Home महाराष्ट्र एक दिवस तरी वारी अनुभवावी आणि संविधान समता दिंडी विषयी पसरवण्यात येत...

एक दिवस तरी वारी अनुभवावी आणि संविधान समता दिंडी विषयी पसरवण्यात येत असलेल्या अफवा आणि गैरसमजाबाबत

251

 

 

 

 

१) भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. आपल्या भारतीय संविधानात संत, समाजसुधारकांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटले आहे. भारतीय संविधानात व्यक्त झालेला समतेचा विचार भागवत धर्माच्या वारकरी परंपरेतून आलेला आहे. संतविचार आणि संविधानिक मूल्ये ही परस्परांना पूरक आहेत. संविधानाला अभिप्रेत असणारी समता संतानी त्यांच्या विचारातून सातत्याने मांडली आहे. ‘यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर’ असे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून मांडून ठेवले आहे. संतांचे पाईक असलेले वारकरी यांच्यापर्यंत हा परस्परपूरक विचार अभंग, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून पोचविणे आणि त्यातुन संतांचे व संविधानाचे नाते अधिक वृद्धिंगत करणे हा उद्देश या ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’चा आहे. यासाठी विविध संघटना, संस्था व मान्यवर एकत्र येऊन महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या वारीच्या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होत असतात.

२) भारतीय संविधानातील मूल्ये आणि संतविचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मागील १२ वर्षांपासून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि मागील ७ वर्षापासून ‘संविधान समता दिंडी’ सुरू आहे. वारी परंपरेला कोणतीही बाधा न आणता आमचे हे दोन्ही उपक्रम सुरू आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू तुकोबांरायांच्या पालखी सोहळ्यात यंदा मंगळवार २४ जून २०२५ रोजी यवत ते वरवंड या मार्गावर ‘एक दिवस वारी’ झाली. तसेच संविधान समता दिंडी शनिवार २१ जून २०२५ रोजी समताभूमी, पुणे (महात्मा फुलेवाडा) येथे प्रस्थान कार्यक्रम होऊन संतभूमी, पंढरपूरकडे दिंडी मार्गस्थ झाली आहे.

३) संविधानाचा विचार मान्य नसलेले काही लोक समाजात आहेत. त्या लोकांना संत विचारातील प्रेम, करुणा, मानवता मानवत नाही. ते लोक वारी आणि वारकरी संप्रदाय परंपरेला अनिष्ट सनातनी वैदिक ब्राह्मणी धर्मात बंदिस्त करू पाहत आहेत. संतांच्या व्यापक, समतेच्या आणि बंधुतेच्या विचारांना नाकारणारे हे लोक विकृतीने ग्रस्त होऊन कार्यरत आहेत. हेच लोक ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ला विरोध करत आहेत. ‘संविधान समता दिंडी’ आणि ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’वर टीका करताना ‘अर्बन नक्षल’ या सहज सोप्या आणि पुरावा देण्याची कोणतीही अट नसलेल्या संकल्पनेचा वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर या टीकेच्या माध्यमातून हे लोक इतक्या महत्वाच्या संवैधानिक राष्ट्रीय कार्यामध्ये विघ्न घालू पाहत आहेत. संतांच्या काळात संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखोबा महाराज, संत जनाबाई महाराज यांना त्रास देणाऱ्या मंबाजीसारख्या प्रवृती आजही समाजात वावरत आहेत.

४) विद्वेषाच्या विकृतीने ग्रस्त झालेली ही मंडळी, ज्या लोकांची किंवा संघटनांची अर्बन नक्षलवादी म्हणून नावे घेत आहेत, असे कोणीही ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ आयोजनात नाहीत. किंबहुना अशा लोकांचा किंवा संघटनांचा आमच्या आयोजनात संबंध नाही. याउलट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार ह. भ. प. राजाभाऊ चोपदार, ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे , कैकाडी महाराज मठाचे अधिपती ह. भ. प. भारत महाराज जाधव, ह. भ. प. धम्मकीर्ती महाराज आदी मंडळी या संविधान दिंडीत सहभागी होत असतात.

५) भारतीय संविधानाला अभिप्रेत राष्ट्र उभारणी व संवर्धनाच्या चांगल्या विचाराला आणि उपक्रमाला थांबविण्यासाठी आणि आपली राजकीय सांस्कृतिक पोळी भाजून घेण्यासाठी हे विकृत लोक समाजाची दिशाभूल करून समाजात द्वेष आणि अशांतता तयार करत आहेत. समाजात भांडणे लावण्याचे काम या लोकांनी हाती घेतले असून ते लोक खोटे आरोप करीत आहेत. त्यासाठी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा समाजविघातक प्रवृतींचा बंदोबस्त करावा लागेल. हे लोक ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’ला बदनाम करून स्वतःच समाजात दुही माजवतील. तसेच हेच लोक वारीमध्ये अनिष्ट प्रकार करतील आणि त्याचा पुन्हा ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ आणि ‘संविधान समता दिंडी’वर आरोप लावतील, अशी आम्हास त्यांच्या जाहीर वक्तव्यावरून, बोलण्यावरून शंका येत आहे. त्यांचे आजवरचे वर्तनव्यवहार पाहिल्यास समाजात अशांतता निर्माण करणे, समाजाची दिशाभूल करणे, अशी त्यांची प्रवृत्ती राहिली आहे.

सदर प्रवृत्तींची आणि अशा लोकांची चौकशी करावी, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना वेळीच थांबवावे, यासंबंधी आम्ही शासन प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. आपण सदर प्रकरणाची बातमी प्रसिद्ध करावी, ही नम्र विनंती.

*आपले नम्र*
हभप शामसुंदर महाराज सोन्नर, हभप हरिदास महाराज तम्मेवार, हभप भारत महाराज घोगरे, हभप समाधान महाराज देशमुख, शरद कदम, अविनाश पाटील, अँड.वर्षा देशपांडे, नागेश जाधव, विशाल विमल, दीपक देवरे, सुमित प्रतिभा संजय, सरस्वती शिंदे, दत्ता पाकिरे, महादेव पाटील, राजाभाऊ अवसक , साधना शिंदे, माया वाकोडे, नरेंद डुंबरे, प्रकाश मानेकर, सुबोधदादा महाराज

संपर्क : शामसुंदर महाराज सोन्नर : 9892673047, अविनाश पाटील : 8975130609, विशाल विमल : 7276559318

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here