


✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.१४जून):-अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी गृहनिर्माण सोसायटी, बजरंग नगर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अब्दुल वहीद पटेल होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. अब्दुल बारी, कवी तन्हा नागपुरी, विशेष अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विचारवंत प्रवीण बागडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर सोमकुवर आणि आयु. अशोककुमार डोहारे उपस्थित होते. तर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण बागडे यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. “गुण हे यशाचे एक मापदंड असले तरी व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि सतत ज्ञानार्जन हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. अब्दुल बारी यांनी सर्वधर्म समभाव, सामाजिक सलोखा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक व शिक्षकांचे योगदानही त्यांनी गौरविले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा मांडल्या. उपस्थित पालकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर महिपाल मेश्राम, किरण गायकवाड, बबला पाटील, भरत पानतावणे व संघाराम चकोले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयोजकांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.















