


🔸शाहिद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय, कुऱ्हा चे आयोजन
✒️शशांक चौधरी(कुऱ्हा प्रतिनिधी)
कुऱ्हा(दि.22जानेवारी):-टाळ, मृदूंग, लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात आणि संपूर्ण गावातून आपल्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन देत ग्रंथदिंडीने आज ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून *माझं गाव माझा उत्सव कुऱ्हा महोत्सव २०२३* ची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीमध्ये भारताचे संविधान, ग्रामगिता, तुकाराम गाथा पालखी मध्ये घेऊन गावातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारने संस्कृतीचे दर्शन घडविले. महिला बचत गटाचा सहभाग या ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण होते. या महोत्सवाचे उदघाटन राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोन्डे यांच्याहस्ते संपन्न झाले, तर स्वागताध्यक्ष म्हणून राजेश वानखडे हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा अरुणभाऊ अडसड (माजी आमदार तथा अध्यक्ष श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा गजानन कोटेवार (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ), श्रीरामजी देशपांडे(सचिव अमरावती विभाग ग्रंथालय संघ) मा अरविंद ढोणे (सहाय्यक ग्रंथालय संचालक), मा दीपक गेडाम(निरीक्षक, जिल्हा ग्रंथालय अमरावती ), अब्दुल सत्तार (प.स. सदस्य कुऱ्हा सर्कल), सरपंचा सौं. मीना नायर, उपसरपंच श्री सलीम खा पठाण, मा मोहम्मद हारून मोहम्मद मुस्ताक(अध्यक्ष सरहद गांधी शिक्षण संस्था कुऱ्हा).
या प्रसंगी मंचावर वाचनालयाचे अध्यक्ष विवेक बिंड, संस्थापक अध्यक्ष गिरीधर रोडगे, सचिव अमोल भागवत, उत्सव समिती अध्यक्ष नितीन धांडे, महिला अध्यक्ष संगीता पवार, कुऱ्हा हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौं सामुद्रे मॅडम, विद्यानिकेतन च्या प्राचार्या सौं कन्नाके मॅडम, प्रा डॉ रजनी भाकरे ( भगवानराव प्रशासकीय महाविद्यालय कुऱ्हा) तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. उदघाटन सोहळ्यादरम्यान वेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वीतांचा सत्कार समारंभ व पुस्तक विमोचन करण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन मंगेश भालेराव, सौ. पूनम वेरूळकर व प्रा. रंजनसेन शेंडे यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध कला, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि आधारस्तंभ असलेल्या या वाचनालयाला रोषणाईने सजविण्यात आले असून साई इव्हेंट कुऱ्हा द्वारे सजावट सुद्धा करण्यात आली आहे. या चार दिवसीय आयोजित कुऱ्हा महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालया तर्फे करण्यात येत आहे.













