Home महाराष्ट्र मराठी भाषेतून करिअरच्या अधिक संधी -प्रा. डॉ. हेमंत कुंभार

मराठी भाषेतून करिअरच्या अधिक संधी -प्रा. डॉ. हेमंत कुंभार

86

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.28फेब्रुवारी):-‘माझ्या मराठीची बोलू कौतुके | परि अमृतातेहि पैजासी जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मिळविन ||’ अशी थोरवी संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची गायली आहे. ही मराठी भाषा ज्ञानात्मक आहे. मातृभाषेतून ज्ञान आत्मसात करण्यास सोपे जाते त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते. मराठी भाषेतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. साहित्यिक क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, प्रसारमाध्यमे, प्रशासकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, नाट्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घेऊन या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. हेमंत कुंभार यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे मराठी विभाग आयोजित कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर जयंती व ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त’ कार्यक्रमात बोलत होते. 

              अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस.आर.सरोदे मॅडम होत्या. त्या म्हणाल्या, ‘ मराठी ही मातृभाषा आहे. आपण आपल्या भावना मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. मातृभाषेतूनच आपल्या संवेदना प्रकर्षाने जागृत होतात. आपल्यातील संवेदना आणि भावना जागृत ठेवण्यासाठी मातृभाषेतून संवाद करणे खूप गरजेचे आहे. मातृभाषा नसेल तर माणूस संवेदनाहीन बनेल. यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा व्यवहारामध्ये अधिकाधिक वापर करावा. अलीकडच्या तांत्रिक युगात माणूस तंत्रज्ञानावर जगत आहे. परंतु भाषिक कौशल्य यांचा विकास होणे खूप गरजेचे आहे. भाषेमुळे सांस्कृतिक संक्रमण हे चांगले होते. यासाठी मातृभाषा टिकणे, भाषेचा अधिकाधिक वापर करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले. 

        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख प्रा. पी. एस. चोपडे यांनी करून दिली. तसेच आभार प्रा. व्ही. आय. आंबेकरी यांनी मानले. आणि सूत्रसंचालन प्रा. सौ. एस. व्ही. पाटील मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here