


राजुरा (१५ ऑगस्ट)- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या कार्याची दखल घेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे सचिन उत्तम शिंदे (म.व.से.) विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण, चंद्रपूर
यांच्या हस्ते हरित सेना अंतर्गत वनभ्रमंती कार्यशाळा कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, तसेच विद्यार्थी पुर्वी गिरडकर, अनुष्का तलांडे, रसिता शेंडे, तमन्ना कोटांगले, अभिषेक बावणे, सौम्य चामाटे , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने पक्षांकरिता खाऊ- प्याऊ निधी संकलन , अमृता देवी रोपवाटिका , गांडूळ खत निर्मिती, बी बियाणे संकलन, सापांबाबत अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती , प्रदूषण रहित दिवाळी जनजागृती, पाणथळ्यास भेट देणे, वृक्ष रक्षाबंधन, सायकल रॅली , पर्यावरणपूरक विविध दुर्गुणांची कचऱ्याची होळी करणे , प्लास्टिक वापर टाळणे, ओला सुका कचरा संकलन याबाबत जनजागृती, सीड बॉल निर्मिती, वृक्षारोपण असे विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी १ मे २०२२ ला सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर तर्फे उत्कृष्ट कार्याबद्दल प्रकाश लोणकर (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक , चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांच्या हस्ते उत्कृष्ट हरित सेना म्हणून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. या गौरवाबद्दल संस्थेचे संचालक तथा माजी आमदार ॲड. संजय धोटे, गट शिक्षणाधिकारी पं.स.राजुरा मंगला तोडे, अध्यक्ष सतिश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले. वेळोवळी सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र चंद्रपूर, राजुरा अंतर्गत दिलेल्या सूचनांचे पालन करून विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला जातो. याकरिता वनअधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.
———————————————
१ मे २०२२ व १५ ऑगस्ट २०२५ असे दोनदा मिळालेल्या पुरस्कारामुळे आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेची जबाबदारी जास्त वाढली आहे. सातत्याने अकरा वर्ष पर्यावरण संवर्धनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. कोविड काळातही हरित सेनेच्या कार्यात खंड पडू दिला नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकार, हक्क यांची माहिती आपल्याला आहे. परंतु कर्तव्यांची जाणीव ठेवून आपले कार्य अविरतपणे सातत्य राखून सुरू ठेवले की अशी कौतुकाची थाप आपल्याला मिळते. खरं तर पुरस्कृत झाल्याने आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा आहे याचा आनंद होतोय शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासातही हातभार लागतो अशी प्रतिक्रिया बादल बेले यांनी दिली आहे.














