


✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.14फेब्रुवारी):- ” गुरू रविदासांचा राजकीय विचार महत्त्वपूर्ण आहे.त्यांना ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे राजकीय नेतृत्व अपेक्षित होते.समाजामध्ये असणारे विविध प्रश्न राजसत्तेमुळे सहज सुटू शकतात व समाज सुखी होऊ शकतो असे त्यांना वाटत होते, त्यांनी समतावादी राज्यसत्तेचे विचार मांडले.
गुरू रविदासांचे हे राजकीय विचार आज आचरणात आणल्यास संपूर्ण भारत सुखी व समृद्ध होऊ शकतो.एवढी मोठी शक्ती त्यांच्या समतावादी राजकीय विचारधारेत आहे.उच्च कर्माला त्यांनी महत्व दिले. त्यांनी दुःख निर्मितीचे कारण सांगताना विकृत मनाचा उल्लेख केला.” असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी केले .
ते श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६२७ व्या जयंती निमित्त सर्वोदय गृहनिर्माण संस्थेतर्फे आयोजित सर्वोदय काॅलनी येथील श्री संत रविदास सांस्कृतिक भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकर नासने (अध्यक्ष , सर्वोदय गृहनिर्माण संस्था),
प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव श्री नरेंद्र गणोरकर,अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,डॉ.संजय खडसे सर्वोदय शिक्षण संस्थेचे श्री प्रकाश शेलापूरकर होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित “अभंग तरंग ” या काव्यसंग्रहातील ” गुरू रविदास ” या अभंगाचे सुमधुर आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
—
*गुरू रविदास वैज्ञानिक व*
*जनकल्याणकारी संत*
*- डॉ.संजय खडसे*
” संत रविदास महाराज यांनी मानवतेला एकता,समता आणि बंधुभावाचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीत जातिव्यवस्थेचा तीव्र विरोध आणि मानवजातीच्या समानतेवर भर होता.त्यांचे विचार आजही मानवतेच्या एकात्मतेसाठी मार्गदर्शक ठरतात.संत रविदास महाराज यांनी धर्म,जात,लिंग या भेदांपलीकडे जाऊन समानतेची शिकवण दिली. मानवतेला प्रेम, शांतीचा मार्ग दाखविला.त्यांच्या शिकवणीचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनुयायांवर दिसून येतो कारण गुरू रविदास जनकल्याणकारी व वैज्ञानिक संत होते.” असे विचार प्रमुख अतिथी प्रा.डॉ.संजय खडसे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री नरेंद्र गणोरकर तर आभार मधुकर बुंदिले यांनी केले.
याप्रसंगी श्री प्रभाकर सावरकर, प्रा. डॉ. दिनेश रोजतकर, इंजिनियर श्री राजेंद्र खंडारे,डॉ. तुषार गावंडे,डॉ.विजय तायडे, हवालदार दिनकर जोगे, मधुकर बुंदीले,अमोल भटकर,कृष्णा मोहोकर,रामदास इंगळे,विजय चापके, श्री पिंजरकर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.














