Home लेख शेतकरी जागा झाल्याशिवाय शोषण थांबणार नाही!

शेतकरी जागा झाल्याशिवाय शोषण थांबणार नाही!

181

 

 

 

 

 

“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, नुकसान सहन करण्याची सवय करा.” असंवेदनशील वृत्तीचे द्योतक हे वचन. शेतकऱ्याचा सण पोळा. ऐन पोळ्याच्या पर्वावर निर्ढावलेले पुढारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे टिप्पणी करतात. तिकडे आधीच पिकांना भावाची हमी नाही आणि वरुन कापसावरील आयात शुल्क काढल्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या कापसाला सपाटून मार बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय, आणि राजकीय धुरीण शेतकऱ्यांना सहनशीलतेचे धडे शिकवतात.
आयात का करता? आपल्याकडे कापूस कमी आहे का?
आपल्याकडे एखादी वस्तू नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तेव्हा आपण ती मागवतो, खरेदी करतो. आपल्याकडे कापूस कमी पडतो का?
कापूस जर कमी पिकला असता तर ,कापसाला भाव चांगले मिळाले असते.
आपल्या देशात जर कापूस उत्पादनात घट झाली असती तर कापसाला भाव जास्त मिळाले असते, आणि जास्त कापूस पिकला असता तर मग परदेशातून आयात करावी लागली नसती. अर्थात, भारताचा कापूस उत्पादनात वरचा क्रमांक आहे. तरी कापसाची आयात का करावी लागते, तेही आयात शुल्कात घट करून, माफ करून? हा प्रश्न आहे. या देशात कापूस उत्पादन विक्रमी होत आलेले आहे आणि कापसाची प्रत उत्तम असल्यामुळे ब्रिटनसह जगातील अनेक नामवंत देशांमध्ये भारतीय कापूस निर्यात होत असल्याचा इतिहास आहे. पण वर्तमानस्थितीत कापूस शुल्क प्रकरणावरून असे दिसते की कापूस आयात निर्यात धोरणात स्वदेशी कास्तकारांचे हित पूर्णतः दुर्लक्षित आहे कापूस उत्पादन हाती येण्याच्या अगदी तोंडावर कापूस आयातीबाबतचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे. त्यामुळे शेतकरी भांबावून गेला आहे.
मागणी आणि पुरवठ्याच्या तत्त्वानुसार बाजारात एखादी वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध असेल आणि मागणी जास्त असेल तर त्या वस्तूचे भाव वाढलेले असतात आणि पुरवठा जर जास्त असेल, बाजारात आवक जास्त असेल तर चांगला भाव मिळत नाही. अनेकदा टमाटर, वांगी,कोथिंबीर, पालक, मेथीच्या जुड्या रस्त्यावर फेकण्याची नौबत येते, नामुष्की ओढवते. संत्री, धान, सोयाबीन वगैरे उत्पादनही कैकदा मातीमोल दरात विकावे लागतात. तेव्हा शेतकऱ्यांना कोणतं पिक केव्हा घ्यावं हे कळत नाही म्हणून त्याचा पाणउतारा केला जातो. शेतकरी कर्जबाजारी होऊन शेती करतो, सवाई,दीढीने व्याजाबट्ट्याच्या कर्जाची फरतफेड करण्याच्या घिसाडघाईनं पिक हाती येताच, बाजारत नेतात. अशा शेतकऱ्यांची संख्याही खूप असते. काहीच दिवसात अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा माल बाजारात पोहचतो. नेमका शेतकऱ्याचा माल निघाला की जो तो माल विकण्याच्या प्रयत्नात असतो, तेव्हा योग्य भावच मिळत नाही. शेतकऱ्याचा अधिकाधिक माल, दलाल,व्यापाऱ्याकडून खरेदी करण्यात आला की, शेतकऱ्याचं पिकानं भरलेलं घर रिकामं झालं, की चमत्कारिक पद्धतीने पिकांचे भाव वाढल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे, शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षांचे अनुभव आहेत. मागणी पुरवठा तत्त्वाचा आधार बाजाराचे ठेकेदार आपापल्या सोयीनुसार लावतात असाच याचा अर्थ निघत नाही का?
शेतकरी अनेक वर्षांपासून दरवर्षी उत्पादन खर्चावर आधारित पिकांना भाव मिळण्याची मागणी करत आहे. ती मिळत तर नाहीच पण महागाईने एव्हरेस्टचे शिखर गाठलेले असताना गेल्या दहा- पंधरा वर्षांपूर्वी जे भाव सोयाबीन, कापूस, धान वगैरे पिकांना मिळत होते त्यापेक्षा फार काही फरक पडलेला दिसत नाही. शेतीचा खर्च अवाढव्य वाढला असताना शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. घामाला दाम नाही, श्रमाला मान नाही.सर्वाधिक ओबीसी, दलित आदिवासी असलेले अल्पभूधारक , छोटे शेतकरी यात अधिक भरडले जातात.त्यामुळे शेतीबद्दलची अनास्था दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे दूरगामी गंभीर परिणाम समाजाला , देशाला भोगावे लागतील, याबद्दल अनेक विचारवंत, कृषी अभ्यासक आणि आयोगांनी वेळोवेळी आपली भूमिका सखेद विशद केलेली आहे. पण धोरणात्मक निर्णयाचा अभाव कायम आहे शेतकऱ्याचे बहुपदरी शोषणात भरच भर पडत आहे.
पण शेतकरी दादाला या शोषणाची जाणीव काही होत नाही. त्याला ती होऊ नये म्हणून तजवीज केलेली असते. अशी व्यवस्था कैक वर्षे टिकून आहे. ते समजण्यासाठी महात्मा फुल्यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये जे शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेस कारणीभूत परिस्थितीचे चित्र रेखाटले आहे ते समजून घ्यावे लागेल बळीराजाला. “पूर्वीच्या धूर्त आर्यब्राम्हण ग्रंथकारांनी आपले मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्याचे मागे इतके सफाईने लावले आहे की, शेतकरी जन्मास येण्याचे पूर्वीच त्याचे आईस ज्या वेळेस ऋतु प्राप्त होतो, तेव्हा तिच्या गर्भाधानादि संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो, इतकेच नव्हे तर हा मेला तरी याच्या मुलास श्राद्धे वगैरेचे मिषाने धर्माचे ओझे सोसावे लागते. कारण शेतकऱ्यांचे स्त्रियांस ऋतु प्राप्त होतांच भटब्राह्मण जपानुष्ठान व तत्संबंधीं ब्राह्मणभोजनाचे निमित्तानें त्यांजपासून द्रव्य हरण करितात व सदरचीं, ब्राह्मणभोजनें घेतेवेळीं भटब्राह्मण आपले आप्तसोयरे व इष्टमित्रांसह तूपपोळ्यांची व दक्षिणेची इतकी धांदल उडवितात की, त्यांच्या उरल्या सुरल्या अन्नापैकीं त्या बिचाऱ्या अज्ञान शेतकऱ्यांस पोटभर आमटीपोळी मिळण्याची सुद्धां मारामार पडते. ऋतुशांतीनिमित्तानें भटब्राह्मणांची उदरशांती होऊन त्यांचे हातावर दक्षिणा पडतांच ते शेतकऱ्यास आशिर्वाद दिल्यानंतर त्यास त्यांचे स्त्रियांनीं शनिवार अथवा चतुर्थीचीं व्रतें धरावी म्हणोन उपदेश करून घरोघर चालते होतात. पुढें भटब्राह्मण दर शनिवारी व चतुर्थीस शेतकऱ्यांचे स्त्रियांकडून रुईचे पानांच्या माळा मारुतीचे गळ्यांत घालवून व गवताच्या जुड्या गणपतीचे माथ्यावर रचून शिधेदक्षिणा आपण घेतात व पुढें कधीं कधीं संधान साधल्यास सदरची व्रतें उजविण्याची थाप देऊन शेतकऱ्यांपासून लहानमोठी ब्राह्मणभोजनें घेतात. इतक्यांत शेतकरणी बाया सृष्टीक्रमाप्रमाणें गरोदर झाल्यास, भटब्राह्मणांनी शेतकऱ्यांकडून मुंज्यांचे ब्राह्मण घालविण्याचे लटके पूर्वी केलेले नवस शेतकऱ्यांशीं सहज बोलतां बोलतां बाहेर काढावयाचे व शेतकऱ्यांच्या स्त्रिया प्रसूत होण्याच्या पूर्वी भटजीबुवा शेतकऱ्यांचे घरीं
रात्रंदिवस खड्या (फेऱ्या) घालितात व त्यांच्याशीं मोठी लाडीगोडी लावून त्यांच्याशीं यजमानपणाचीं नातीं लाऊन त्यांजपासून त्या नवसांची फेड करून घेतात. पुढें शेतकऱ्यांचे स्त्रियांस पुत्र झाले कीं, भटब्राह्मणांची धनरेषा उपटते. ती अशीं कीं, प्रथम मुख्य उपाध्ये शेतकऱ्यांचे घरीं जातात व त्यांचे घरांतील वाव व कासऱ्यांनीं वेळ मोजणाऱ्या अज्ञानी स्त्रियांस मुलांचे जन्मकाळ विचारून, ज्या ज्या राशीस जास्त अनिष्ट ग्रह जुळत असतील, तसल्या राशी मुकरर करून त्यांच्या अर्भकांच्या जन्मपत्रिका अशा रीतीनें तयार करितात कीं, अज्ञानी शेतकऱ्यांचे पुत्रजन्मानें जहालेल्या सर्व आनंदांत माती कालवून त्यास घाबरे करितात व दुसरे दिवशीं त्याजकडून पिंडींतील लिंगापुढें आपले भाऊबंद, सोयरे-धायरे व इष्टमित्रांपैकीं भटब्राह्मणास मोलानें जपानुष्ठानास बसवितात व त्यांपैकी कोणांस शेतकऱ्यापासून उपोषणाचे निमित्तानें फलहारापुरते पैसे देववितात. उन्हाळा असल्यास पंखे देववितात, पावसाळा असल्यास छत्र्या आणि हिवाळा असल्यास पांढऱ्या धाबळ्या देववितात. खेरीज उपाध्याचा हात चालल्यास तो शेतकऱ्यापासून पुजेच्या निमित्तानें तेल, तांदूळ, नारळ, खारका, सुपाऱ्या, तूप, साखर, फळफळावळ वगैरे पदार्थ उपटावयास कमी करीत नाहींत. शेतकऱ्यांचे मनावर मूर्तिपूजेचा जास्ती प्रेमभाव ठसावा म्हणून काहीं भट तपानुष्ठान संपेपावेतों आपल्या दाढ्याडोया वाढवितात, कांहीं फलाहारावर राहतात. अशा नानाप्रकारच्या लोणकढ्या थापा देवून जपानुष्ठान संपेपावेतों भटब्राह्मण, शेतकऱ्यांचें बरेंच द्रव्य उपटतात. शेवटीं समाप्ति करवितेवेळीं भटब्राह्मण अज्ञान शेतकऱ्यापासून ब्राह्मणभोजनासहित यथासांग दक्षिणा घेण्याविषयीं कसकशी चंगळ उडवितात हें सर्व आपणांस माहीत असेलच.”( पृ.२६७-६८ , म.फुले समग्र वाङ्मय ) सुमारे दीडशे-पावणे दोनशे वर्षांपूर्वी केलेले हे शेतकऱ्यांच्या अवस्थेचे वर्णन आहे, ब्राम्हणभोजने कमी झालेली असली तरी कर्मकांड व धर्मांधता टिकून आहे, आजही शेतकरी बव्हंशी याच धार्मिक मानसिक अवस्थेत आहेत. त्याला त्याच्या शोषणाची जाण व शोषकाची पहचान होऊच दिली जात नाही. यावरून शेतकऱ्यांच्या शोषणाला जातीय आणि धार्मिक आयाम असल्याचे स्पष्ट होते, बहुसंख्य शेतकरी शूद्र,अर्थात ओबीसी असल्याने, धर्म सूत्रानुसार, मनुच्या आदेशानुसार शुद्रांनी इतर वर्णाची सेवा करणे हेच वर्णधर्माचे पालन होय. धर्माचे नावाखाली पुरोहितशाहीनं चालवलेले कर्मकांड, व्रत-उपवास,जप-तप अनुष्ठान महाषडयंत्रात फसवले गेलेले हे बळीराजाचे वंशज सिंधु(हिंदु)जन. त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पारंपरिक मानस कायम राहण्यासाठी शोषण यंत्रणा तत्पर असते. मध्ययुगात महादेव यादव व रामदेव यादव यांच्या काळात हेमाद्री पंडित (इ.स. १२६० ते १३०९) हे प्रधान होते. या वैदिक ब्राम्हणाने दोन हजार पेक्षा अधिक व्रतांची भलावण केलेली आढळते,आणि वर्षभर देवी दैवतांची उपासना करण्याची आवश्यकता चातुर्वर्गचिंतामणी हा ग्रंथ रचून प्रतिपादन केलेली आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली नाडवले गेलेले स्त्रीशूद्रातिशूद्र वर्षभर ब्राम्हणीकरण झालेले सणवार, कर्मकांड, अनुष्ठानात धन्यता मानत असतात, त्यातच मोक्षप्राप्ती पुण्यप्राप्ती असल्याचा समज पसरुन ठेवला आहे. स्वधर्मीय शोषक लोणकढी थापा मारत वेळोवेळी धर्म धोक्यात आल्याची, ऐन सणासुदीच्या दिवसात बॉंबस्फोट, हल्ल्याच्या धमकीच्या अफवा पसरवून परधर्मद्वेष पसरवला जातो. त्याला शोषणाची जाणीव होऊ दिली जात नाही. असे मानसिक गोंधळ निर्माण करणारे कार्यक्रम वर्षभर सुनियोजितपणे आखलेले असतात. सर्वसामान्य लोकांच्या धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन चमत्कार कर्मकांड सांगणाऱ्या कीर्तनकार मंडळीच्या आवभगतसाठीचे भागवत सप्ताह, ब्राम्हणिकरणाने बरबटलेले गणेशोत्सव, दुर्गोत्सव, हनुमान जयंती असो वा रामनवमी असो शेतकऱ्यांची मुलं यांमध्ये गुंतली जातात, अडकवली जातात. तरुण मुलं शिक्षणात मागे पडली तरी वर्गणीची पावती फाडणारी इमानेइतबारे मूर्तीची पूजा-आरती करण्यात पुढे, मिरवणुकीत आगमन- विसर्जनप्रसंगी झिंगणाऱ्या, डीजेवर थिरकणाऱ्या लेकरांना आपला शेतकरी बाप राबराब राबूनही आपल्या कुटुंबाच्या वाट्याला पुरेशा जीवनावश्यक सोयी मिळत नाही याचा विसर पाडण्यास ही धर्ममिषे पुरेशी ठरतात.
आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक सर्व बाजूंनी शेतकऱ्याची कोंडी होत असताना शेतकऱ्याचा कुठूनतरी आक्रोश ऐकू येतो,
“शेती वाचवा, भूखंड हटवा”
“वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या सीमा वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीला चांगला भाव मिळतोय. शेती बिनभरवशाचा व्यवसाय असल्याने शेती विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ले-आऊटचे जाळे विणले जात आहे. शहराच्या सीमावर्ती भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ले-आऊट टाकले जात आहेत. काळी, सुपिक जमीन विक्रीला काढून त्यावर भूखंड टाकले जात आहेत. यामुळे चांगली सुपिक जमीन खराब होत आहे. असेच होत राहिले तर पुढील पिढ्यांना अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे शेती वाचविणे गरजेचे आहे.” दै. सकाळ मतमतांतरे सदरात शंकर चिमोटे मोहपा, जि. नागपूर अशी आर्जवी साद घालतात. शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपात असलेली ही उद्विग्नता तितकीच गंभीरपणे घेण्याची गरज आहे. शहराच्या अवतीभवती असणारी गावं त्या गावची शेतजमीन अकृषक होऊन, तेथील शेतकऱ्याचे उपजीविकेचे साधनच हातचे गेले. शेती गेली आणि शेतकरी कुटुंबात पर्यायी अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने बाधित शेतकरी परिवार बेरोजगार झालाय. अकृषक जमीनीचे दर वाढले,काळ्या मातीच्या ले-आऊट च्या व्यवसायाला सोनेरी रंग चढला. या व्यवसायात छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर जाहिरात, दलाली, मार्केटिंगचे संस्कार होऊन शेतकऱ्याची ती काळी आई लाखो करोडोंची ‘प्रॉपर्टी’ होते. विकासकांना प्रचंड फायदा होत असेल, पण कृषक शेतजमिनीचे क्षेत्र हळूहळू कमी होत जाते. शहरालगतच्या गावांतून शहरवासीयांना पुरवठा होणारा भाजीपाला फळे, धान्य दूरवरच्या ग्रामीण भागातून आणल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी आत्महत्या म्हणजे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी गत झाली आहे. एकिकडे शेती करणे आतबट्ट्याचा व्यवहार झाला, त्या अनास्थेतून शेतीबद्दलची नावड, कृषक क्षेत्राची घट, अन्नधान्याच्या पूर्ततेचे प्रश्न तयार होईल. तर दुसरीकडे शहरीकरणामुळे शेती आणि शेतकरी यांवरील विकासकांचे आक्रमण, यातून शेतकऱ्याच्या अस्तित्वाबद्दल चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी नेमका कुठे आहे याचा शोध आणि बोध शेतकरी घेतील का? तो घ्यावा लागेल. शेतकऱ्यांच्या नव्या पिढ्या आता बऱ्यापैकी शिक्षणात सरसावल्या आहेत, त्यांना या देशातील जातउतरंडीवर आधारित शोषण समजून घेण्यासाठी बळीराजा, चार्वाक, महावीर, तथागत गौतम बुद्ध, कबीर, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, तुकाराम, गाडगेबाबा,महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, यांचा वैदिक व्यवस्थेविरुद्ध लढा आकळून शेतकरी जागा झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे शोषण थांबणार नाही. त्यासाठी लोकायत, जैन, बौद्ध, लिंगायत, महानुभाव, वारकरी,वगैरे अवैदिक परंपरा, सत्यशोधक समाज, कृषक समाज यांनी केलेली समाजक्रांतिकारक जागृती आजही तितकिच निकराची वाटते.

 

■ अनुज हुलके, मो. 98238 83541

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here