


✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.26जानेवारी):-देशभर भारतीय संविधानावर आधारित विविध उपक्रम व्यापकपणे राबवले जात आहेत. भारतीय संविधानाची मोडतोड होत असलेल्या काळात भारतीय संविधान जनतेमध्ये पोहोचवण्याच्या उद्देशाने कोल्हापुरातील सामाजिक भूमिका घेऊन प्रबोधनाच्या वाचन चळवळीत कृतिशील भूमिका पार पडणार्या निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपला अभिमान, भारतीय संविधान ही भूमिका घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सखोल वाचन व्हावे.
या उद्देशाने भारतीय संविधानाच्या जन जागृतीसाठी, भारतीय संविधान साक्षरता अभियाना अंतर्गत विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित ऐतिहासिक भारतीय संविधान या महाग्रंथावर प्रबुद्ध भारत हायस्कूल, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर या ठिकाणी महाभव्य महापरीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय स्तुत्य आणि आगळ्यावेगळ्या वाचन संस्कृती वाढवणार्या सदर महापरीक्षेत महाराष्ट्रातील 275 संशोधक, अभ्यासकांनी भाग घेतला. देशभरात हा उपक्रम राबविण्याचे यावेळी सर्वांच्या एकमताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार अर्दाळकर, शंकर पुजारी, अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, विश्वासराव तरटे, नीती उराडे, अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, ॲड. राम धुमाळ, अनुजा कांबळे, सुंदर कांबळे, हंबीरराव तरटे, शर्वरी पाटोळे, ऋषिकेश कोळगे, सागर पाटील यांच्यासह मानवतावादी सांस्कृतिक चळवळचे अनेक लोक उपस्थित होते.














