


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.23जानेवारी):-वडूज येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात आपल्या व्यथा मांडण्यासाठी गेलेल्या जांभुळणी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ श्री. महेश करचे व शेतकरी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना उपोषण करायची वेळ येणे हे लोकशाहीचे अपयश आहे. गंगोती सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करावे, शेनवडी सबस्टेशनची क्षमता दुप्पट करावी, शेतकऱ्यांना ८ तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा, जांभुळणी परिसरातील प्रलंबित कृषी ट्रान्सफॉर्मरची कामे तातडीने मार्गी लावावीत व शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देवून अरेरावी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची खात्यांतर्गत खुली चौकशी करावी या शेतकऱ्यांनी केलेल्या मागणींची आपण गांभीर्याने दखल घेवून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी.
अन्यथा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, स्वाभिमानीचे खटाव तालुका अध्यक्ष दत्तात्रय घार्गे, स्वाभिमानीचे माण तालुका अध्यक्ष राजू मुळीक व शरद खाडे उपस्थित होते.














