


▪️पदाधिकाऱ्यांना कानमंत्र प्रवेश व नियुक्ती सोहळा
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.16फेब्रुवारी):-मतदारसंघासह जिल्ह्यातील गरजू नागरिकांसाठी योग्य ते उपक्रम राबवून त्यांना मदत करा. तसेच आपापल्या भागातील समस्या, अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही केव्हाही हाक द्या, त्या ठिकाणी कायम तत्पर असेन. कारण, आपल्या सर्वांना मिळून विकासाचा पाया अधिक सक्षम करायचा आहे. त्यामुळे पदाधिकारी म्हणून जनसंपर्क वाढवा. उपक्रम राबवा. लोकहिताची कामे करा. जेष्ठ नागरिकांना सहकार्य करा. लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवा. निराधारांना आधार द्या. तुमच्या चांगल्या कामाच्या पाठीशी उभा राहीन, पण पदाचा गैरवापर करून तुम्ही जर कोणता गैरप्रकार करीत असाल, तर तो खपवून घेणार नाही, अशा शब्दात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या.
शहरातील राम-सीता सदन येथे आयोजित प्रवेश व नियुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नगरपरिषदचे माजी नगरसेवक बालाजी शेटे, माजी नगरसेवक तुकाराम तांदळे, बन्सी काबलिया आणि संदीप केंद्रे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी गुट्टे काका मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला. तसेच गरजू आणि गरीब जनतेसाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, मित्र मंडळ पदाधिकारी म्हणून मिळालेल्या संधीचे आपल्या कामातून सोने करा. ग्रामीण व शहरी भागातील विकासाला चालना देण्यासाठी कृतीशील कार्यक्रम हाती घ्या. आपल्या चांगल्या कामांच्या पाठीशी कायम उभा राहीन. शेवटी, विकास आणि जनसेवा हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त नागरिकांना फायदेशीर ठरतील अशा योजना, कार्यक्रम आणि उपक्रम राबवा. तुमच्या कल्पना आणि योजनांचे नेहमी स्वागत केले जाईल. तसेच नेहमी लोकहिताची भूमिका घेऊन काम करा. जनतेची सेवा करताना प्रामाणिकपणा जपा. पारदर्शक आणि गतिमान कारभार करा, असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश सरचिटणीस म्हणून नंदकुमार पटेल, गुट्टे काका मित्रमंडळाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी इकबाल चाऊस, विधानसभा अल्पसंख्यांक अध्यक्षपदी शोहेब शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी अझहर शेख, दलित आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून नितेश खंदारे, सोशल मीडिया शहर प्रमुख म्हणून अमोल दिवाण याची एकमताने निवड करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप आळनुरे तर सूत्रसंचालन पिराजी कांबळे यांनी केले. आभार अकबर सय्यद यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














