


✒️नागेश खुपसे(विशेष प्रतिनिधी)
सोलापूर(दि.12जानेवारी):- ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’च्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही म्हणजेच २०२६ सालासाठी साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामध्ये स्व. यशवंत चिंधू नेरे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार, स्व. विष्णूपंत माळोकार स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार, स्व.सौ. सुंदर बोंगाळे स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार, दिलीप गोविंद दमाणे स्मृती सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार, स्व.रूक्मिणीबाई नारायण चवडेकर स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार, शंकर घोरसे सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, स्व.भिमाई बाविस्कर स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, स्व. जयवंती राजाराम तावडे स्मृती सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, कै.सौ. मातोश्री रत्नाबाई घोडके स्मृती सर्वोत्कृष्ट ललित साहित्य पुरस्कार, मातोश्री कै.शालिनी चिंचवडकर स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार, एडव्होकेट कॉ. मदन फडणीस स्मृती सर्वोत्कृष्ट चरित्र/प्रेरणादायी साहित्य पुरस्कार, स्व. पुष्पावती धर्माधिकारी स्मृती आत्मचरित्र साहित्य पुरस्कार” इत्यादी पुरस्कारांचा समावेश असून प्रत्येकी रू. १५०१/- रोख, १०००/- ची पुस्तके आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय या वर्षापासून काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्य संस्थेला “माधवराव कचवे स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्य संस्था पुरस्कार” देण्यात येणार असून सदर पुरस्काराचे स्वरूप ३५०१/- रोख, १०००/-ची पुस्तके, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
सदरील साहित्य पुरस्कारांसाठी “कविता, गझल, कथा, कादंबरी, ललित/वैचारिक, बालसाहित्य, चरित्र” या मराठी साहित्य प्रकारांतीलच प्रथम आवृत्तीची पुस्तके विचारात घेतली जातील. साहित्य अनुवादित नसावे. पुस्तक दि. १.१.२०२५ ते ३१.१२.२०२५ या कालावधीतच प्रकाशित झालेले असावे. कोणत्याही एकाच साहित्य प्रकाराची पुस्तके पाठवावे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठ, मलपृष्ठ अथवा आतील पानावर काहीच लिहीलेले नसावे. तसे असल्यास सदर पुस्तक पुरस्कारासाठी अपात्र ठरविण्यात येईल, प्राप्त पुस्तकांच्या प्रमाणात पुरस्कारांची संख्या असेल. पुरस्कारांसाठी पाठवलेली पुस्तके कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाहीत. पुरस्कारांसाठी पुस्तकांची निवड ‘परीक्षक समिती’कडून होईल. सदर समितीचा निर्णय अंतिम व सर्वांनाच बंधनकारक राहील. पुरस्कार स्वीकृतीसाठी साहित्यिकाराने स्वत: उपस्थित राहावे. प्रतिनिधींना पाठवू नये, विजेते उपस्थित राहण्यास सक्षम नसतील तर द्वितीय विजेत्यांना संधी देण्यात येईल, पुरस्कार पुस्तकाला असल्याने अर्ज, परिचय अथवा फोटो पाठवू नये. सदरील माहिती पुरस्कार प्राप्त साहित्यिकांकडून नंतर मागविण्यात येईल, पुरस्कारांचे वितरण विशेष समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते होईल.
समारंभाची तारीख व स्थळ यथावकाश कळविण्यात येईल, साहित्य संस्था पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवताना संस्था ५ वर्षांपूर्वीची असावी, संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी, मागील तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण केलेले असावे, संस्थेने भरगच्च साहित्य उपक्रम राबविलेले असावे. योग्य पुरावे जोडलेले असावेत, सदर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती आणि साहित्य संस्था पुरस्कारासाठी प्रस्ताव “व्यंकटेशा कॉम्प्युटेक, शॉप नंबर ९, बनशंकरी नगर, म्हाडा कॉलनी, टाकळीकर मंगल कार्यालय रोड, जुळे सोलापूर, सोलापूर-४१३००८, फोन : 0217-2300040, संवाद किंवा व्हाट्सअँप : 9326612436 या पत्त्यावर दि. १०.२.२०२६ पर्यंत पाठवावेत मुदतीनंतर आलेल्या पुस्तकांचा व प्रस्तावाचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही. अशी माहिती काव्यप्रेमी शिक्षक मंच, साताराचे जिल्हा अध्यक्ष प्रा. संतोष बोंगाळे यांनी दिली आहे.














