Home अमरावती वास्तव मांडणारा कविता संग्रह”मसानातले दिवे…

वास्तव मांडणारा कविता संग्रह”मसानातले दिवे…

137

मसानातले दिवे हे कविता संग्रहाचे शीर्षक जरी काहीसे वेगळे वाटत असले तरी कवी श्री. न.डोंगरे हे शीर्षकाच्या खोलात गेले असावेत आणि यातूनच त्यांनी कविता संग्रहाला मसानातले दिवे हे शीर्षक दिले असावे.या कविता संग्रहाआधी भरारी नावाचा पहिला कविता संग्रह साहित्य प्रांतात दाखल झाला आणि त्यानंतर साहित्य प्रांतात दाखल होणारा मसानातले दिवे हा कवी श्री.न.डोंगरे यांचा दुसरा कविता संग्रह होय.या कविता संग्रहावर आपण लिहावे आणि जे काही कवितेत दडले आहे याची उकल करावी तसेच रसिक,वाचक वर्गापर्यंत हा कविता संग्रह पोहचावा हाच यामागचा प्रामाणिक हेतू आहे . मसानातील दिवे या कविता संग्रहातील कवी श्री.न.डोंगरे यांची ज्ञान सूर्य दूर गेला ही कविता गझलकडे वळताना दिसते.एकंदरीत कवी श्री. न .डोंगरे यांच्या कविता वृत्तबद्ध असल्याचे जाणवते.स्वातंत्र्य, समता,न्याय,बंधुता यावर आधारित भारताची राज्यघटना असून ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाने स्वतंत्र भारतातील जनतेला जे दुःख झाले त्या दुःखाला कवी श्री. न.डोंगरे यांनी कवितेतून वाचा फोडली आहे.

“तो ज्ञानसूर्य अमुच्या पासून दूर गेला

डोळ्यात आसवांचा ठेवून पूर गेला”

खरेतर ही कविता गझलकडे वळलेली दिसते.कवी श्री. न.डोंगरे यांनी गझल तंत्राचा अभ्यास केल्यास त्यांच्या हातून चांगली गझल निर्मिती होऊ शकते.संविधान वाचू या ही कविता नुसती कविता नसून कवीने दिलेली आंतरिक हाक आहे. मानसिक संतुलन बिघडलेले संविधान बदलण्याची भाषा बोलतात तेव्हा पुन्हा गुलामी येईल का ही भीती कवीला स्वस्थ बसू देत नाही.त्यामुळेच कवी श्री. न.डोंगरे जागल्याची भूमिका पार पाडत कवितेतून सजग करतांना दिसतात .

“अंधारल्या धुक्यात दिसते नवीन छाया

येते नवी गुलामी आम्हास रे जगाया”

“ऐका रे बांधवांनो जाईल वेळ वाया

संग्राम हा लढूया संविधान वाचवाया”

तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान हे मानवी उत्कृषाचे तत्वज्ञान आहे.तथागतांचा माणूस केंद्रीत धम्म आहे .धम्म हा माणसाच्या दुःख मुक्तीचा मार्ग आहे.तथागतांचा विचार हा स्त्री, पुरुष समानतेचा विचार आहे.माणसाला माणुसकी शिकविणारा विचार आहे.त्यामुळे 

कवी श्री न.डोंगरे हे तव धम्मचक्र या कवितेत जगाला शांतीच्या संदेश देणाऱ्या आणि मानवी उत्कर्षाला पोषक अशा माणसतज्ञ तथागतांचा गौरव करतात.

“सिद्धार्थ गौतमा तुम्ही झालात ज्ञानराजा

ज्ञानी तुमच्या समान नाही कुणी जगात” 

“संदेश तुम्ही सुखाचा देऊनिया जगाला

नांदो सदैव शांती हर एक माणसात “

 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ,”जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा,मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे”.असे म्हटले पण प्रत्यक्षात मात्र ते अंगीकृत केले नाही.नेते पण नेतृत्व नाही.परिणामी राजकारणात गती मिळाली नाही.यातूनच चळवळीची रान झालेली अवस्था कवीला अस्वस्थ करते. 

“तव क्रांतीच्या रथाला नाही कुणी शिपाई

झाली अनाथ आता बाबा तुझी रिपाई “

 पुरुषी अहंकाराने झपाटलेले लोक स्त्रीचे अस्तित्व नाकारतात.तिला अबला आणि दुर्बल समजून तिची अवहेलना करतात.पुरुषी मानसिकता “ती” चा जन्म नाकारतात.आपला जन्म आणि आपण कोणामुळे हे पुरुष विसरतात.या सर्व गोष्टीची कवीला चीड येते आणि ते असाह्य स्त्री या कवितेतून बोलते होतात.

“नसती स्त्री तर थोर महात्मे कसे जन्मले असते

नारी जातीच्या असह्यतेला पुरुष जात ही हसते”

या कविता संग्रहात एकूण अंशी कविता आहेत.यात राजे शाहू छत्रपती,विद्वानांचा धनी,हा सागरी किनारा,लोकशाही,स्वाभिमान, माता रमाई,पेन्शन,घोषणा या कवितांचा समावेश या कवितासंग्रहामध्ये आहे.कवी श्री. न.डोंगरे यांनी या कविता संग्रहाला दिलेल्या शीर्षकाची कविता , मसानातले दिवे या कवितेतून कवी व्यक्त होतो.

“गाव कुसाच्या बाहेर दिसती आमचे थवे 

मसानातले दिवे आम्ही मसानातले दिवे”

कवी श्री. न.डोंगरे यांनी या कविता संग्रहाकरीता मसानातले दिवे या शीर्षकाची केलेली निवड योग्य आहे हे कविता संग्रह वाचल्यानंतर नक्कीच कळते.या कविता संग्रहाला मेघा पब्लिकेशनचे मा.संजय महल्ले यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना असल्याने कविता संग्रह उंचावला आहे.मेघा पब्लिकेशन हाऊसने हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.कवी श्री. न.डोंगरे यांचे बंधू वासुदेव डोंगरे यांची मुखपृष्ठ संकल्पना बोलकी आहे.मसानातील दिवे या कविता संग्रहाचे प्रकाशन अमरावती येथे पार पडलेल्या,तिसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनात,संमेलनाध्यक्ष मा. रमेश जीवने आंबेडकरी साहित्यिक यांच्या हस्ते तसेच उद्घाटक मा. एन. व्हि. ढोके आंबेडकरी साहित्यिक,स्वागताध्यक्ष मा. माजी प्राचार्य गोपीचंद मेश्राम,प्रमुख पाहुणे मा. डॉ रविकांत महिंदकर, मा.आम्रपाली पारवे, मा.धम्मपाल देशभ्रतार,मुख्य संयोजक,शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे,संयोजक अविनाश गोंडाने,देवानंद पाटील,पद्माकर मांडवधरे,दिलीप शापामोहन, डॉ.नंदकिशोर दामोधरे, टी. एफ.दहीवडे,प्रा.अरुण बुंदिले, चरनदास नंदागवळी यांच्या उपस्थितीत पार पडले.या कविता संग्रहावर दोन शब्द लिहिले त्यास समीक्षण म्हणा अथवा परीक्षण म्हणा हे वाचकांवर सोपवितो. मसानातील दिवे या कविता संग्रहाचे रसिक आणि वाचक वर्ग निश्चितच स्वागत करतील या अपेक्षेसह कवी श्री. न डोंगरे यांचे कविता संग्रहाकरीता अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.

………………………………….

*कविता संग्रह

मसानातले दिवे 

कवी_श्री.न.डोंगरे, अमरावती 

संकलन:- अविनाश गोंडाणे, अमरावती 9923264193

✒️समीक्षक:-प्रवीण कांबळे(अमरावती)मो:-९२२६२६०६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here