देऊ जगण्याचे बळ’ या उपक्रमाने माणुसकीचा प्रकाश प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित केला आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी नमूद केले.
दरम्यान ‘सेवा हाच आपला सण’ या भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून दीपावली आणि भाऊबीजच्या शुभप्रसंगी समाजातील वंचित, पूरग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात देत राहण्याची सातत्यपूर्ण परंपरा आयोजकांनी जपली आहे. त्यामुळे ‘देऊ जगण्याचे बळ’ हा उपक्रम फक्त सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीचा सेतू ठरत आहे. यावेळी गुट्टे काका मित्र मंडळाचे मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














