Home महाराष्ट्र लोकशाही दिनाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात यावे-अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

लोकशाही दिनाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात यावे-अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

122

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7फेब्रुवारी):-लोकशाही दिनाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखेच्या वतीने दिनांक 6 जानेवारी (गुरुवार) रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

सामान्य नागरिकांसाठी लोकशाही दिन हे आपल्या हक्कांबाबत शासन दरबारी चौकशी करण्याचे आणि दाद मागण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. नागरिकांनी शासनाकडे केलेल्या अर्जांवर किंवा विनंत्यांवर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास, तालुका, जिल्हा किंवा महापालिका स्तरावर याबाबत तक्रार नोंदवता यावी, यासाठी हा दिन उपयुक्त ठरतो.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतने सुचवले आहे की, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जावे. या दिवशी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, तसेच पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, सहकार विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी दिलेल्या निवेदनावर सोपानराव टोले (जिल्हाउपाध्यक्ष परभणी व अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद), सुधीर चव्हाण (शहराध्यक्ष), सय्यद ताजुद्दीन (तालुका सचिव), अँड. उत्तम काळे (शहर सचिव), महेमूद शेख (तालुका कोषाध्यक्ष) आणि प्रभू राठोड (शहर संघटक) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या उपक्रमामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनेल, तसेच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here