


फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा होळीचा सण हा केवळ रंगांचा उत्सव नाही, तर तो भारतीय संस्कृतीच्या अंत:करणातील आनंद, बंधुभाव आणि परिवर्तनाचा संदेश घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी साजरे होणारे धूलिवंदन म्हणजे रंगांच्या उधळणीतून नात्यांना नवसंजीवनी देण्याचा दिवस असतो. गावोगावी पेटणाऱ्या होळीच्या ज्वाला आणि सकाळी उधळले जाणारे रंग यामागे एक सखोल तात्त्विक अर्थ दडलेला आहे, ते म्हणजे वाईट प्रवृत्तींचे दहन आणि चांगुलपणाचा स्वीकार. होळीचा उगम पौराणिक कथांशी जोडलेला आहे. दैत्यराज हिरण्यकश्यपू आणि त्याची बहीण होलिका यांची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भक्त प्रल्हादाच्या निश्चयी श्रद्धेवर मात करण्यासाठी होलिकेने अग्नीत प्रवेश केला; परंतु सत्य, श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर प्रल्हाद वाचला आणि होलिका भस्मसात झाली. या कथेतून मिळणारा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. अहंकार, अन्याय आणि अत्याचाराचा अंत निश्चित असतो. परंतु प्रश्न असा आहे की, आपण केवळ होळी पेटवतो की खरोखरच आपल्या मनातील ‘होलिका’ जाळतो? आजच्या समाजात असूया, मत्सर, द्वेष, राजकीय स्वार्थ, धार्मिक ध्रुवीकरण यांसारख्या प्रवृत्ती वाढताना दिसतात. अशा वेळी होळी ही केवळ विधी न राहता आत्मपरीक्षणाची संधी ठरायला हवी.
धूलिवंदन म्हणजे रंगांचा खेळ. सकाळी अंगावर रंग उधळत आपण एकमेकांना “बुरा न मानो होली है” असे म्हणत हसतखेळत क्षमा मागतो, क्षमा देतो. समाजातील भेद, जात, धर्म, वर्ग, श्रीमंती-गरीबी क्षणभरासाठी का होईना, विरघळतात. रंगांचे वैशिष्ट्य असे की ते प्रत्येकाला सारखेच रंगवतात. पांढरा कुर्ता असो वा महागडी साडी, रंग लागला की सगळे समान! आजच्या काळात ही समता टिकवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या मोजपट्टीवर नाती मोजतो. प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत चालल्या आहेत. धूलिवंदन हा सण आपल्याला सांगतो माणसांमध्ये मिसळा, मनमोकळे हसा, जुने राग विसरा. अलीकडच्या काळात होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर लाकूड जाळले जाते. रासायनिक रंगांचा वापर वाढतो. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते, त्वचेच्या तक्रारी वाढतात. सण साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणे ही देखील सामाजिक जबाबदारी आहे. शेतीप्रधान देशात फाल्गुन हा हंगाम संपण्याचा आणि नवीन पीक येण्याचा काळ आहे. होळी ही निसर्गाच्या चक्राशी जोडलेली परंपरा आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक होळी, नैसर्गिक रंगांचा वापर आणि पाण्याची बचत हे आजचे ‘नवे संस्कार’ ठरायला हवेत.
महाराष्ट्रात धूलिवंदनानंतर रंगपंचमीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नागपूर सारख्या शहरात तर मित्रपरिवार, कुटुंबीय आणि समाजातील विविध घटक एकत्र येऊन हा सण आनंदाने साजरा करतात. परंतु काही ठिकाणी रंगांच्या नावाखाली जबरदस्ती, मद्यपान, महिलांवर गैरवर्तन यासारखे प्रकारही घडतात. हे चित्र चिंताजनक आहे. सणांचा आत्मा हा आनंद आणि सन्मानात असतो; दडपशाहीत नाही. “रंग लावला म्हणजे अधिकार मिळाला” अशी मानसिकता बदलायला हवी. धूलिवंदन हे ‘सन्मानाने रंगवणे’ शिकवते, ‘जबरदस्तीने रंग चोपडणे’ नव्हे. भारतीय समाजजीवनात सणांचे राजकारणाशीही नाते आहे. काही वेळा सणांच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होतात. होळीचा खरा संदेश मात्र एकात्मतेचा आहे. विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. होळी आपल्याला सांगते मतभेद असू द्या, पण मनभेद नकोत.
आज देशासमोर बेरोजगारी, महागाई, शिक्षण-आरोग्याच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न उभे आहेत. होळीच्या ज्वालेसमोर उभे राहून आपण या प्रश्नांवरही विचार करायला हवा. केवळ व्यक्तीगत राग-द्वेष जाळून चालणार नाही; समाजातील अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचार यांनाही जाळण्याचा निर्धार हवा. इतिहासात होळीच्या उत्सवात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहिला आहे. लोकगीते, फुगड्या, सामूहिक नृत्य यांतून स्त्रियांनी आपला आनंद व्यक्त केला. आजच्या काळात स्त्री-पुरुष समानतेचा संदेशही या सणातून द्यायला हवा. महिलांना सुरक्षित आणि सन्मानाने सण साजरा करता यावा, ही समाजाची जबाबदारी आहे. होळीच्या निमित्ताने बाजारपेठा गजबजतात. रंग, पिचकाऱ्या, मिठाई, पारंपरिक पदार्थ या सर्वांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. गावरान पुरणपोळी, करंजी, गूळ-पोहे यांचा सुगंध घराघरांत दरवळतो. सण हा अर्थचक्रालाही गती देतो. मात्र, खर्चाच्या स्पर्धेत अडकून मूळ आनंद हरवू नये, याची जाणीव ठेवायला हवी.
होळी आणि धूलिवंदन हे नात्यांच्या पुनर्बांधणीचे दिवस आहेत. वर्षभरात गैरसमज होतात, कटुता वाढते. पण या सणाच्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटतो, मिठी मारतो, “रंगपंचमीच्या शुभेच्छा” देतो आणि नवे वर्ष नव्या उत्साहाने सुरू करतो. ज्या समाजात संवाद थांबतो, तिथे तणाव वाढतो. होळीचा रंग म्हणजे संवादाची सुरुवात. धूलिवंदन म्हणजे अहंकाराची धूळ झटकून टाकणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतर्मनातील होळी. आपल्या मनात साठलेले राग, भीती, न्यूनगंड, असुरक्षितता या सर्वांना जाळणे आवश्यक आहे. होळीची ज्वाला आपल्याला धैर्य देते; धूलिवंदनाचा रंग आपल्याला आनंद देतो. आजच्या वेगवान, तणावपूर्ण जीवनात आपण आनंद साजरा करायलाही विसरलो आहोत. होळी हा सण सांगतो, जगणे म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर उत्सवही आहे.
होळी आणि धूलिवंदन हे केवळ परंपरा नाहीत; ते जीवनदृष्टी आहेत. अन्यायावर न्यायाचा विजय, द्वेषावर प्रेमाचा विजय, निराशेवर आशेचा विजय हा संदेश या सणात दडलेला आहे. यावर्षी होळी पेटवताना आपण केवळ लाकूड जाळू नये; आपल्या मनातील कटुता जाळू या. धूलिवंदन साजरे करताना केवळ रंग उधळू नये; प्रेम, सन्मान आणि समतेचे रंग उधळू या. रंगांच्या या सणात प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची उधळण होवो, समाजात सौहार्द फुलो आणि आपल्या अंत:करणातील होलिका भस्मसात होवो, हीच अपेक्षा. सर्वांना होळी आणि धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९














