Home महाराष्ट्र संघ प्रचारक ते एक चांगले लेखक आणि कवी-लक्ष्मीनारायणजी भाला यांचे बाबत ज्येष्ठ...

संघ प्रचारक ते एक चांगले लेखक आणि कवी-लक्ष्मीनारायणजी भाला यांचे बाबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

164

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या वाटचालीत त्यांच्या प्रचाराकांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. संघ प्रचारक हे तरुण वयातच घरदार सोडून संघ प्रचाराला जात असत. त्यातले अनेक प्रचारक हे कौटुंबिक सुस्थितीतले असायचे आणि उच्चशिक्षितही असायचे. मात्र संघाला अभिप्रेत असलेले राष्ट्रकार्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन हे तरुण उच्चशिक्षित असतानाही कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय न करता घरापासून दूर परक्या प्रदेशात जाऊन मिळेल ते खाऊन, आणि मिळेल तिथे झोपून दिवस काढायचे, आणि संघकार्य करायचे असे जीवन जगत असत. त्यातील काही प्रचारक ठराविक काळानंतर परिवारात परत यायचे आणि संसारी आयुष्यही जगायचे. मात्र काही प्रचारकांनी आपले संपूर्ण जीवनच संघाला देऊन टाकले होते.

असेच आपले संपूर्ण जीवन संघाला देऊन टाकणारे माझ्या संपर्कात आलेल्या काही प्रचारकंपैकी एक प्रचारक म्हणजे लक्ष्मीनारायणजी भाला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जन्मलेले भालाजी अगदी थेट आसामपासून देशाच्या विविध भागात संघकार्य करत कार्यरत राहिले. येत्या जानेवारी महिन्यात भालाजी वयाची ८१ वर्षे पूर्ण करीत आहेत. अजूनही ते संघकार्यात सक्रियच आहेत. यानिमित्ताने चिखली येथे त्यांच्या इष्ट मित्रांनी डिसेंबरमध्ये त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित केला आहे

लक्ष्मीनारायणजी भाला यांचा आणि माझा परिचय झाला साधारणपणे २०११ मध्ये. त्यावेळी मी हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक वृत्तसंस्थेचा विदर्भाचा कार्यालय प्रमुख आणि विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. हिंदुस्थान समाचारचे कार्यालय माझ्याच घरी होते. हिंदुस्थान समाचार ही वृत्तसंस्था संघ परिवाराची आहे. संघ परिवाराच्या अशा संस्थांवर देखरेख करण्यासाठी संघ व्यवस्थेतून एखाद्या ज्येष्ठ प्रचारकाची नेमणूक केली जात असते. २०११ मध्ये हिंदुस्थान समाचारवर देखरेख करण्यासाठी संघाने लक्ष्मीनारायण भाला यांची नेमणूक केली होती. मला ही माहिती हिंदुस्थान समाचार दिल्ली कार्यालयाकडून देण्यात आली होती. आधी आधी श्रीकांतजी जोशी नावाचे एक ज्येष्ठ प्रचारक हिंदुस्थान समाचारवर देखरेख करण्यासाठी होतेच. भालाजी त्यांना सहकार्य करण्यासाठी आले होते.

२०११ च्या बहुदा एप्रिल महिन्यात अचानक माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून फोन आला. फोन उचलताच समोरच्या व्यक्तीने “अविनाश पाठक बोलताहेत का” असा प्रश्न केला. मी होकार देताच “मी लक्ष्मीनारायण भाला बोलतो आहे” असे उत्तर मिळाले. माझ्या लगेच लक्षात आले. मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी भालाजी नागपुरात आले होते, आणि दोन-तीन दिवस मुक्कामी राहणार होते. मला भेटून नागपूरचे हिंदुस्थान समाचारचे कार्यालय बघण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मग दुसऱ्या दिवशी साधारणतः दहा वाजता त्यांना भेटायचे असे ठरले. ठरल्यानुसार मी त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या स्कूटरवर त्यांना डबल सीट घेऊन कार्यालयात आलो. कार्यालयात असलेल्या मंडळींशी त्यांनी परिचय करून घेतला आणि पुढल्या योजना बाबत चर्चा सुरू केली. बोलता बोलता दुपारचा एक वाजला होता. जेवणाची वेळ झाली होती मग त्यांना आमच्या घरीच जेवायचा आग्रह केला. ते लगेच तयार झाले. कार्यालयातून घरात येताच घरच्या सर्व मंडळींशी त्यांनी ओळख करून घेतली. त्यावेळी माझी मुलगी दिव्येशा तेव्हा सहाव्या वर्गात शिकत होती. मग जेवता जेवता त्यांनी तिला काही गणिताची कोडी घातली आणि उत्तर शोधायला मदतही केली. थोड्याच वेळात त्यांनी दिव्येशाशी सुद्धा मैत्री जमवली. त्या दिवशी दुपारपर्यंत ते आमच्याकडे मुक्कामीच होते. मग दुपारी चारच्या सुमाराला त्यांना रेशीम बाग संघ कार्यालयात पुन्हा सोडून आलो होतो.

त्यानंतर भालाजींची आणि माझी नियमित भेट होऊ लागली. त्यावेळी माझे कालप्रवाहाच्या वळणांवरून आणि मागोवा घटितांचा असे दोन वैचारिक लेखांचे संग्रह प्रकाशित झाले होते. त्यात काही लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातही होते. भालाजींनी आवर्जून ते लेख लगेचच वाचले आणि त्या संदर्भात माझ्याशी चर्चा देखील केली होती.

हिंदुस्थान समाचार वेगवेगळ्या क्षेत्रात काही प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असे. त्याशिवाय हिंदुस्तान समाचार द्वारा संचालित पत्रकारिता कल्याण न्यासातर्फे दरवर्षी एका पत्रकाराला जीवनगौरव पुरस्कार देखील दिला जात असे. त्यावर्षी तो कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे सर्व संयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला सहकार्य करण्यासाठी भालाजी त्यावेळी काही दिवस नागपुरातच मुक्काम ठोकून होते. त्या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यायचे होते. मग भालाजींसोबत पुरेशी धावपळ करून आम्ही तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला होता. असे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचा मला फारसा अनुभव नव्हता. मात्र भालाजी पाठीशी उभे असल्यामुळे मला ते शक्य झाले होते.

२०१२ मध्ये हिंदुस्थान समाचारने नागपूरात एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्याचे निश्चित केले. या चर्चासत्राचा विषय होता “देशाच्या विकासात छोट्या राज्यांची भूमिका”. हे दिवसभराचे आयोजन आम्ही नागपूरच्या साई सभागृहात निश्चित केले होते. त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाचे डॉ. सुखदेव थोरात, तेलंगणातील एक नेते सी एच विद्यासागर राव यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी एकाएकाचे येऊ शकत नाही असे निरोप येऊ लागले. त्यावेळी मी चांगलाच अस्वस्थ झालो होतो. मात्र भालाजींनी पूर्ण परिस्थिती हाताळत तत्कालीन नागपुरातीलच काही मान्यवरांना हाताशी धरून ते चर्चासत्र यशस्वीरित्या पार पाडले. त्याच्या समारोपाला छत्तीसगडचे तत्कालीन मंत्री डॉ.रमणसिंह हे आले होते. रमणसिंह यांचे अखेरच्या क्षणापर्यंत अनिश्चितच होते. मात्र दोन दिवस आधी भालाजी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना तयार केले.

हिंदुस्थान समाचार ही संघ परिवारातली एक संस्था म्हणून ओळखले जाते. मात्र भालाजींच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आणि माझ्या संपर्कामुळे या कार्यक्रमात काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे विचारवंत मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. इतकेच काय पण रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे हे देखील एका सत्रात सहभागी झाले होते. एकूणच एका बाजूला भाजपाचे नेते तर दुसऱ्या बाजूला कधी काँग्रेसचे तर कधी डावे नेते आणि मध्येच काही तटस्थ नेते अशी मोट आम्ही बांधू शकलो ते भालाजींच्या संघटन कौशल्यामुळेच.

या चर्चासत्रातील चर्चेतील मुद्द्यांवर आम्ही एक स्मरणिका काढण्याचे ठरवले होते. त्यायोगे हिंदुस्थान समाचार साठी जाहिरातींद्वारे निधी उभा करणे हे आमचे धोरण होते. मात्र त्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच श्रीकांतजी जोशी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे काही काळ आमचे काम ठप्प झाले होते. नंतर संघाने भालाजींवरच संपूर्ण जबाबदारी सोपावली आणि मग हिंदुस्थान समाचारच्या कामाला गती आली. भालाजींनी हिंदुस्थान समाचारमध्ये नवे नवे प्रयोग करण्याचे नियोजन केले. हिंदुस्थान समाचार मुद्रित माध्यमांना बातम्या देणारी वृत्त संस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र भालाजींनी हिंदुस्थान समाचार ला वृत्तवाहिन्यांना बातम्या देणारी वृत्त संस्था म्हणून विकसित करण्याचे नियोजन केले. त्या दृष्टीने त्यांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू झाल्या. मग नागपूरला आले की त्या विषयावर सुद्धा आमची चर्चा होत असे.

भालाजींनी हिंदुस्थान समाचारची सूत्रे घेतल्यावर त्यांनी प्रत्येक विभागीय कार्यालयासाठी स्वतंत्र संचालन करणाऱ्या प्रवर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मग नागपुरातही एक प्रवर समिती त्यांनी गठित केली. त्यात अरविंद मार्डीकर हे अध्यक्ष, मी पदसिद्ध सचिव आणि अभिनंदन पळसापुरे हे कोषाध्यक्ष असे निश्चित केले. शिवाय चंद्रकांत क्षीरसागर, सुधीर वराडपांडे, भूपेंद्र अग्रवाल आणि अतुल पिंगळे असे सदस्य नेमले. मग या प्रवर समितीच्या बैठकांना शक्य तेव्हा भालाजी उपस्थित राहू लागले. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला मिळत होते. याच दरम्यान नागपुरातून मराठी सोबत हिंदी आणि संस्कृत मधूनही बातम्या पाठवण्याची सुरुवात भालाजींमुळेच होऊ शकली होती.

भालाजी जसे संघ प्रचारक आहेत तसेच एक चांगले लेखक आणि कवी सुद्धा आहेत. त्यांनी केशव शतक स्वरांजली नामक डॉ. हेडगेवारांवर गीते रचली आणि संस्कार भारतीने त्यातील निवडक गीतांचे गायन केले. त्याच्या ध्वनिफिती देखील बनवल्या गेल्या. तो समारंभ नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात पार पडला. त्याला सरसंघचालक डॉ मोहन भागवत उपस्थित होते. त्या समारंभाला मी देखील फक्त उपस्थितच नव्हतो, तर आयोजनात देखील सहभागी झालो होतो. भालाजींचा हा एक वेगळा पैलू त्यावेळी लक्षात आला होता. भालाजी अनिमेष या टोपण नावाने लेखन करतात आणि लख्खिदा या नावाने काही परिसरात प्रसिद्ध आहेत हे यावेळीच कळले. ते जेव्हा बंगालमध्ये प्रचारक होते तेव्हा त्यांच्या लक्ष्मीनारायण चे लख्खिदा असे रूपांतर केले गेले होते असे त्यांनी सांगितले.

आपल्या सहकारी व्यक्तीने कोणताही निर्णय घेतला तरी त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला सांभाळून घेण्याची भालाजींची वृत्ती आहे. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात दरवर्षी एक दिवस मुख्यमंत्री नागपूरातील सर्व वरिष्ठ संपादक आणि कार्यालय प्रमुखांना सकाळी स्नेह भेटीसाठी बोलावतात. त्यात गप्पांमध्ये बरीच माहितीची देवाण-घेवाण होत असते. लागोपाठ दोन वर्ष मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालय आणि माहिती खात्याचे नागपूर कार्यालय येथील अधिकारी वारंवार सांगूनही हिंदुस्थान समाचारला निमंत्रण देत नव्हते. नंतर एक दिवस मुख्यमंत्री अधिवेशनात वृत्तसंकलन करणाऱ्या सर्व पत्रकारांना स्नेहभोजनाला बोलवत असत. त्याचे मला निमंत्रण यायचे. मग २०१३ मध्ये त्या स्नेहभोजनाच्या वेळी जाऊन मी मुख्यमंत्र्यांना मी बहिष्कार घालत असल्याचे पत्र देण्यासाठीच गेलो, आणि तिथे मी बराच गोंधळ केला. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील दोन राज्यमंत्री मला समजावून आवरण्यासाठी प्रयत्नशील झाले होते. तितक्यात स्वतः पृथ्वीराज चव्हाण तिथे आले आणि त्यांना मी माझी व्यथा सांगितली. मग त्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर मी त्यांच्या आग्रहाखातर त्यादिवशी येथे भोजन केले होते.

ही घटना मी लगेचच त्याच भालाजींच्या कानावर घातली. मात्र त्यावेळी बालाजी पूर्णतः माझ्या बाजूने उभे राहिले, आणि या मुद्द्यावर संघर्ष व्हायलाच हवा असेही त्यांनी सांगितले होते.

दरम्यानच्या काळात २०१४ च्या लोकसभा निवडणुका आल्या. मग त्या निमित्ताने भालाजींनी देशभर निवडणूकपूर्व सर्वेक्षणाची योजना आखली. हिंदुस्थान समाचारचे सर्वेक्षण बऱ्यापैकी अचूक ठरले होते.

लोकसभा निवडणुका नंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकांनंतर भाजप आणि शिवसेनेची युती होऊन सरकार होणार हे निश्चित झाले. दरम्यान आम्ही २०१२ मध्ये झालेल्या चर्चासत्राच्या आधारे जी स्मरणिका काढणार होतो, ती स्मरणिका काढण्याचा बेत आम्ही रद्द केला. कारण स्मरणिका काढण्यासाठी आम्ही भाजपचे सहकार्य घेणार हे नक्की होते. आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे छोट्या राज्यांच्या मुद्द्यावर भाजप कितपत सहकार्य देईल ही शंका होती. म्हणून भालाजींनीच पुढाकार घेत हा बेत रद्द करायला सुचवले आणि दुसरा एखादा विषय घेऊन आपण स्मरणिका काढूया, हवे तर त्या विषयावर पुन्हा एखादे चर्चासत्र सुद्धा घेऊ, असाही सल्ला त्यांनी दिला. मग संविधानाचा फेर आढावा कितपत गरजेचा आहे या विषयावर पुन्हा एक राष्ट्रीय चर्चासत्र घ्यायचे आणि त्याची स्मरणिका सुद्धा काढायची असा निर्णय झाला. त्यानुसार आम्ही नागपूरच्या प्रवर समितीने या विषयातील तज्ञ मंडळींना एकत्र करून विचारविनिमय सुरू केला आणि चर्चासत्र कधी घेता येईल आणि कोणाकोणाला बोलावता येईल या विषयावर आमचा खल सुरू झाला.

दरम्यान संघ परिवारात काही फेरबदल करण्याचे ठरले. त्यामुळे भालाजींनी हिंदुस्थान समाचारचे काम थांबवावे आणि इतिहास संकलन प्रकल्पावर लक्ष द्यावे असे त्यांना सांगण्यात आले. याच दरम्यान मी आधी अर्धवेळ काम करत असलेल्या दैनिक पुढारीसाठी पूर्ण वेळ काम करण्याचे निश्चित झाले. म्हणून मग मी देखील हिंदुस्थान समाचार चे काम थांबवायचं ठरवले.

भालाजी आणि मी, आम्ही दोघेही हिंदुस्थान समाचार पासून बाजूला झालो असलो तरी आमचा संपर्क मात्र कायम राहीला.

हिंदुस्थान समाचार काम थांबवल्यावर भालाजींनी इतिहास संकलनाच्या कामावर जोर दिला. त्यावेळी त्यांचे मुख्यालय भोपाळ हे होते. तरीही बरेचदा नागपूरला ते यायचे. आले की आवर्जून भेटायचे.

आमच्या घरी आम्ही दोघेही चहा घेणारे आहोत. मात्र भालाजी हे फक्त कॉफीच घेतात. एकदा आमच्या घरी आले असताना त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शरद भाला देखील होते. अजून नागपूरचे एड. अविनाश काळे हे देखील आले होते. त्यावेळी माझी पत्नी आणि अनुरूपा वर बेडरूम मध्ये होती. मग गप्पांमध्ये मोबाईलवर लोकेशन कसे पाठवायचे यावर चर्चा सुरू झाली. मला लोकेशन पाठवणे येत नव्हते. भालाजी मला म्हणाले या मी तुम्हाला शिकवतो आणि कोणाच्या तरी नंबर वर लोकेशन पाठवायचे तर मी अनुरूपाच्या नंबर वर लोकेशन पाठवले. मग भालाजी लगेच म्हणाले आता लोकेशन पाठवले. वहिनींना लोकेशनवर इथे यायला सांगा म्हणजे आम्हाला कॉफी मिळेल, आणि सर्वच जण हास्यकल्लोळात बुडून गेले.

याच दरम्यान हिंदुस्थान समाचारमधले आमचे आणखी एक सहकारी डॉ. अमित जैन यांनी चाणक्य वार्ता नामक एक हिंदी पाक्षिक सुरू केले. भालाजी त्याला देखील सहकार्य करू लागले. मग भालाजींनी मला देखील चाणक्यवार्ताचा विदर्भ प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. माझा हिंदीचा तितकासा सराव नाही. तरीही मग मी जसे काही लिहायचो. ते दुरुस्त करून घेत माझ्याच नावाने भालाजी चाणक्य वार्ता मध्ये प्रकाशित करायचे. कोरोना काळात माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. त्याचा प्रकाशन समारंभ व्हावा असे मनात होते. मात्र कोरोना काळात मोठा समारंभ करणे शक्य नव्हते .मग ऑनलाइन करावा का असे डोक्यात आले. भालाजींशी फोनवर बोलणे झाले. तेव्हा ऑनलाईन करायचा असेल तर आपण राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनाच विचारूया, असे त्यांनी सुचवले मग त्यांनीच अमित जैन यांच्या मदतीने कोशियारीशी संपर्क साधला आणि कार्यक्रम निश्चित केला. त्या आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात माझ्यासह भगतसिंह कोशियारी चाणक्यवार्ताचे अमित जैन, स्वतः लक्ष्मीनारायणजी भाला, डॉ. उदय निरगुडकर माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती आणि प्रकाशिका लता गुठे असे सर्वजण ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यावेळी माझ्या दोन्ही पुस्तकांवर भालाजी अगदी भरभरून बोलले होते.

२०१९ मध्ये भालाजी ७५ वर्षाचे झाले. संघाच्या परंपरेनुसार प्रचारक ७५ वर्षाचे झाले की संघ त्यांना कोणतीही जबाबदारी देत नाही. मात्र प्रचारक जर सक्रिय राहू इच्छित असतील तर त्यांच्या इच्छेनुसार काम करण्याची अनुमती दिली जाते. याच दरम्यान भालाजींनी दिल्लीत संसदेच्या ग्रंथालयात जाऊन संविधानाची मूळ हस्तलिखित प्रत बघितली होती. त्यात ख्यातनाम चित्रकार नंदलाल बोस यांनी रेखाटलेली २८ चित्रे विविध खंडांमध्ये जोडली होती. नंतर काँग्रेस सरकारने छापलेल्या संविधानाच्या प्रतिंमध्ये ती चित्रे गायब करण्यात आली होती. त्या चित्रांचा अभ्यास केला आणि त्या २८ चित्रांची ठिकठिकाणी प्रदर्शने देखील आयोजित केली. त्याचबरोबर या चित्रांच्या आधारे संविधानावर त्यांची दोन पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. दरवेळी फोनवर आमचे बोलणे झाले की ते सर्व माहिती देत असतात. नागपुरात आले की ते आवर्जून घरी येतात आणि सर्वांची चौकशी करतात.

गतवर्षी मी बराच आजारी झालो होतो. त्यामुळे जवळजवळ सहा सात महिने अंथरुणावरच होतो. त्यावेळी बालाजी मला भेटायला दोन तीनदा घरी येऊन गेले. आधीच्या दोन वर्षात जेव्हा ते घरी यायचे तेव्हा दिव्येशा शिक्षणासाठी पुण्याला होती. मात्र यावेळी ती नागपुरला आलेली होती. मग आवर्जून त्यांनी दिव्येशाला बोलावले आणि तिला सांगितले “तू बाहेर कुठे भेटलीस तर मी तुला ओळखायला तर हवं, म्हणून मुद्दाम तुला भेटलो”.

असे लक्ष्मीनारायणजी भाला उपाख्य भालाजी उपाख्य लख्खिदा हे जानेवारी मध्ये ८१ वर्षाचे होत आहेत. अजूनही ते पूर्णतः सक्रिय आहेत. ते असेच सक्रिय राहावे आणि परमेश्वराने त्यांना दीर्घायुआरोग्य द्यावे हीच प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here