Home लेख ‘जलसंधारण’ प्रत्येकाचे कर्तव्य!

‘जलसंधारण’ प्रत्येकाचे कर्तव्य!

168

 

 

भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी पाऊस लवकर येईल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता तो खरा ठरताना दिसत आहे. ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी २५ मे रोजीच दाखल झाला आहे. पाऊस लवकर आल्याने बळीराजाची चिंता दूर झाली आहे. पाऊस लांबला की पेरण्या लांबतात आणि पेरण्या लांबल्या की बळीराजाचे पुढील सर्व नियोजन कोलमडते. सुदैवाने राज्यात वेळेवर पाऊस सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात होणारी पाणीटंचाई मिटली आहे. सध्या राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही दमदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आताही राज्यात दमदार पाऊस पडत आहे. राज्यात दमदार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणी साठाही वाढत आहे. उजनी सारखे मोठे धरण आताच ४० टक्के भरले आहे. राज्यातील सर्व नद्या,नाले, तलाव, ओढे ओसंडून वाहत आहेत. वरुण राजाने यावेळी चांगलीच कृपा केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. धरणीमाईही चिंब भिजून हिरवा शालू पांघरत आहे. गेल्या काही वर्षात राज्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी दाही दिशा…. अशी लोकांची अवस्था झाली होती. सुदैवाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याने पाणी टंचाई मिटली आहे असे असले तरी पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. यावर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि वापर करावा लागणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पावसाच्या जास्तीतजास्त पाण्याची बचत कशी होईल याचे नियोजन आतापासूनच करावे लागणार आहे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे बरेचसे पाणी वाया जाते. कमी पाऊस पडणाऱ्या भागात तर हा पाण्याचा अपव्यय होय. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी जिरवणे आणि पाणी साठवणे या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा पाणी जिरवण्याचा फायदा असा की भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यात घट होत नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ धरणे बांधून, पाईपलाईन शहरापर्यंत नेऊन घरोघरी पाणी पोहचवणे असा नाही. जलव्यवस्थापन याचा अर्थ समाज व पाणी यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. त्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व पटवून देणे. पावसाचे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याचे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला हवे. यासंदर्भात नागरिकांचेही प्रबोधन व्हायला हवे. नदी, विहीर, तलाव, बंधारे यात पावसाचे जास्तीतजास्त पाणी कसे साठेल याचे नियोजन सरकारी पातळीवर व्हायला हवे. नागरिकांनी आपल्या घरात, सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. शाळा, कॉलेज तसेच सरकारी कार्यालयातही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी. पावसाच्या पाण्याची साठवणूक म्हणजे पर्जन्य जलसंधारण प्रत्येक घरात, सोसायटीत, कार्यालयात झाले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत पावसाचे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. पाण्याचा थेंब न थेंब महत्वाचा आहे. कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे कारण ती काळाची गरज आहे. भविष्यात दुष्काळ पडू नये असे वाटत असेल तर पर्जन्य जलसंधारण करावेच लागेल.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here