


अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रासप, भाजप, शिवसेना आणि मित्रमंडळ प्रणित पॅनलची कामगिरी समाधानकारक झाली असून आम्हाला अपेक्षित यश मिळाले आहे. त्यामुळे विश्वासाने आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व मतदारांचे आभार आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच भविष्यात आम्ही नेहमी शेतकरी हिताची भूमिका घेऊन काम करू, अशी स्पष्टोक्ती गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिली.
गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पूर्णा व ताडकळस येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत रासप, भाजप, शिवसेना व मित्रमंडळ प्रणित पॅनलने गंगाखेड येथे ८, पूर्णा ३ आणि ताडकळस मध्ये ९ जागांवर विजय मिळविला आहे.
हि निवडणूक चुरशीची झाली. त्यामध्ये आम्ही प्रयत्नांची परकाष्ठा केली. पदधिकारी व कार्यकर्ते यांनीही खूप मेहनत घेतली. सर्व सरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन,संचालक यांची मोलाची साथ मिळाली. त्याच बरोबर माझ्या व्यापारी व हमाल मतदार बांधवांनी यशस्वी साथ देत आपले उमेदवार विजयी केले. मात्र, काही ठिकाणी आमचा निसटता पराभव झाला. तरीही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चांगली तयारी करू. आम्ही कुठे कमी पडलो, याचे निश्चित आत्मचिंतन करू. कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार शेतकरी हिताचा असावा, यासाठी कायम लढा देऊ, असेही आ.डॉ.गुट्टे म्हणाले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर, प्रभारी हनुमंत मुंढे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, ॲड.मिलिंद क्षिरसागर, पत्रकार पिराजी कांबळे, सोनेराव कतारे, सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, वैजनाथ टोले, प्रताप मुंढे, इकबाल चाऊस, इंतेसार सिद्दीकी, प्रदीप गुंडाळे, कवी विठ्ठल सातपुते, माणिक नागरगोजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे आहेत विजयी शिलेदार…
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गट पोले संभाजी तुळजीराम ३४६, मुंढे संभुदेव ज्ञानोबा २८३, तर अनुसुचित जाती/जमाती गट सावंत कविता त्र्यंबक २९७, आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जाधव ज्ञानेश्वर विश्वनाथ ३२९ मते घेऊन विजयी झाले. तसेच व्यापारी मतदार गटात काबरा प्रशांत शांतीलाल २५६, धुळे प्रमोद विद्यासागर २५४ मतांनी विजयी झाले आहेत. तर आळसे माणिकराव मुगाजी २२४ मते घेत हमाल व तोलारी गटात तर सहकारी संस्था गटातून बालासाहेब निरस यांनी १९० मते घेत विजय मिळवला. कृषी उत्पन्न बाजार समिती, ताडकळस मध्ये रासप व भाजप युतीच्या सहकारी संस्था गटात सर्वसाधारण मध्ये बालाजी रुद्रवार १६९, पंडित जाधव १६४, अंकुशराव जोगदंड १५७, बाळासाहेब पवार १३९, नवनाथ शिंदे १२९ मते घेतली. यात महिला राखीव गटातून रेखा अंकुशराव अवरगंड १२१, भागूबाई नामदेव पौळ ११५ आणि इतर मागासवर्गीय गटात सुरेश गिरी ८६ मते घेत विजयी झाले. तसेच पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामपंचायत गटातून ३ उमेदवार विजयी झाले.












