


मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी येथील तहसील कार्यालयामध्ये मोर्शी विधासभा मतदार संघाचे आमदार उमेश यावलकर, तिवसा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी तालुका स्तरीय खरीप २०२५-२६ हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन २८ एप्रिल रोजी तहसील कार्यालय मोर्शी येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी आढावा सभेमध्ये मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी हवामानावर आधारित संत्रा फळ पीक विम्याची पोल खोल केल्यामुळे संबंधित यंत्रणेची तारांबळ उडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रुपेश वाळके यांच्यासह अन्य संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी 2024 – 2025 करीता गारपीट विमा मोर्शी येथील भारतीय स्टेट बँक शाखा मोर्शी येथून नोव्हेंबर २०२४ मध्ये काढला असून त्याची प्रीमियम रक्कम त्यांच्या खात्यातून डेबिट केल्या गेली. नोव्हेंबर महिन्यापासून काढण्यात आलेल्या विम्याची दखल विमा कंपनीने घेतली नसल्यामुळे विमा कंपनीच्या व बँकांच्या चुकीच्या धोरणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनी व बँकेवर गुन्हे दाखल करण्याचा मुद्दा सभेमध्ये रेटून धरला असून १५ दिवसामध्ये न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्यातील अखेरच्या टोकाला बसविल्यामुळे नुकसान भरपाईचे ट्रिगर लागत नसल्यामुळे हिवरखेड मंडळातील फळ पीक विमा काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली असता आमदार उमेश यावलकर आमदार राजेश वानखडे यांनी या गंभीर प्रकारची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
हवामान केंद्र स्थलांतरित करण्याची दखल घेणार कधी ?
मोर्शी तालुक्यातील मंडळ कार्यालयांतर्गत उभारलेल्या हवामान केंद्र चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेले असून हवामान केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असल्यामुळे हवामानाची अचूक नोंद होणार कशी? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून या गंभीर प्रकारामुळे फळ पीक विमा धारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून आम्ही जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा हवामान केंद्र स्थलांतरित करण्याची मागणी केली असता त्याची दाखल कोणीही घ्यायला तयार नसल्यामुळे विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा होत आहे व हजारो रुपये भरून विमा काढणारा शेतकरी कर्जबाजारी होतांना दिसत आहे. — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.














