


जामखेड/अहिल्यानगर- येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील सामाजिक कार्यकर्त्यां रत्नाताई कांबळे यांना मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे यांनी दिली.
सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अहिल्यानगर येथे दि ९ फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे.
या बाबत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव, सुनिल गोसावी म्हणाले की, रत्नाताई कांबळे यांनी पन्नास वर्षापासून महिला सबलीकरण,आरोग्य आणि ग्राम विकास या त्रिसूत्रीचा पाठपुरावा करत आहेत. त्या मूळचा शिक्षकी पेशा सोडून बंधू पद्मभूषण डॉ. रजनीकांत आरोळे यांच्यासह सामाजिक स्थित्यंतराच्या कार्यात स्वतःला झोकून ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्य शिक्षण आणि लोकसहभागावर आधारित अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. स्थानिक महिलांना आरोग्याचे मूलभूत ज्ञान, तांत्रिक कुशलता आणि सामाजिक बांधिलकीचे धडे देऊन त्यांना ग्रामीण आरोग्य सेवेचा कणा बनवले. असा हा ग्रामीण आरोग्य प्रकल्प जगभरातील सार्वजनिक आरोग्यासाठी हितकारक ठरला आहे.
त्यांनी सामाजिक निरक्षरता, अंधश्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा पगडा या अडसरांनाही त्यांनी आपल्या कुशल बुद्धिमत्तेने लोक सहभागातून सोडविण्याचा प्रयत्न केला. अशिक्षित आणि अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या समाजाला आरोग्य,शिक्षणाचे धडे दिले आहेत. त्यातूनच वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याच्या मूलभूत आवश्यकता आणि रोगप्रतिबंधकत्मक उपायाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून लसीकरण, बालसंगोपन, बाळंतपण, साथीचे आजार, आहार, गरोदरपणात माताची काळजी, याबाबतीत लोकांना सुशिक्षित आणि सक्षम बनवले आहे.
कर्जत, जामखेड, अकोले तालुक्यात उभारलेले महिला विकास मंडळाचे जाळे व महिला सक्षमीकरणाचे हे कार्य त्यांनी तब्बल चार दशके राबवले. ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून नेमलेल्या ग्राम आरोग्यसेविका या संकल्पनेतूनच सरकारने ‘आशा कर्मचारी’ ही संकल्पना देशभर राबवली आहे. अशा या आदर्श कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन सरकारने 2006 चां पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार त्यांना दिला तर केंद्र सरकारकडून वृक्ष संवर्धनासाठी दिला जाणारा प्रियदर्शनी पुरस्काराही त्यांना मिळाला आहे. अशा अलौकिक कार्याची दखल घेऊन त्यांना ‘मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार’ बहाल करण्यात येणार आहे.
रत्नाताई कांबळे यांचे शब्दगंधाचे अध्यक्ष राजेंद्र उदागे संस्थापक सुनील गोसावी खजिनदार भगवान राऊत, राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पवार,जामखेडचे प्रतिनिधी प्रकाश खंडागळे यांनी अभिनंदन केले आहे.













