Home अमरावती महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

467

न्यायपंडित,सर्व शास्त्रात दिग्विजयी ठरलेले, सर्व विद्यासंपन्न, अचलवीर, आकाशातील सूर्य आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित सत् धम्म मार्गदर्शक,धम्मप्रवर्तक भारतरत्न – बोधिसत्व महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांना त्यांच्या दि.६ डिसेंबर २०२५ रोजी असलेल्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

        बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा ​जन्म दि.१४ एप्रिल १८९१ सालातील एप्रिल मासाच्या १४ तारखेला मध्य प्रदेशातील महू (सध्याचे डॉ. आंबेडकर नगर) येथे झाला. त्यांचे महापरिनिर्वाण दि.६ डिसेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे झाले.​डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार,थोर अर्थशास्त्रज्ञ,कायदेपंडित आणि महान समाजसुधारक होते.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आणि त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले संदेश अनमोल आहेत. त्यांचे विद्यार्थी जीवन अत्यंत संघर्षमय पण अध्ययनशील होते.​सामाजिक विषमतेचा सामना त्यांना त्यांच्या शालेय जीवनापासूनच करावा लागला.अस्पृश्यतेमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना वर्गातील स्पृश्य मुलांपासून भरून आणलेल्या गोणपाटावर दूर बसावे लागत असे.कधी कधी तर वर्गाच्या बाहेर बसावे लागे.काही शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.शाळेत पाणी पिण्यासाठीही त्यांना शिपायाची मदत घ्यावी लागायची.त्यांच्या आत्मचरित्रात्मक नोंदीनुसार, जातीभेदांमुळे त्यांना एलफिन्स्टन शाळेतील सामान्य नळाचे पाणी पिण्याची परवानगी नव्हती.त्यांनी नमूद केले आहे की, पाणी पिण्यासाठी त्यांना शाळेतील शिपायाची (peon) वाट पाहावी लागत असे;कारण शिपायाने पाणी दिले तरच त्यांना ते पिण्याची परवानगी होती. त्यांनी याचा उल्लेख ” No Peon, No Water” (शिपाई नाही, पाणी नाही) अशा शब्दांत केला आहे.पण त्यांच्यामध्ये​ शिक्षणाची तळमळ होती.पुढील जीवनात आलेल्या सर्व अडचणींवर त्यांनी फक्त शिक्षणाच्या बळावर मात केली. विद्यार्थी जीवनात ते दररोज अठरा तास अभ्यास करीत असत.विद्यार्थी जीवनात त्यांचे वाचन,मनन,चिंतन,लेखन सतत सुरू असे, त्यात ते कधीही खंड पडू देत नसत.​अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ज्ञानाची कास धरली.ते मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा सन : १९०७ साली उत्तीर्ण झाले.ते कुटुंबातील व समाजातील पहिले महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

पुढे त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला.​जागतिक स्तरावर त्यांनी शिक्षण घेतले.त्यांनी भारतासह परदेशात,जसे की कोलंबिया विद्यापीठ (न्यू यॉर्क) आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले.अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास अशा ६४ विषयांवर त्यांचा अभ्यास होता. त्यांनी अनेक पदव्या बौद्धिक परिश्रम,जिद्द आणि चिकाटी या गुणांमुळे मिळविल्या.आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे हे गुण आचरणात आणल्यास आजचा विद्यार्थी कोणत्याही वर्गात मागे न राहता विद्यार्थी जीवनात पूर्णपणे यशस्वी होईल. डॉ.आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महान प्रेरणास्रोत आहे.     

                   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक हेच खरे मित्र होते.त्यांना पुस्तकांबद्दल खूप प्रेम होते.पुस्तकाएवढा चांगला मित्र शोधूनही मिळणार नाही,हा त्यांचा विचार खूप महत्वपूर्ण होता आणि त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथाशी मैत्री करण्याचा संदेश दिला.

     डॉ.आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना दिलेले संदेश महत्वपूर्ण आहेत.​त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा आहे. ​शिका म्हणजे शिक्षण घ्या .​शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे. शिक्षणामुळेच जीवनात प्रगतीचा मार्ग उघडतो.

​’शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल,तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.असे ते म्हणत असत .

​विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून समाजाचे निष्ठावान नेते बनले पाहिजे तेव्हाच देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाता येईल.​शिक्षण हे केवळ नोकरीसाठी न मिळविता, समाजाच्या उत्थानासाठीही मिळविले पाहिजे.​सर्वांनी शिकले पाहिजे;कारण शिक्षणाअभावी माणूस सर्वस्व गमावतो हे लक्षात ठेवले पाहिजे,असे ते म्हणत असत

         ” संघटित व्हा .” या संदेशात त्यांनी म्हटले आहे की,

​एकत्रित येऊन आपल्या हक्कांसाठी आणि सामाजिक बदलांसाठी लढा दिला पाहिजे.

          “संघर्ष करा.” या संदेशात त्यांनी म्हटले आहे की ,​सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

         ” शील” ( सदाचारी चारित्र्य)चे महत्त्व सांगताना त्यांनी म्हटले आहे की,

​शिक्षणासोबत शीलवान असणे अत्यंत आवश्यक आहे. जर शिक्षित व्यक्ती शीलवान नसेल, तर तो आपल्या बुद्धिचा उपयोग समाजाचे नुकसान करण्यासाठी करू शकतो. शिक्षण आणि शील यांचा समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे.शिक्षित व्यक्ती शीलवान असेल तर त्या व्यक्तीचा समाजाला फार मोठा फायदा होऊ शकतो.​ आज बाबासाहेबांनी सांगितलेल्या शीलवान व्यक्तीची समाजाला पर्यायाने देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी खूप आवश्यकता आहे पण दुर्दैव.

                      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरोगामी विचारांचा प्रसार करण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील ज्ञान समाजापर्यंत पोहोचवून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे सुरू केली होती.

      मूकनायक : सन : १९२० मध्ये ‘ मूकनायक ‘या पाक्षिकाची सुरुवात केली.मूक (न बोलू शकणाऱ्या) समाजाला आवाज देणे हे पाक्षिक प्रकाशित करण्यामागे त्यांचा मुख्य उद्देश होता. सन : १९२७ मध्ये ‘ बहिष्कृत भारत ‘ या पाक्षिकाची सुरुवात केली,नंतर या पक्षिकाचे साप्ताहिकात रूपांतर केले.

अस्पृश्य समाजाचे प्रश्न आणि त्यांच्यावरील अन्याय जगासमोर आणणे हा उद्देश हे पाक्षिक प्रकाशित करण्यामागे होता. सन : १९२८ मध्ये ‘ समता हे पाक्षिक सुरु केले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘समाज समता संघा’चे मुखपत्र म्हणून सामाजिक समतेच्या विचारांचा प्रसार करणे हा उद्देश हे पाक्षिक प्रकाशित करण्यामागे होता.

   १९३० मध्ये ‘ जनता ‘ हे पाक्षिक प्रकाशित केले,नंतर त्याचे साप्ताहिकात रूपांतर झाले. ‘जनता’ या वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. याचे ब्रीदवाक्य ‘गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे होते.

        दि.४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘ प्रबुद्ध भारत ‘ या साप्ताहिकाचे प्रकाशन केले.हे वृत्तपत्र ‘जनता’ याच वृत्तपत्राचे नामांतर करून सुरू करण्यात आले होते.​डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले “प्रबुद्ध भारत” हे नियतकालिक आता पाक्षिक म्हणून प्रकाशित होत आहे,ते आजही सुरू आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हे प्रकाशन बंद होते.दि.११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेबांचे नातू ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ॲड.प्रकाश आंबेडकर हे या पाक्षिकाचे सध्याचे संपादक आहेत.​

       प्रबुद्ध भारतचे ​संस्थापक संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.मराठी भाषेतील प्रबुद्ध भारत या साप्ताहिकाचा

​उद्देश बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याच्या आणि ‘प्रबुद्ध भारत’ (प्रबुद्ध किंवा जागृत भारत) या संकल्पनेला मूर्त रूप देण्याच्या त्यांच्या चळवळीचा आणि विचारांचा प्रसार करणे हा होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेली वृत्तपत्रे प्रामुख्याने मराठी भाषेत प्रकाशित झाली होती;कारण त्या काळात महाराष्ट्रातील सामान्य जनतेची ती भाषा होती.त्यामुळे त्यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार फार मोठ्या प्रमाणात तत्कालीन काळात झाला.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.६ डिसेंबर १९५६ रोजी झालेल्या महापरिनिर्वाणानंतरचा संपूर्ण प्रसंग कॅमेरामध्ये चित्रित करणारे व्यक्ती नामदेव व्हटकर हे होते.​ते मूळचे कोल्हापूरचे होते.

​डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्यांनी तो प्रसंग चित्रित (Filming/Videography) करण्याचा निर्णय घेतला.

​या चित्रीकरणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते,त्यामुळे त्यांनी आपले घर आणि छापखाना गहाण ठेवून १४०० ते १५०० रुपये जमवले.​या पैशांतून त्यांनी कॅमेरा भाड्याने घेतला आणि शंकरराव सावेकर नावाच्या कॅमेरामनला सोबत घेतले. दि.​६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या ट्र्कवर एका कोपऱ्यात उभे राहून त्यांनी दादर येथील राजगृहासमोरून ते चैत्यभूमीपर्यंतच्या अंत्यदर्शनाच्या मिरवणुकीचे आणि अंत्यसंस्काराचे चित्रीकरण केले.

​त्यांनी सुमारे २८०० फूट फिल्मचे शूटिंग केले.​हा माहितीपट (Documentary) तयार करण्यात नामदेव व्हटकर यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि निःस्वार्थ त्याग होता,ज्यामुळे आज आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणांचे दृश्य स्वरूपात दर्शन घडते . या फुटेजला ‘महापरिनिर्वाण’ नावानेही ओळखले जाते.​नामदेव व्हटकर हे एक पडद्यामागील हिरो ठरले, ज्यांच्या प्रयत्नांमुळे डॉ. आंबेडकरांच्या अंतिम यात्रेची दृश्ये इतिहासात कायमस्वरूपी जतन झाली आहेत.

          दि . १ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.या भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेमध्ये ​डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून रिझर्व्ह बँकेच्या रचना आणि दृष्टिकोनासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेण्यात आले होते.

     भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) स्थापनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा वाटा आहे, असे म्हणण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत.डॉ.आंबेडकरांनी ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ (The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution) हा महत्त्वाचा प्रबंध लिहिला होता.​या प्रबंधामध्ये त्यांनी भारतातील चलन पद्धती, विनिमय दर आणि आर्थिक समस्यांवर सखोल विश्लेषण केले होते.​याच प्रबंधात त्यांनी भारतासाठी एका केंद्रीय बँकेची (Central Bank) म्हणजेच रिझर्व बँकेची आवश्यकता आणि कार्यपद्धती स्पष्ट केली होती. सनः​ १९२६ मध्ये भारतात आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि चलन व वित्तव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स (ज्याला हिल्टन यंग कमिशन असेही म्हणतात) नेमण्यात आले होते. डॉ.आंबेडकरांना या कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी बोलावले होते.​विशेष म्हणजे,या कमिशनमधील सदस्यांनी डॉ. आंबेडकरांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या पुस्तकाचा आधार घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या विचारांवर आधारित प्रश्न विचारले.​बाबासाहेबांनी कमिशनसमोर स्वतंत्र रिझर्व्ह बँकेची गरज आणि तिची कार्यप्रणाली अत्यंत तर्कशुद्ध व विश्लेषणात्मक पद्धतीने मांडली.RBI च्या संकल्पनेचा आणि रचनेचा पाया १९३५ मध्ये ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ नुसार RBI ची स्थापना झाली, त्या कायद्यातील अनेक तरतुदी आणि बँकेची रचना व दृष्टिकोन हे प्रामुख्याने हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशींवर आधारित होते आणि ​आयोगाने ज्या शिफारशी केल्या, त्याचा मुख्य आधार डॉ. आंबेडकरांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथातील मूलभूत संकल्पना होत्या.​बाबासाहेबांनी या पुस्तकात देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी चलन निर्मितीचे नियंत्रण आणि पतधोरण सांभाळणारी एक स्वायत्त मध्यवर्ती बँक असावी,अशी दूरदृष्टीची संकल्पना मांडली, जी आजही RBI च्या कामकाजाचा आधार आहे. सारांश,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ कायदेतज्ज्ञ आणि समाजसुधारकच नव्हते तर ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते आणि त्यांच्या सखोल आर्थिक विचारांमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची संकल्पना आणि रूपरेषा निश्चित झाली. त्यामुळेच RBI च्या स्थापनेत त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे असे मानले जाते. अशा या भारतरत्न – बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ।

६९ व्या महापरिनिर्वाण दिनी ।

वंदन करांनी कोटी कोटी ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here