Home चंद्रपूर शिवसेना (उबाठा) युवासेना यांचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला निवेदन- अवैध सागवान लाकूडतोड व रेती...

शिवसेना (उबाठा) युवासेना यांचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला निवेदन- अवैध सागवान लाकूडतोड व रेती तस्करी रोखण्याची मागणी

200

 

 

(बादल बेले, विशेष प्रतिनिधी,
मो. 82081 58428 )

राजुरा: राजुरा तालुक्यातील मौजा चुनाळा येथील जंगल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे अवैध लाकूडतोड सुरू आहे. विशेषतः मौल्यवान सागवान व इतर मूल्यवान झाडांची निर्दयपणे तोड करून ते लाकूड गुप्त मार्गाने बाहेर पाठवले जात आहे. ही तोड केवळ चोरी नाही, तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेचा बेकायदेशीर खात्मा आहे. या प्रकारात वनविभागाच्या बिट रक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा थेट अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत.त्याचबरोबर चुनाळा व लगतच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी देखील सुरू आहे. हे सर्व काही दिवसाढवळ्या होत असून, शासन यंत्रणा व आपला विभाग गप्प असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व असंतोष आहे.
शासनाच्या वनसंवर्धन धोरणांना थेट हरताळ फासणाऱ्या या कारवायांकडे दुर्लक्ष करणे ही प्रशासनाची जबाबदारी झटकण्याची वृत्ती मानली जाईल.म्हणून, शिवसेना (उबाठा गट) राजुरा शहर शाखेच्या वतीने चुनाळा परिसरातील अवैध लाकूडतोड व रेती तस्करी प्रकरणी तातडीने विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात यावी. या प्रकरणात दोषी आढळलेल्या वनकर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबन व गुन्हे दाखल करण्यात यावेत. जंगल क्षेत्रात नियमित गस्त आणि ड्रोन सर्वेक्षण सुरू करून कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात यावी.नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.भविष्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी सीसीटीव्ही, चौकी आणि गुप्त माहिती यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.

अश्या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास, शिवसेना (उबाठा) राजुरा शहर शाखा कठोर आंदोलनात्मक पावले उचलण्यास बाध्य होईल असे निवेदन शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन भाऊ पिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली व
बंटी उर्फ शुभम पीपरे शहर प्रमुख, युवासेना राजुरा यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवसेना राजुरा तालुका प्रमुख संदीप भाऊ वैरागडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, युवासेना राजुरा तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना राजुरा उपतालुका प्रमुख रमेश भाऊ झाडे, युवासेना राजुरा तालुका चिटणीस प्रवीण पेटकर,युवासेना राजुरा शहर चिटणीस श्रीनाथ बोल्लूरवार, बळवंत ठाकरे, मंगल ठाकूर, आकाश चुणारकर, जुगल भटारकर,न हिम कुरेशी, प्रेम झाडे, गोलू पिपरे, हर्षल झाडे, आदी धोटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here