Home देश विदेश भारतीय संघाला शुभेच्छा!

भारतीय संघाला शुभेच्छा!

144

जगातील आठ सर्वोत्तम संघात खेळली जाणारी क्रिकेटची चॅम्पियन ट्रॉफी अर्थात मिनी वर्ल्डकप स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई येथे १९ फेब्रुवारी पासून सुरू झाली असून या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान व न्युझीलंड या दोन देशात पार पडला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल म्हणजे २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशशी दुबईत झाला. हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत या सामन्याचा निकाल लागलेला असेल. भारताचा दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी रविवारी अर्थात २३ फेब्रुवारी रोजी दुबईत होईल. केवळ भारत पाकिस्तानमधील क्रिकेट रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. भारत पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना दुबईत रंगणार असून नेहमीप्राणेच हा सामना अटीतटीचा होईल यात वाद नाही. भारताचा न्युझीलंडशी १२ मार्च रोजी मुकाबला होईल. भारताच्या गटात बांगलादेश, पाकिस्तान आणि न्युझीलंड हे देश आहेत. यातील भारत पाकिस्तान आणि न्युझीलंड हे तिन्ही देश या स्पर्धेतील माजी तसेच संभाव्य विजेते म्हणूनही गणले जातात त्यामुळेच या ग्रुपला ग्रुप ऑफ डेथ असे म्हंटले जाते.

भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर किमान दोन सामने जिंकावे लागतील ते ही चांगल्या धावगतीने कारण ग्रुप मधील तीन संघाने जर प्रत्येकी दोन विजय मिळवले तर ज्यांची धावगती चांगली आहे अशाच दोन संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. भारताला खरा धोका आहे तो पाकिस्तान आणि न्युझीलंड या दोन देशांशी कारण हे दोन्ही देश धोकेदायक समजले जातात. अलीकडच्या काळात भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले असले तरी मागील म्हणजे २०१७ च्या चॅम्पियन ट्रॉफी मधील अंतिम सामन्यात पाकिस्ताननेच भारताला नमवले होते हे विसरून चालणार नाही. न्युझीलंड हा आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत कायम भारताला जड गेलेला देश आहे. आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे म्हणून भारताने या दोन्ही देशांशी खेळताना सतर्क राहायला हवे. जर भारताने या दोन देशांना नमवले तर भारत उपांत्य फेरीत पोहचेल. भारत उपांत्य फेरीत पोहचला तर अंतिम फेरीत नक्की पोहचेल इतकेच नाही तर भारत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव देखील कोरेल असा विश्वास अनेक दिग्गज आजी माजी क्रिकेटपटुंना आहे त्याचे कारणही तसेच आहे भारतीय संघ सध्या फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवत इंग्लंडला व्हाईट वॉश दिला.

विशेष म्हणजे या मालिकेत भारताच्या सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्ध शतक झळकावून फॉर्मात आल्याचे दाखवून दिले. ऐन चॅम्पियन ट्रॉफीच्या तोंडावर रोहित शर्मा फॉर्मात आला हे भारतासाठी शुभचीन्ह आहे. रोहित शर्मा फॉर्मात असला की तो भारताला एकहाती विजय मिळवून देतो. रोहित शर्मा सोबतच भारताचा मॅच विनर आणि जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली हा देखील फॉर्ममध्ये आला आहे. हे दोघे भारताचे जय विरू आहेत. हे दोघे फॉर्मात येणे म्हणजे भारताचे निम्मे काम फत्ते होणे. या दोघांना शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांची साथ मिळेल. यातील गिल आणि श्रेयस हे दोघेही फॉर्मात आहेत. राहुलने मोठी खेळी केली नसली तरी मोठ्या स्पर्धेत तो आपला खेळ उंचावतो. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा हे भारतचे अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करू शकतात तसेच त्यांचे क्षेत्ररक्षण ही उत्तम आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे फिरकीची तर मोहंमद शमी आणि अर्षदीप सिंग हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

जसप्रीत बुम्राची उणीव जाणवणार असली तरी शमी आणि अर्षदीप आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणतील यात वाद नाही. भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात असले तरी भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघ आहे. जर भारताच्या खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेनुसार खेळ केला तर २०१३ नंतर प्रथमच भारत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरेल आणि १४४ कोटी देशवासीयांना जल्लोष करण्याची संधी मिळवून देईल यात शंका नाही. भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफीसाठी मनापासून शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here