


मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील दापोरी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी देखील आजचा दिवस असाच चांगला सुखद अनुभव देऊन गेला. शाळेतला पहिलाच दिवस प्रत्येक लहान मुलांसाठी वेगळा अनुभव देणारा असतो. मात्र, या दिवशी जेव्हा कोणी लहान मुलांना आवडेल असं काही तरी करतं. तेव्हा निश्चितच त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस ठरतो. मोर्शी तालुक्यातील दापोरी गावच्या आदर्श जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी देखील आजचा दिवस असाच चांगला सुखद अनुभव देऊन गेला. शुक्रवारी या शाळेत पहिले पाऊल टाकणा-या इयत्ता पहिलीतील मुलांची ढोल ताशांच्या गजरात जिप्सी, ट्रॅक्टर मधून गावामध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी सर्वच चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात ताल धरत नाचण्याचा आनंद लुटून शाळेत प्रवेश केला त्यावेळी या मुलांच्या चेह-यावर त्याचा आनंद पाहायला मिळाला.
दापोरी येथील जिल्हा परिषद नेहमी वेगळ्या उपक्रमातून सामाजिक उपक्रमातून मुलांना कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या कलागुणांना वाव देत राहतात. अशातच यावर्षी देखील शाळेच्या माध्यमातून शाळेचा पहिला दिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांपासून दापोरी येथे सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळेचा इतर शाळेपेक्षा मुलांचा हजेरी पट चांगला आहे. हे लक्षात घेऊन खेडय़ातील मुलांना शालेय शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची संकल्पना दापोरी येथे प्रत्यक्षात आणली गेली.
शुक्रवारी पहिलीतील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्याने या विद्यार्थ्यांना जिप्सी, ट्रॅक्टर मधे बसवून त्यांची गावात काढण्यात आलेली मिरवणूक ही सा-या गावासाठी अत्यंत वेगळा उपक्रम होता. यावेळी काही कुटुंबांनी तर विद्यार्थ्यांची आगळी वेगळी वेशभूषा करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. मुलांना पाटी-पेन्सिल, पुस्तके वाटप करण्यात आली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी, सरपंच संगीता ठाकरे, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, मोर्शी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी नितिन उंडे, शा पो आ अधिक्षक प्रज्ञा भवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकिता विघे, योगेश अंधारे, विषय शिक्षक कुश पाथरे, केंद्र प्रमुख सुरेंद्र वानखडे प्रीती चौधरी, निलेश कडू, लविष कडू, सर्व अंगणवाडी सेविका ,सर्व शिक्षक तसेच मोठय़ा संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेचा पहिला दिवस म्हटले की, जिल्हा परीषद शाळेतील मुलांचा उत्साह काही औरच असतो. नव्या शैक्षणिक वर्षांत दाखल होणाऱ्या पहिलीच्या लेकरांना शाळेच्या पहिल्याच दिवशी जर अनोखी भेट मिळाली तर ती मुले आनंदाने शाळेत रमतात, हाच धागा पकडून दापोरी जिल्हा परिषद शाळेने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रवेशोत्सव साजरा केला — रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांनंतर शुक्रवारी शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस छान जावा, सुरूवात गोड व्हावी आणि मुलांना शाळेत यायची गोडी लागावी यासाठी दापोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना फुले आणि चॉकलेट, नवीन शालेय पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वाद्याच्या तालावर प्रभातफेरी, दिंडी तसेच ट्रॅक्टर व जिप्सी गाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आल्याने दापोरी शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात साजरा झाला — गजानन चौधरी मुख्याध्यापक .













