


जळगाव – जिनवाणी प्रती दृढ श्रद्धा असेल तर सम्यक्त्व प्राप्त होऊ शकते. श्रद्धा दृढ करण्यासाठी सुसंगती गरजेची आहे, असे मौलिक मार्गदर्शन ‘समकीत के ६७ बोल’ या प्रवचन शृंखलेत ‘श्रद्धाचार’ आणि ‘लिंग’ (परिचय किंवा ओळख या अर्थाने) या तत्त्वांची ओळख प. पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी श्रावक-श्राविकांना करून दिली. जिनवाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आजच्या काळात सर्वच साक्षर आहेत; परंतु पूर्वीच्या काळी लोकांना लिहिता-वाचता येत नव्हते, तरीही ते जिनवाणी मोठ्या श्रद्धेने ऐकत असत. प्रत्येकाने जिनवाणीप्रती रुची आणि आवड ठेवली, तर ‘सम्यकत्व’ किंवा समकीत प्राप्त होऊ शकते. प. पू. भूधर म.सा. यांच्या मुखारविंदातून प. पू. आचार्य जयमलजी म.सा. यांनी केवळ एकदाच ‘जिनवाणी’ ऐकली आणि त्यांचे जीवन सार्थक झाले; ते एकभव अवतारी ठरले. त्यामुळे जिनवाणीप्रती प्रत्येकाने दृढ श्रद्धा ठेवावी, असे आवाहन या प्रवचनातून करण्यात आले आहे.
मानवजन्म अनमोल आहे, कोहिनूर हिऱ्यासारखे हे जीवन निंदा, चोरी, भ्रम पसरवणे किंवा सामाजिक माध्यमांमध्ये व्यर्थ वेळ घालवणे म्हणजे मिळालेला मानवजन्म सार्थक न करणे होय. ‘क्षण जाणतो, ज्याला क्षणाची किंमत असते तो खरा पंडित,’ असे म्हटले जाते. हा मानवजन्म फक्त ‘भगवतीसूत्र’ वाचनासाठी मिळालेला नाही, तर ‘भगवती’ बनण्यासाठी मिळालेला आहे. हे उदाहरणाने समजावून सांगितले गेले. एका साधकाला त्याच्या गुरूंनी मृत्यूच्या अंतिम क्षणी सात घागरी अमृत भेट दिल्या. त्या अमृताच्या घागरी असल्याचे त्याने घरी सांगितले नाही. घरच्यांनी त्या पाणी समजून कपडे धुण्यासाठी वापरल्या आणि अमृत व्यर्थ गेले. मिळालेला मानवजन्म, अर्थात अमृत, आपण व्यर्थ तर घालवत नाही ना? याबद्दल अवश्य चिंतन करायला हवे, असे मोलाचे विचार प. पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759 )














