


समाजाला संघटन शक्तीचे महत्त्व सांगणारे , समाजाला गुलामीच्या विरोधात विद्रोह करण्याचा संदेश देणारे,मानवता धर्माचे पुरस्कर्ते, संत मीराबाईचे गुरू,संत कबीरांचे समकालीन समविचारी,सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांना आज दि. १२ फेब्रुवारी २०२५ ला माघ पौर्णिमेला असलेल्या ६२७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे जीवन चरित्र हे संघर्षमय आहे .या संघर्षमय जीवन चरित्रातून त्यांनी समाजाला जीवन जगत असताना विविध प्रकारचे जे संदेश व उपदेश आपल्या साख्यातून दिलेले आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे ; म्हणून समाजाने त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील लेख ,कविता व पुस्तके यांचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे.संत शिरोमणी गुरू रविदासांचे जीवन चरित्र व त्या जीवन चरित्रातून मिळणारी शिकवण ही अतिशय महत्त्वाची आहे .
गुरू रविदासांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ रोजी चवर वंशात,रविवारी माघ पौर्णिमेला काशीजवळील गोवर्धनपूरला झाला. (काही इतिहासकारांच्या मते मांडूर, मांडूगडिह अशी त्यांच्या जन्मगावाची नावे आहेत)(तारखे ऐवजी माघ पौर्णिमेला गुरु रविदास महाराज यांचा जन्म झाल्यामुळे त्यांची जयंती माघ पौर्णिमेला साजरी करतात.) वडील रघुराम ( रघुनंदन),आई रघुराणी (करमादेवी) यांच्या जीवनात रविवारी जन्मलेल्या रविदासाने पुढे सूर्याप्रमाणे स्वकर्मातून संपूर्ण समाजाला प्रकाश दिला.प्रत्येक राज्यातील भाषेच्या उच्चारातील विविधतेमुळे रविदासांची नावे त्याप्रमाणे रूढ झाली.उदा. पंजाबी-रैदास,रेविदास,बंगाल – रईदास अथवा रेवादास, हिंदी-रैदास व रविदास, राजस्थान-रोहिदास, मराठी रोहिदास व रोहितदास.
गुरू रविदासांचा संतानी केलेला सन्मान :-
१२० वर्षाचे उदंड आयुष्य लाभलेले गुरू रविदास महान संत होय. आचार्य रजनीश गुरू रविदासांविषयी म्हणतात की, “रविदासांमध्ये असे काहितरी होते ज्यामुळे काशीच्या पंडितांनासुद्धा रविदासांना स्वीकारावेच लागले.” संत तुकारामांनी तर गुरू रविदासांना सगे सोयरे मानले .” गुरू नानकांनी सन्मानाने व
श्रद्धापूर्वक गुरू रविदासांचा उल्लेख केला,
“नानाजन मित्र नरहरी सुनार।
रविदांस कबीर संगे मेरे ॥”
संत कबीर गुरू रविदासांना गुरुस्थानी व मोठे भाऊ मानत असत.त्यांनी साधुंमध्ये श्रेष्ठ संत गुरू रविदासांना म्हटले आहे. संत सेना महाराज म्हणतात की,
” धन्य कबीर। धन्य रोहिदासा। गावै सेना व्हावी।।”
संत मिराबाई गुरू रविदासांच्या शिष्या झाल्या. त्या म्हणतात की”
” मीरा के प्रभू तेही स्वामी
श्री रैदास सदगुरुजी”
तर संत एकनाथ महाराज म्हणतात की,
“रोहिदास चमार सबकुछ जाने। कठोरे में गंगा देख।”
तसेच माजी राष्ट्रपती झैलसिंह यांनी गुरू रविदास यांच्याविषयी आदर व्यक्त केला. गुरू रविदासांचा काशीच्या राजाद्वारे सन्मान झाला.त्यांनी आपल्या सिंहासनावर बसवून गुरू रविदासांचा सन्मान केला. तरीही गुरु रविदास अहंकारी न बनता नम्र बनले.
देव म्हणून पूजले जाणारे थोर संत :-
भारतात अनेक राज्यांमध्ये रविदासांची मंदिरं आहेत. उदा. कात्रज (पुणे,महाराष्ट्र),सिरसगड (अंबाला, हरियाणा), हदियाबाद (फगवाडा, पंजाब) येथे भव्यदिव्य श्री गुरू रविदास मंदिर तर डेरा सच्चखंड बल्लां (जालंधर, पंजाब) येथे एक भव्यदिव्य गुरू रविदास सत्संग भवन आणि जन्मगांव शिर गोवर्धनपूर, वाराणसी, उत्तरप्रदेश येथे श्री गुरू रविदास यांचे भव्यदिव्य जन्मस्थान मंदिर आहे. याशिवाय भारतात लहान मोठे हजारो मंदिर गुरू रविदासांची आहेत. मंदिरात देव म्हणून त्यांची पूजा होते.त्यांच्या व त्यांचे जीवन चरित्र व विचार वाचून ते आचरणात आणले जाते .देव म्हणून पूजले जाणारे गुरू रविदास हे भारतातील एकमेव संत असावे.
गुरू रविदास व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक साम्य :-
गुरु रविदास व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक साम्य असलेले आढळते.
“कहि रैदास खलास चमारा।
जो हमसहरी सौ मीत हमारा ॥”
इतक्या ताकदीने स्वतःच्या चमार म्हणजे अस्पृश्य होण्याची
उद्घघोषणा करणारे संत रविदास आणि इंग्रजांना कैफियत सादर करताना त्याखाली एक अस्पृश्य
म्हणून सही करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील साम्य लक्षात घेण्यासारखे आहे. अस्पृश्य असणे हा ज्या काळात अभिशाप मानला जात होता त्याकाळातील श्री गुरू रविदासांचे धाडस वाखणण्यासारखे आहे.चर्मकार समाजात गुरू रविदास महाराज जन्माला आले हे सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे चर्मकार समाजाला कळले. त्याकाळी उच्च शिक्षित व उच्च विद्याविभूषित असल्याने डॉ. आंबेडकरांनी गुरुग्रंथसाहेब या शिख धर्मग्रंथाचा अभ्यास करून त्यातील गुरू रविदासांचे ४० दोहे व साख्या जगभर प्रसिद्ध केल्या. त्यामुळेच जगभरातील चर्मकार बंधुंनी श्री गुरू रविदास महाराजांना आपले आराध्य दैवत मानायला सुरुवात केली. तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप होणारी “बहुजन हिताय बहुजन सुखाय ” अशी विचारधारा गुरू रविदासांची आहे. बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा गुरू रविदासांचा विचार आहे हे डॉ.बाबासाहेबांनी जाणले म्हणूनच त्यांनी आपला “द अनटचेबल” नावाचा ग्रंथ गुरू रविदासांना अर्पण केला.
संपूर्ण मानव समाजाला दिशा देणारे गुरू रविदास :-
भगवान महावीर,भगवान बुद्ध,चार्वाक मुनी आणि गुरू रविदास यांनी आपल्या देशाला शील,सदाचाराच्या राजमार्गावर आणण्यासाठी अप्रतिम प्रयत्न केलेले आहेत ते अवर्णणीय आहेत. त्यांनी केलेले कार्य हा समाज व देशासाठी फार मोठा अमूल्य ठेवा आहे.या चार महापुरुषांचे कार्य इतके क्रांतिकारी आणि बुद्धिवादी होते की त्यांच्या विचारांनी हा संपूर्ण देश प्रभावित झाला होता. प्रेरणादायी आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी तत्कालीन समाजातील नैराश्य, दुःख, अंधविश्वास नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.चर्मकार समाजालाच नव्हे तर संपूर्ण मानव समाजाला दिशा देण्याचे महान राष्ट्रीय कार्य गुरू रविदास यांनी केले.
समतावादी गुरू रविदास :-
गुरू रविदासांनी दुःखी लोकांचे दुःख दूर करून आपल्या वाणीतून समतेसाठी संघर्ष केला.जातीवर आधारित विषमतावादी समाजव्यवस्था त्यांना बदलवायची होती म्हणून ते म्हणतात.
“जात जात में जात है ।
ज्यो केलन के पात ॥
रविदास न मानुष जुड़ सकै ।
जो लो जात न जात ॥”
विषमतावादी समाजव्यवस्था बदलण्याचा गुरू रविदासांचा दृष्टिकोन येथे स्पष्ट होतो;कारण या विषमतेतून सामाजिक प्रतिष्ठा,समान संधी,शिक्षणात सहभाग आणि राजकीय भागिदारी नाकारल्या गेली होती. समाजाच्या या दुःखाला वाचा फोडण्याचे कार्य अनेक थोर पुरूष व संतांनी केले. त्यातील गुरू रविदासांचे कार्य फार मोठे आहे.
गुरू रविदासांची ‘राजकीय विचारधारा : –
गुरू रविदासांचा ‘राजकीय विचार महत्त्वपूर्ण आहे. त्यांना ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे राजकीय नेतृत्व अपेक्षित होते. समाजामध्ये असणारे विविध प्रश्न राजसत्तेमुळे सहज सुटू शकतात व समाज सुखी होऊ शकतो असे त्यांना वाटत होते, त्यानी जे समतावादी राज्यसत्तेचे विचार मांडले ते खालील साखीतून स्पष्ट होतात.
” ऐसा चाहो राज मै ।
जहाँ मिलै सबन को अन्न ॥
छोटे बड़ों सब सम बसे ।
रविदास रहै प्रसन्न ॥”
गुरु रविदासांचे हे राजकीय विचार आज आचरणात आणल्यास संपूर्ण भारत सुखी व समृद्ध होऊ शकतो.एवढी मोठी शक्ती त्यांच्या समतावादी राजकीय विचारधारेत आहे .
मनाला महत्त्व देणारे गुरू रविदास : –
चौदाव्या शतकातील एक महान विचारवंत म्हणजे गुरू रविदास,दुःख निर्मितीचे कारण सांगताना विकृत मनाचा उल्लेख त्यांनी केला.मानवाच्या मनाला योग्य विचार करण्याची दिशा देणारा धर्म मानवाला सर्व सुख देऊ शकतो. म्हणूनच मनाविषयी ते म्हणतात की ,
” मन ही पूजा मन ही धूप।
मन ही सैऊ सहज सरूप।
देता रहे हजार बरस,
मुल्ला चाहे अजान।
रविदास खुदा नहिं मिल सकई,
जौ लो मन शैतान ॥”
स्वावलंबी जीवनाचा संदेश :-
स्वावलंबी होण्याची शिकवण गुरू रविदासांनी दिली ते म्हणतात,
“पराधिनता पाप है,
पराधिन बेदीन।
रविदास पराधिनउ ।
सभहि समझहि हीन ॥”
प्रत्येकाने स्वावलंबी जीवन जगावे.त्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही.जे गुलामीचे व लाचारीचे जीवन जगतात त्यांना सर्वच हीन समजतात.गुरू रविदास म्हणतात, मनुष्य योनी सर्वश्रेष्ठ योनी आहे, ते म्हणायचे की, सर्व प्राणीमात्रात फक्त माणसालाच परमोच्च बुद्धी लाभलेली आहे;म्हणून मानवाजवळ विवेक व विचार आहे. माणसाने माणसासारखे वागावे, इतरांसाठी कार्य करावे, कोणासाही दुःख देऊ नये, सर्वांना आनंद द्यावा, ते म्हणतात की,
तिरगुण योनि अचेत संभव,
पाप-पुन असोच।
मनुषावतार अति दुरलभ,
तिरु संगति पोच ॥”
कर्मानेच मनुष्य उच्च नि कनिष्ठ :-
गुरु रविदासांनी काशी येथे प्राचीन गंगाघाटावर अनेक प्रवचने दिली आहेत.एकदा तेथे गुरु रविदासांच्या धर्मचर्चेला ऐकण्यासाठी खूप गर्दी झालेली होती. मंत्रमुग्ध झालेला लोक समुदाय शांतपणे गुरू रविदासांचे विचार ऐकत होता. श्रेष्ठ आणि कनिष्ठ माणूस कसा ठरतो हे सांगताना ते आपल्या दोह्यात म्हणाले की,
“रैदास जनम कई कारनै,
होत न कोई नीच।
नरकउ नीच करि डारी है,
ओठ करम की कीच।”
अर्थात जन्म, कुळ अथवा जातीने कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही तर त्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्मामुळेच मनुष्य श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरत असतो. शुद्र जातीत जन्मल्याने मनुष्य शुद्र वा नीच होत नाही. वाईट कृत्यामुळेच कनिष्ठ दर्जा प्राप्त होतो;म्हणून मनुष्याने श्रेष्ठ कर्म केले पाहिजे.
श्रमाला ईश्वर समजणे आवश्यक :-
गुरु रविदास यांनी श्रमाला महत्त्व दिले होते. ते म्हणतात की ,
“श्रम कऊ ईसर जाति के,
जऊ पूजहि दिन रैना।
रविदास, तिव्हहि संसार मह,
सदा मिलाहि सुख-चैना ।।
गुरू रविदास म्हणतात की, श्रमाला ईश्वर समजले पाहिजे. श्रमाला ईश्वर समजून जे झटतात अशा श्रमकरी लोकांना तिन्ही लोकी सुख समाधान लाभत असते. श्रम न करणाऱ्या आळशी लोकांना गुरू रविदासांच्या या विचारापासून निश्चित बोध मिळू शकतो.
सत्याची शक्ती मोठी : –
गुरू रविदास म्हणतात की, “सत्याची शक्ती फार मोठी आहे. या सत्य शक्तीनेच पापाचा नाश होतो. असत्य बोलणाऱ्यांचे जीवन मृत्यूसमान आहे; म्हणून जीवनात सत्य वाणीचाच उपयोग करावा व स्वतःचे जीवन पापमुक्त करावे.”आजच्या समाजाने गुरू रविदासांच्या तत्त्वांचे आचरण केल्यास आजचा समाज हा प्रगतीपथावर जाईल यात शंका नाही कारण या तत्त्वाचे आचरण करणाऱ्या अनुयायांवरून जीव ओवाळून टाकणारे गुरू रविदास, एक महान संत होते.
‘काहे रैदास खलास चमारा।
जो हम सहरि सो मीत हमारा ।।’
थोर समाज क्रांतिकारक काशीच्या राजाद्वारे सन्मानित झालेले, भेदभाव विरहित समतेवर व ममतेवर आधारित देशाची संकल्पना मांडणाऱ्या
संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांचा जन्म दि.१५ फेब्रुवारी १३९८ आणि मृत्यू दि. १० ऑक्टोबर १५१८ ला झाला. संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांच्या आज दि.१२ फेब्रुवारी २०२५ ला माघ पौर्णिमेला असलेल्या ६२७ व्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन ॥
” गुरू रैदासांना ।
आज जन्मदिनी ॥
वंदन करांनी ।
कोटी कोटी ॥

-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर ,अमरावती.
भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९
———————————-
संदर्भ ग्रंथ :
१ ) सामाजिक क्रांतीचे प्रणेते
संत शिरोमणी गुरु रविदास
लेखक : –
प्रा.डॉ.चंद्रशेखर चांदेकर
२ ) समतेचे अद्य प्रवर्तक
गुरू रविदास
लेखक :
जनार्दन गव्हाळे
३ ) गुरु रविदास भ्रम
आणि वास्तव
लेखक : –
चंद्रप्रकाश देगलूरकर
४ ) गुरू रविदास बोधामृत वाणी
लेखक : –
श्री गोविंद सूर्यवंशी














