


गडचिरोली- संजीवनी प्राथमिक व माध्यमिक शाळा मेडिकल काम्प्लेक्स नवेगाव येथे सर्प विज्ञान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महा अंनिस चे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर, मार्गदर्शक म्हणून सर्प मित्र अजय कुकडकर, पंकज फरकाडे, मकसूद सय्यद, सौरभ सातपुते, योगेश हजारे , तर प्रमुख पाहुणे म्हणून महा अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नरेश चुटे व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भैसारे उपस्थित होते. अजय कुकडकर यांनी पिपीटी द्वारे सापाच्या विविध जाती, त्यांचे विषारी, निम विषारी व बिनविषारी असे प्रकार सांगून सापांची ओळख तसेच त्यांचे वस्तीस्थान व सापाविषयी असलेले समज आणि गैरसमज यावर विस्तृत मार्गदर्शन केले. पंकज फरकाडे व मकसूद सय्यद यांनी सापाने दंश केल्यानंतर बाधित व्यक्तीला रुग्णालयात पोहचेपर्यंत प्राथमिक उपचार कसे करावे यावर डेमो सादर केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विलास निंबोरकर यांनी, आपण सापाचे जरुर शत्रू आहोत पण साप हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त असा मित्र आहे हे समजावून सांगितले. उंदीर हे सापाचे भक्ष्य असल्याने, उंदरापासून शेतमालाचे होणारे नुकसान तो कमीत कमी होऊ देण्याचा प्रयत्न करतो. निसर्गातून साप नाहीसे झाल्यास शेतकऱ्यांना शेतातून शेतमाल घरी आणणे दुरापास्त होईल आणि नवे संकट ओढवून घेतल्यासारखे होईल म्हणून सापाला मारण्याऐवजी आपण सापाच्या सवयी जाणून घेऊन थोडे दक्ष राहिलो तर माणूस आणि साप दोघांचेही जीव वाचविणे शक्य आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. विठ्ठलराव कोठारे यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन करताना महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देऊन पर्यावरण वाचविणे हा एक अत्यंत महत्त्वाचा अनिसचा उपक्रम असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता देखील दरवर्षी नागपंचमी या सणाच्या पर्वावर सर्प विज्ञान जनजागृती करण्याचे काम महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शाळा व कॉलेज मधून करीत असतात याविषयी माहिती दिली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. संचालन चुटे सर तर आभारप्रदर्शन भैसारे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमातून छान माहिती मिळाली असा अभिप्राय अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केले.












