डॉ.बाबासाहेबांची जयंती ही बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करायची असते. बाबासाहेबांच्या विचारधारेचे समर्थक वाढवण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते. बाबासाहेबांनी या देशांमधली वर्ण व जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला या जातीव्यवस्थेचे जे तोटे आहेत, ज्या नुकसान करणाऱ्या गोष्टी आहेत त्या इतरांना सांगण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.
जातिव्यवस्थेने या देशातल्या एससी, एसटी, ओबीसी आणि महिलांचा जो छळ केला आहे, करत आहेत यापासून या सर्वांना सावध करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते.बाबासाहेबांनी जो त्याग केला, संघर्ष केला आणि त्यागातून,संघर्षातून जे संविधान या देशाला दिले त्या संविधानातील प्रत्येक कलमांची माहिती सांगण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्था आणि देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी, या विचारधारेचे समर्थक तयार करण्यासाठी बाबासाहेबांची जयंती करायची असते. आणि हे सर्व काम त्याच लोकांनी करायचे असते जे या विचारधारेचे खंबीर समर्थक असतात.
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या देशांमध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी करतील का? त्यांची जबाबदारी आहे का या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याची? बाबासाहेबांच्या जयंतीच्या संदर्भाने ज्या काही चुकीच्या बाबींचे पांयंडे पडलेले आहेत ते नष्ट करणे हे सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीचा एक उद्देश असला पाहिजे.
लोकशाही शासन व्यवस्थेला व्यक्तिपूजा ही घातक असते हे बाबासाहेबांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या देशामध्ये लोकशाही पेक्षा मोदी लोकांना जवळचा वाटतो, हा लोकशाहीला व्यक्ती पूजेचा सर्वात मोठा धोका असल्याचे उदाहरण आहे. बाबासाहेबांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास जयंतीच्या माध्यमातून आम्ही, लोकांना बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यापासून व विचारापासून दूर नेऊन व्यक्ती पूजेमध्ये गुंतवत असल्याचे प्रकार जयंतीच्या निमित्ताने घडत आहेत; जे आंबेडकरवादी चळवळीसाठी आणि त्याच्या भवितव्यासाठी धोकादायक आहेत. 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस आणि तोही बाबासाहेबांच्या विचारासाठी नसेल, फक्त बँड लावून नाचण्यासाठी असेल तर आंबेडकरवादी चळवळीला भविष्य नसल्याचे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही.
आज या देशातील आंबेडकरवादी विचारधारा आणि भारतीय संविधान प्रचंड धोक्यामध्ये अडकलेले आहे याला वाचवण्याची जबाबदारी ही आंबेडकरवादी चळवळीच्या फ्रंट लाईन लीडर आणि विचारधारेचे फायदे घेणाऱ्या समाजाची आहे.सुशिक्षित आणि समजदार लोकांनी समाजाच्या कलाप्रमाणे वागायचं नसते. अशा भोळ्या भावड्या समाजाला बाबासाहेबांच्या विचाराकडे घेऊन जाण्याची जबाबदारी बुद्धिजीवी लोकांची असते ती भूमिका त्यांनी इमानदारी ने पार पडली पाहिजे. मनुवादी लोक बाबासाहेबांच्या विचारधारेपासून देशाला आणि समाजाला दूर नेत आहेत मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आर एस एस वाल्यांनी प्रबोधन शिबिराच्या माध्यमातून या देशांमध्ये आरक्षणाच्या विरोधात वातावरण तयार करून ठेवलं आहे आज या लोकांना आरक्षणापेक्षा धर्म मोठा वाटतो जो धर्म यांना काहीही देत नाही. आर एस एस ची प्रबोधन शिबिरं चालू आहेत. आम्ही मात्र प्रबोधन शिबिर घेण्यापासून शेकडो मैल दूर आहोत. आम्ही फक्त डॉल्बी, गाणे, गायक, बँड बाजा, जेवण आणि जयंती मधून इतर लोकांना शिव्या देणे याच्यामध्ये आहोत.
आंबेडकरवादी चळवळ उभी राहणार नाही, कारण गेल्या 70 वर्षांमध्ये आम्ही जयंती अशाच पद्धतीने केली, त्याचा कोणालाही फायदा झाला नाही. फक्त आम्ही जयंती केली एवढे एक समाधान मनात घेऊन आम्ही वर्षभर फिरत असतो, परंतु आमच्या आजूबाजूला असणाऱ्या आरक्षण धारक लोकांना आम्ही जोडण्यामध्ये अयशस्वी झालेलो आहोत हा आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा पराभव आहे हे आमच्या अजूनही लक्षात येत नाही. लोकशाही जनाधार मागते,संविधान सत्ता मागते व सत्ता बहुमताची असते.जनाधार असल्याशिवाय बहुमत नसते, आणि बहुमत नसते म्हणून सत्ता नसते, सत्ता नसते म्हणून कायदे करण्याचे अधिकार आपल्या हातात नसतात आणि म्हणून भारताच्या संसदेमध्ये खाजगीकरणाचे कायदे होतात. देशाच्या मालकीचे नफ्यात चालणारे उद्योग विकणारे कायदे होतात, धर्मांतर बंदी विधेयकं येतात, आरक्षण नष्ट करण्याचे कायदे होतात, ॲट्रॉसिटी कायद्याला दुबळे करण्यात येते. सगळे धोके बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 च्या भाषणामध्ये सांगितलेले असताना सुद्धा आम्ही याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आम्ही आज भोगत आहोत. यामधून सावरण्याची ही आता शेवटची संधी आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही जर पराभूत झालो तर बाबासाहेबांनी कमावलेलं सगळं आम्हाला गमवावे लागेल हे आता स्पष्ट झाले आहे. म्हणून यापुढे आम्ही समदुखी आणि आरक्षण धारक जातींना जोडण्याचे काम करावे.
✒️ॲड.रमेश गायकवाड(अहमदपूर,जिल्हा लातूर)मो:-9096716299