


🔸पाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक दुचाकींची बुकिंग, पेट्रोल दरवाढीचा परिणाम
🔹महागाव तालुका प्रतिनिधी किशोर राऊत
✒️किशोर राऊत(महागाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9011649037
महागाव(दि.22मार्च):-सततची होत असलेली इंधन दरवाढ यातून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे. पेट्रोलचा खर्च परवड नसल्याने दुचाकी वापर कमी झाला आहे. परिणामी तालुक्यासह शहरातही इलेक्ट्रिक दुचाकींना मागणी वाढली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक दुचाकींची बुकिंग झाली असून आज रोजी तालुक्यासह शहरात इलेक्ट्रिक दुचाकी धावत आहेत.आठवड्याला पेट्रोलचे दर वाढत आहेत. ही बाब सर्वसामान्यांच्या खर्चामध्ये भर टाकणारी ठरत आहे. पेट्रोल शंभरीपार तर डिझेल शंभर रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचले आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मागील पाच ते सहा महिन्यांपूर्वी पेट्रोल ते नव्वद ते शंभर रुपये लीटर होते. आता माञ १०८ रुपये लीटर झाले आहे. डिझेल ८० ते ९० रुपये लीटर होते. डिझेल १०५ रुपये लिटर झाले आहे. सहाशे रुपयांमध्ये मिळणारे घरगुती गॅसचे सिलिंडर आता ११५० रुपयांना मिळत आहे. तथापि, पेट्रोल – डिझेलची दरवाढ सुरूच आहे. आता १०८ रुपये लीटर पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दुचाकी चालविणे आर्थिक अडचणींचे ठरत आहे. दरवाढ लक्षात घेता नवीन ग्राहक पेट्रोलची दुचाकी खरेदी करण्याऐवजी इलेक्ट्रिक दुचाकी घेत आहेत. आज रोजी इलेक्ट्रिक दुचाकीची मागणी वाढत आहे. या दुचाकी इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालतात. त्यामुळे इंधन दरवाढीचा बराच ताण हलका होतो. शिवाय मेंटेनन्सही कमी असतो. ८५ हजार ते दीड लाखांपर्यंत या दुचाकी बाजारात उपलब्ध आहेत.
पेट्रोल दरवाढीमुळे महिन्याकाठी तीन ते साडेतीन हजार रुपयांचे पेट्रोल लागते. इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आल्याने, त्यांना पेट्रोलची गरज नसल्याने व बजेटमध्ये दुचाकी मिळत असल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदी केली आहे.
– संतोष डंगाळे, ग्राहक.
गुढीपाडवा सणानिमित्त माझ्याकडे दहा दुचाकी ग्राहकांनी
बुक केल्या आहेत. ग्राहकांना दुरूस्तीसाठी इतरत्र जाण्याची आवश्यकता नसून येथेच दुरुस्ती केंद्रही सुरू करण्यात आले आहे. तसे पाहिले तर या दुचाकींना मेंटेनन्स नाही.
– विलास डहाळे, ओकाया ईलेक्ट्रिक दुचाकी विक्रेते, पुसद.













