Home लेख नागपंचमीच्या निमित्ताने…

नागपंचमीच्या निमित्ताने…

195

जनमानसात श्रावण महिन्याला फार मोठे महत्व आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक धार्मिक सण या महिन्यात येतात. त्यामुळे या महिन्याला पवित्र महिना म्हणून मानले जाते. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. सापाचे पर्यावरणीय महत्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. मात्र आता केवळ सापांची पूजा करून चालणार नाही तर त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा नाहीशा करणे, गरजेचे आहे.
साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो सस्तन प्राणी नाही. त्यामुळे तो लहान असताना सुद्धा दूध पीत नाही. त्यामुळे दूध हा त्याचा आहार नाही. तो दूध पितो असे म्हणणे खोटे आहे. दूध पचविण्यासारखी त्याची पचनसंस्था बनलेली नसते. हळद, पिंजर या गोष्टीही सापाच्या कातडीसाठी मारक ठरू शकतात. त्यामुळे सापाची पूजा करताना या गोष्टी करू नयेत. जिवंत सापाची पूजा करणे टाळावेच.
साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे असे म्हणतात. त्याचे कारण साप उंदीर, घुशी खाऊन पिकाची नासाडी रोखतात. उंदीर आणि त्याच्या कुटुंबातील प्रजातींची संख्या खूप वेगाने वाढते. त्यामुळे त्यांना नियंत्रित करणे फार जिकिरीचे काम असते. त्यासाठी सापाचे असणे फार महत्वाचे आहे. साप हा फक्त शेतकऱ्याचा मित्र नसून पूर्ण मानवजातीचा मित्र आहे. आजच्या घडीला मानवाचे आजार दूर करण्यासाठी तयार केलेल्या बहुतेक औषधांमध्ये सापाचे विष वापरतात. अल्प प्रमाणात हे जालीम विष मानवाला पुनर्जीवन देऊ शकते. त्यामुळे साप हा उपयुक्त प्राणी आहे.
एरवी दिसला साप की उचलली काठी, अशी आपली मानसिकता असते. आपल्या देशात सर्पाच्या सुमारे ३०० हून अधिक जाती आहेत. त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चारच जाती विषारी आहेत. हे साप ओळखू न आल्याने माणूस सापाला घाबरतो व लगेच त्याला मारण्याचा पावित्रा घेतो. पण साप आपणहून कधीच चावत नाही. चुकून त्याच्यावर पाय पडला तरच तो आत्मसंरक्षणासाठी चावा घेतो.
कुणाच्याही घरी किंवा परिसरात साप निघाला की तातडीने सर्पमित्रांचे फोन नंबर शोधून संपर्क करावा. सर्पमित्र तेथे धावून जातात आणि साप पकडून नागरिकांची भीती दूर करतात. सापांचा आणि लोकांचा जीव वाचण्याचे कार्य स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्पमित्र करित असत्तात. अनेकदा साप पकडताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी होत होती. याची दखल घेवून शासनाने सर्पमित्रांना “फ्रंटलाईन वर्कर” म्हणून घोषित केले आहे. राज्यातील सर्पमित्रांना आता १० लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात शिफारस केली आहे. यासोबतच राज्य सरकारकडून सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार असून आणि त्यांना सुरक्षितपणे काम करण्यास मदत देखील होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
*-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.*
*संपर्क – ९४०३६५०७२२*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here