


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड ( सातारा ) : माण-खटाव तालुक्यातील शेतकरी महावितरणच्या ढिसाळ, आडमुठ्या आणि बेजबाबदार कारभाराविरोधात संतापाच्या टोकाला पोहोचले असून, १५ ऑगस्टपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. शेनवडी सबस्टेशन अंतर्गत शेती पंपांना गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने, विहिरीत पाणी असूनही मोटारी बंद पडल्या, पिके करपली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारीपण व नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते महेश करचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनामागे महावितरणच्या आश्वासनाच्या मागचा इतिहास आहे. २६ जानेवारी रोजी वडूज कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण, ११ मार्चला साताऱ्यात अधीक्षक अभियंता यांच्या बंगल्यासमोर आमरण उपोषण, २८ एप्रिलला बैठकीत १८ अतिरिक्त डीपी बसवण्याचे आश्वासन, तसेच १ मे रोजी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा – अशा टप्प्याटप्प्याने आंदोलने झाली, पण तीन महिने उलटूनही एकही ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला नाही. उलट, जांभुळणी, गंगोती, पळसावडे, देवापूर, पुळकोटी, वळई, पानवन, शेनवडी, गोंदवले खुर्द, गुरसाळे, उंबर्डे, नढवळसह अनेक गावांमध्ये ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत असून, ते बदलण्यासाठी महिनोनमहिने लागतात. त्यात वाहतुकीसाठी व ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महेश करचे म्हणाले, “महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. आश्वासनभंग हा आमच्या सहनशीलतेची क्रूर थट्टा आहे. यावेळी प्राण गेले तरी बेहत्तर, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही.” तर अनिल पवार यांनी अधिक संताप व्यक्त करत, “वीजपुरवठा व ट्रान्सफॉर्मर देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, उपकार नाहीत. आत्महत्येच्या खाईत ढकलणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकशाहीच्या न्यायालयात उभे करू. हा अंतिम लढा असेल,” असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये माण-खटावमधील १८ अतिरिक्त डीपी तातडीने बसवणे, शेतीसाठी सलग ८ तास पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे, ट्रान्सफॉर्मर जळण्यास आळा घालण्यासाठी उपाययोजना, पायाभूत सुविधा वाढवणे, तसेच दहिवडी येथे विभागीय आणि म्हसवड येथे उपविभागीय कार्यालय तातडीने सुरू करणे यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास जिल्हाभर भव्य जनआंदोलन उभे करून ठिय्या, अर्धनग्न आंदोलन व रास्तारोकोपर्यंत तीव्र लढा उभारला जाईल.














