


“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥ “
मराठी भाषेच्या या गौरव गीतात कविश्रेष्ठ- गझलसम्राट सुरेश भट यांनी मराठीचे महत्त्व अधोरेखित केले आहे .
अशा या मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारकडून ‘अभिजात भाषेचा’ (Classical Language) दर्जा बहाल करण्यात आला. हा केवळ एक सन्मान नसून मराठी भाषेच्या प्राचीनतेवर आणि समृद्धीवर शिक्कामोर्तब करणारा एक ऐतिहासिक क्षण आहे.
अभिजात भाषेचा दर्जा अशा भाषांना दिला जातो ज्यांना अत्यंत प्राचीन इतिहास आहे आणि ज्यांचे साहित्य मौलिक तसेच स्वयंभू आहे. भारत सरकारने यासाठी काही कडक निकष ठरवले आहेत .
भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षे जुना असावा .भाषेमध्ये प्राचीन साहित्याचा मोठा वारसा असावा.भाषेचे मूळ स्वरूप आणि साहित्य हे दुसऱ्या कोणत्याही भाषेतून घेतलेले नसावे.प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यामध्ये दुवा असावा.मराठीला हा दर्जा मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. रंगनाथ पठारे समितीने या संदर्भात सविस्तर अहवाल सादर केला होता. त्यात खालील महत्त्वाचे पुरावे दिले होते . गाथासप्तशती – साधारण २ हजार वर्षांपूर्वीचा सातवाहन राजाचा हा ग्रंथ मराठीच्या प्राचीनतेचा मुख्य पुरावा मानला जातो. जुन्नर येथील नाणेघाटातील शिलालेख आणि अक्षी येथील शिलालेख मराठीच्या अस्तित्वाचे जुने पुरावे आहेत. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’ यांसारख्या महान ग्रंथांनी मराठीची साहित्यिक समृद्धी सिद्ध केली आहे.
“साहित्याचा वारसा थोर,
भाषेचा हा साज ॥
कुसुमाग्रज, बापट अन् मर्ढेकरांचा माज ॥
मायबोली ही आमची, अमृताहुनी गोड ॥
मराठीच्या तेजाला, नाही कशाचीच जोड ॥”
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठे मार्ग मोकळे झाले आहेत . मराठी भाषेच्या अभ्यास आणि संशोधनासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठा निधी उपलब्ध होईल.मराठी भाषेसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र (Centre of Excellence for Studies in Classical Marathi) स्थापन केले जाईल.
अध्यासन देशातील मोठ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र ‘अध्यासन’ सुरू केले जातील.प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. मराठी भाषेची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर वाढेल.
मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाल्यानंतर या भाषेचे संवर्धन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी सरकारतर्फे काही महत्त्वाची पाऊले उचलली गेली आहेत.
“माझ्या मराठीची गोडी,
वाटते मज अवीट ।
मराठीच्या शब्दाशब्दात,
साठले ज्ञान अफाट ॥
मराठी भाषा विद्यापीठ (रिद्धपूर, जि.अमरावती) ची स्थापना झाली.मराठी भाषेच्या सर्वांगीण संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्वतंत्र ‘मराठी भाषा विद्यापीठ’ स्थापन केले आहे.रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान असून, येथे मराठीतील आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. त्यामुळे हे विद्यापीठ मराठीच्या प्राचीन साहित्यावर संशोधन करण्याचे मुख्य केंद्र झाले आहे.
मराठी भाषेचा इतिहास, व्याकरण, हस्तलिखिते आणि विविध बोलीभाषांवर शास्त्रीय संशोधन करण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे .मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर केंद्र सरकारच्या नियमांनुसार, ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस’ (CIIL), म्हैसूर अंतर्गत महाराष्ट्रात एक अभिजात मराठी संशोधन केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हे केंद्र प्रामुख्याने पुणे येथे प्रस्तावित आहे, कारण पुणे हे विद्येचे माहेरघर आणि मराठी साहित्याचे केंद्र मानले जाते.
प्राचीन कोरीव लेख, ताम्रपट आणि दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन व संशोधन करणे. इत्यादी कार्य या अभिजात मराठी संशोधन केंद्रात होणार आहे .
राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) -अभिजात दर्जाच्या अंमलबजावणीसाठी आणि भाषेच्या आधुनिक संशोधनासाठी मुंबई येथील ‘राज्य मराठी विकास संस्था’ (RMVS) मुख्य समन्वयक म्हणून कार्य करीत आहे. ही संस्था तांत्रिक क्षेत्रात मराठीचा वापर वाढवण्यासाठी संशोधन करत आहे.डेक्कन कॉलेज, पुणे येथील भाषाशास्त्र विभागात मराठीच्या उत्पत्तीवर आणि प्राचीनतेवर सातत्याने संशोधन केले जाते.
मराठी साहित्य महामंडळ – विविध साहित्य संमेलनांच्या माध्यमातून आणि त्यांच्या घटक संस्थांमार्फत (पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई) बोलीभाषांच्या संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारकडून दरवर्षी या संशोधन केंद्रांच्या विकासासाठी आणि प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे.
अशा या मराठी भाषेचे संवर्धन करणे ही केवळ काळाची गरज नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे आहे. दैनंदिन वापरात मराठीचा आग्रह धरणे आवश्यक आहे . बँका, दुकाने, आणि शासकीय कार्यालयांत मराठी अर्जांचा आणि संवादाचा वापर वाढविण्याची गरज आहे .
आपली स्वाक्षरी मराठीत करून भाषेप्रती आदर व्यक्त करावा.
मुलांचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून व्हावे यासाठी प्रयत्न करणे, जेणेकरून पाया मजबूत होईल.घरात मराठी वर्तमानपत्रे, मासिके आणि पुस्तके ठेवणे. ग्रंथालयांचे सदस्य होणे आणि ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहाने साजरा करणे. स्थानिक पातळीवर बाल साहित्य संमेलने आयोजित करून लहान मुलांमध्ये भाषेची गोडी निर्माण करणे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर मराठीतून व्यक्त होणे .मराठी विकिपीडियावर माहिती भरून ज्ञानभाषा समृद्ध करण्यास हातभार लावणे.जास्तीत जास्त मोबाईल अॅप्स आणि संगणक प्रणाली मराठी भाषेत वापरणे (उदा. मराठी कीबोर्ड). मराठी भाषेतून व्यावसायिक कौशल्ये देणारे अभ्यासक्रम सुरू करणे.
सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत (देवनागरी लिपिक) असण्याबाबतच्या नियमांचे पालन करणे.जागतिक दर्जाचे साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विषय मराठीत अनुवादित करणे . भाषेचे शुद्धीकरण आणि संवर्धन
करणे बोलताना किंवा लिहिताना अशुद्ध शब्द टाळून शुद्ध मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न करणे.लोप पावत चाललेल्या ग्रामीण आणि बोलीभाषेतील शब्दांचे दस्तऐवजीकरण करणे.
”मराठी पाऊल पडते पुढे” हे केवळ ब्रीदवाक्य न राहता, ते आपल्या कृतीतून दिसणे महत्त्वाचे आहे.
“शब्दात शस्त्र आहे,
शब्दात शास्त्र आहे ॥
मराठीच्या प्रत्येक वळणात,
एक वेगळेच अस्त्र आहे ॥
छत्रपतींच्या तलवारीची,
हीच ती धार आहे ॥
मराठी मातीचा आणि मनाचा, हाच खरा आधार आहे.॥”
अशा या समृद्ध मराठी भाषेच्या गौरव दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९














