


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
परभणी(दि.15एप्रिल):-शहरातील नवजीवन कॉलनी येथे विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दिनांक १४ एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य व्याख्यान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सामाजिक जागृतीच्या वातावरणात संपन्न झाला. सामाजिक समता, मानवमुक्ती, शिक्षण आणि परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या कार्यक्रमाला परभणी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.एम.एम.सुरनर यांनी आपल्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
त्यांनी प्रतिपादन करताना सांगितले की, “हजारो वर्षांची गुलामी तोडून मानवाला मुक्त करणारे मुक्तीदाता म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.”या प्रभावी वाक्याने संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला.प्रा.सुरनर यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे जीवनकार्य, शिक्षणासाठीचा संघर्ष, अस्पृश्यतेविरुद्धची लढाई, स्त्री-पुरुष समानतेसाठीचे योगदान, कामगारांच्या हक्कांसाठीचे प्रयत्न तसेच भारतीय संविधान निर्मितीत त्यांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका यांचे सखोल विवेचन केले. त्यांनी युवकांना बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून ज्ञान, संघटन आणि संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास सामाजिक परिवर्तन चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत, डायरेक्टर शारदा विद्यालय तथा सुप्रसिद्ध अर्थो सर्जन डॉ. बी. टी. धुतमल, मार्गदर्शक प्रा.चरणदास दिवसे, प्रा.एकनाथ दिवसे,पत्रकार राहुल साबणे, मोरे, बनसोडे तसेच अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते संचलन प्रा. चरणदास दिवसे सर यांनी केले. त्यांच्या शैलीदार निवेदनामुळे कार्यक्रमात अधिक रंगत निर्माण झाली. तर आभार प्रदर्शन वाहुळे यांनी मानले.
हा प्रेरणादायी सोहळा यशस्वी करण्यासाठी वैशाली महिला मंडळ आणि बलवान मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकीमुळे कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला.समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर समाजात सतत होत राहावा, तसेच बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचावेत, हा संदेश या भव्य कार्यक्रमातून देण्यात आला. परभणीतील नवजीवन कॉलनी येथे पार पडलेला हा जयंती सोहळा सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरला.














