


जळगाव – जैन धर्मात पाच भूषण हे व्यवहार सम्यकत्वाचे आधारस्तंभ मानलेले आहेत. श्रद्धा, सेवा आणि धर्मप्रभावना वाढीस लागण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या पाच भूषणांमध्ये प्रथम आहे जिनशासनात निपुणता, म्हणजे जिनधर्माच्या तत्वज्ञानात प्रावीण्य प्राप्त करणे. दुसरे भूषण आहे प्रभावना, ज्याद्वारे धर्माची कीर्ती समाजात पसरवली जाते. तिसरे आहे तीर्थ सेवा, म्हणजे साधू, धर्म, जिनवाणी आणि जिनप्रतिमा या चार तीर्थांची भक्तिपूर्वक सेवा करणे. चौथे भूषण आहे धर्मप्रवृत्त करणे, पाचवे आहे गुणीजन सेवा, म्हणजे ज्ञानी, साधू, धर्मात्मा व्यक्तींचा आदरपूर्वक सत्कार करणे. हे सर्व भूषण महत्त्वाचे ठरतात. यासाठी जयंती श्राविका यांचे उदाहरण दिले. त्याच प्रमाणे गंधार राज्याची प्रभावती महाराणी यांची गोष्ट सांगितली. तेथे व्यापारासाठी एक गृहस्थ आले होते परंतु ते अस्वस्थ झाले त्यावेळी त्यांच्या सेवा, शुश्रूषा करण्यासाठी कुबड असलेल्या दासीला राणीने पाठविले. दासीने मनोभावे सेवा केली. ते गृहस्थ खूश झाले व स्वर्णगुटी दिली. ते घेतल्यावर दासीचे कुबड जाऊन ती सुंदर दिसू लागली. असे म्हणतात की, ‘सेवा केल्याने मेवा मिळतो.’ जो धर्मापासून दूर जातो त्याला धर्माकडे पुन्हा वळविणे हे देखील उत्तम कार्य आहे असे सांगताना मेघकुमार, आषाढभूती, रहनेमी आणि राजुल यांच्या जीवनातील प्रसंगांचे चिंतन देखील प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात केले.
जैन धर्मात चोरी ही बाब अत्यंत गंभीर पाप मानण्यात आली आहे. चोरी करणे, कुणाला न विचारता वस्तू घेणे, चोराला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणे किंवा चोरीची वस्तू विकत घेणे हे सर्व चोरीचे प्रकार मानले जातात. यात प्रगट आणि अप्रगट चोरी असे दोन प्रकार सांगितले गेले आहेत. त्यात बौध्दिक चोरी आणि एकत्र कुटुंबात असाल व आपल्या व्यवसायातूनच इतर सदस्यांच्या संमतीशिवाय स्वतःचे पैसे व मालमत्ता करणे ही देखील चोरीच असल्याचे सांगितले. त्याचे उदाहरण स्पष्ट करण्यासाठी स्वामी रामतीर्थ यांची जपानमधील घडलेली घटना सांगितली. त्यांचे तिथे स्वागत झाले, भाषण झाल्यावर ते लायब्ररी बघायला पोहोचले. ‘भारती विद्यार्थ्यांना येथे येण्यास बंदी’ अशी पाटी तेथे पाहिली. त्यावर आयोजकांना उत्सुकतेने विचारले असता, एका भारतीय विद्यार्थ्याने ग्रंथालयातील पुस्तकांची पाने फाडून चोरली आणि त्याच्या कृतीमुळे संपूर्ण भारतीय विद्यार्थ्यांवर बंदी घालण्यात आली. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी ठरविले गेले. चोरी करण्याची पाच कारणे देखील त्यांनी सांगितले. चोरीतून वाचण्यासाठी इच्छांना मर्यादा घालणे, व्यसनांचा त्याग करणे आणि वस्तू हवी असल्यास ती मालकाकडून मागून घेणे हे उपाय सुचवले. प.पू. निलेशप्रभाजी म.सा यांनीही श्रावक-श्राविकांना चोरीपासून दूर राहण्याचे आणि सदाचाराचे महत्त्व आजच्या प्रवचनातून पटवून दिले.
(शब्दांकन – किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)














