


▪️व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
✒️प्रतिनिधी परभणी(अनिल साळवे)
परभणी(दि.2एप्रिल):-लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असलेल्या राज्यातील वृत्तपत्र उद्योगातील पत्रकारांच्या प्रशासकीय स्तरावरील विविध मागण्यांना मान्यता देऊन अन्याय थांबविण्याची मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करत व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या वतीने बुधवार १ एप्रिल रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
- लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करत शासनाच्या विविध योजना, निर्णय आणि धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या वृत्तपत्र उद्योगावर गेल्या काही वर्षांत आर्थिकदृष्ट्या मोठा ताण आला असुन व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले पण त्याचा फायदा झाला नाही. आता तरी याकडे लक्ष द्यावे अशी आपेक्षा निवेदनात व्यक्त करून वृत्तपत्रासाठी लागणारे कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, मनुष्यबळ यासारख्या मूलभूत खर्चामध्ये सुमारे १५० टक्के वाढ झालेली असतांना सुद्धा सन २०१९ पासून आजतागायत शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही समर्पक वाढ झालेली नाही.
त्यामुळे अनेक लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे नमूद करून राज्यात ठिकठिकाणी पत्रकारांवर वारंवार होतं असलेले हल्ले आणि अन्याय थांबविण्याची मागणी करत महागाई निर्देशांकानुसार जाहिरात दरात किमान १५० टक्के दरवाढ तातडीने करावी, ई- टेंडर नोटिस जाहिरात संपूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी, जाहिरात आकार किमान २०० चौ.से. निश्चित करावा, शासकीय जाहिरातींचे देयक ३० दिवसांच्या आत अदा करावे, विलंब झाल्यास संबंधित जाहिरात रकमेवर बँक दराने व्याज देण्यात यावे, शासनाच्या विविध बैठका, निर्णय व धोरणांची माहिती वेळेत आणि अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात यावी.
राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, नायब तहसीलदार अशोकराव केंद्रे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया, व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर, अंकुश कांबळे, अली चाऊस, प्रदिप गौरशेटे, राजेश्वर वट्टमवार, राम पवार, वामन ढोबळे, मकरंद चिनके, शेख महेमूद, अतुल कलकोटे, ज्ञानोबा कदम, सय्यद गौस, नागेश बोरीकर, अमोल वझुरकर, लक्ष्मीकांत जोशी, गंगाधर कांबळे, शिवाजी कांबळे आदी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.














