Home महाराष्ट्र झाशीची राणी : पराक्रमाची अमर ज्योत

झाशीची राणी : पराक्रमाची अमर ज्योत

28

राणी लक्ष्मीबाई पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम यांचे तेजस्वी प्रतीक. कवीश्रेष्ठ भा.रा. तांबे यांच्या अमर ओळी “ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली” आजही भारतीयांच्या मनात जाज्वल्यतेने घुमतात. झाशीच्या राणीचे अदम्य धैर्य, तिचा स्वाभिमानी स्वभाव आणि मातृभूमीवरील निष्ठा हीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरते. लेखक रामदास खरे यांनी या तेजस्वी जीवनपटाला ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ या पुस्तकातून प्रभावी, ओघवत्या आणि सुबोध शैलीत शब्दबद्ध केले आहे. अनघा प्रकाशन यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित केलेले हे पुस्तक वाचकांना इतिहासाच्या एका ज्वलंत पर्वात घेऊन जाते. झाशीच्या रणांगणावर घुमणाऱ्या तलवारीच्या झंकारासारखीच या पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचकांच्या मनात धैर्याची साक्ष जागविते.

सुमारे चाळीस वर्षे मनात जपलेली राणी लक्ष्मीबाईंच्या कर्तृत्वाची प्रेरणा लेखकांनी ४० छोट्या पण आशयघन प्रकरणांत मांडली आहे. काशी नगरीतील चंचल ‘मनू’पासून झाशीच्या सिंहासनापर्यंतचा प्रवास, वैवाहिक जीवन, पुत्रशोक, पतीवियोग, इंग्रजांचा कपटी डाव, लॉर्ड डलहौसी यांचे दत्तकविरोधी धोरण, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची धग, मंगल पांडे यांची ठिणगी, तात्या टोपे यांची साथ आणि रणांगणातील निर्णायक संघर्ष, प्रत्येक प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. “मेरी झाशी नहीं दूंगी” ही घोषणा केवळ शब्द नव्हते, ती एका कणखर स्त्रीच्या अदम्य राष्ट्रनिष्ठेची जाज्वल्य शपथ होती, याची प्रकर्षाने जाणीव हे पुस्तक करून देते.

झाशीचे वैभव एका क्षणात उद्ध्वस्त झाले, नियतीने कठोर वळण घेतले; पण संकटांसमोर झुकणे हा राणींच्या स्वभावातच नव्हता. लहानग्या दामोदरराव यांना पाठीशी बांधून रणभूमीत उतरलेली ही रणरागिणी भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक ठरली. इंग्रज सैन्याशी दोन हात करताना त्यांनी दिलेले बलिदान म्हणजे इतिहासातील तेजस्वी केशरी ज्वाला होय. अल्पायुष्यातही त्यांनी निर्माण केलेले तेज आजही भारतीय अस्मितेला प्रेरणा देत राहते.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राणींच्या बलिदानानंतर दामोदररावांच्या आयुष्यात आलेल्या दारुण वास्तवाचे केलेले हृदयस्पर्शी चित्रण. एकेकाळी झाशीच्या वैभवाचा वारस असलेला हा मुलगा इंग्रजांच्या दडपशाहीमुळे गावोगावी आश्रय शोधत फिरला, उपासमारी, भीती, अपमान आणि तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची वेळ त्याच्यावर आली. इतिहासातील हा कमी परिचित पण अंतर्मुख करणारा अध्याय लेखकांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे.

 जळगाव जिल्ह्यातील पारोळा भुईकोट किल्ला आणि राणी लक्ष्मीबाई यांचा संबंध अत्यंत ऐतिहासिक, भावनिक आणि अभिमानास्पद आहे.

लक्ष्मीबाईंचे आणि आपल्या कान्हदेशाचे अत्यंत भावनीक नाते आहे. पारोळा हे गाव केवळ ऐतिहासिक किल्ल्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर झाशीच्या राणीच्या कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळेही विशेष ओळखले जाते. पारोळा येथील किल्ला नेवाळकर घराण्याचा होता. झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांचे नातेवाईक असलेल्या नेवाळकरांनी हा किल्ला उभारला होता. स्थानिक इतिहासानुसार राणी लक्ष्मीबाईंचे माहेरचे तांबे कुटुंबही पारोळा परिसराशी जोडले गेले होते. त्यामुळे पारोळ्याला “झाशीच्या राणीचे मूळ गाव” अशीही ओळख मिळाली. संबंधातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राणींचे दत्तक पुत्र दामोदरराव (जन्मनाव आनंदराव) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८४९ रोजी पारोळ्यात झाल्याची नोंद आढळते. त्यांचे वडील वासुदेवराव नेवाळकर हे पारोळ्याचे जहागीरदार होते. पुढे हाच आनंदराव झाशीच्या गादीचा दत्तक वारस बनला. 

आज राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदानाला दीडशेहून अधिक वर्षे उलटली, तरी त्यांचे शौर्य काळाच्या पडद्याआड गेलेले नाही. साहित्य, संगीत, चित्रकला, नाट्य, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राला प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्त्व आजही तितकेच तेजस्वी आहे. ‘मर्दानी राणी लक्ष्मीबाई’ हे पुस्तक केवळ चरित्र नाही; तो भारतीय स्वाभिमान, स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्याच्या अखंड ज्योतीचा दस्तऐवज आहे. इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पिढीने वाचावे, जपावे आणि पुढे न्यावे असे हे प्रेरणादायी पुस्तक ठरते.

✒️पुस्तक परिचय:-किशोर कुळकर्णी(जळगाव)मो:-९४२०६०७०५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here